वृद्धापकाळात होणारे मुख्य आजार आणि संक्षिप्त उपचार
२) हाडे ठिसूळ होणे (Osteoporosis) – उतार वयात हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होऊ लागतात. सुरुवातीला त्याची फारशी काही लक्षणे दिसत नाहीत पण लहानशा आघातमुळे पटकन हाड मोडण्याची (fracture) शक्यता वाढते. अशा वयात अस्थिसंधान (हाडे जुळून येणे) होणे कठीण असते, लवकर झीज भरून निघत नाही शिवाय वयोपरत्वे हालचाली कमी असल्यामुळे स्नायू पण दुर्बल होऊ लागतात आणि परिस्थिति कठीण होऊन बसते. झीज भरून येण्यासाठी आहारतून मिळणारे कॅल्शियम पुरत नाही. अधिक कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी महागड्या गोळ्या घेण्यापेक्षा साधी चुन्याची निवळी रोज फक्त २ चमचे घ्यावी. त्यामुळे पुरेसे कॅल्शियम मिळून हाडे बळकट होऊन मोडण्याची शक्यता कमी होते.
निवळी कीती आणि कशी घ्यावी – सकाळी चहा किंवा दुधामध्ये २ चमचे टाकून घेणे. कॅल्शियमचे शोषण योग्य होण्यासाठी व्हिटॅमिन डी (ड जीवनसत्व) मिळण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात किमान अर्धा तास रोज बसावे. विना खर्चाचा आणि हमखास लाभदायक असा हा उपाय आहे.
३) संधिवात (Osteoarthritis) – या आजाराला संधिवात अर्थात degenerative arthritis किंवा osteoarthritis म्हणतात. वेदनाशामक औषधांचा उपयोग तात्पुरता होतो. उतारवयात अशा औषधांचा उपयोग टाळणे योग्य. वेदानाशमक औषधांचा वापर टाळून संतुलित आहारावर भर द्यावा, दिनचर्येत बदल करावेत, योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करावेत आणि गरज लागली तर वनस्पतीजन्य सौम्य औषधांचा वापर करावा.
आहार: भाजलेल्या धान्याचा आहारात वापर करावा, पोळ्यांच्या पिठात सुंठ पाव चमचा आणि एरंडेल २ चमचे टाकणे, मोड आलेल्या मेथी २ चमचे सकाळी रिकाम्या पोटी खाण्यास द्याव्या.
४) निद्रानाश (Insomnia) – मूल जन्माला आल्यावर दिवासतले १५ ते २० तास झोपते. वय वाढू लागल्यावर झोप कमी होत जाते. वृद्धावस्थेत तर झोप खूपच कमी होते. शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती मिळण्यासाठी किमान ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. कोणत्याही वयात झोपेच्या गोळ्या घेतल्या तर मेंदूच्या पेशींवर घातक परिणाम होतो हे आपण जाणतोच. मग उतार वयात तर याचे दुष्परिणाम झेलण्याची ताकद शरीराकडे कशी असेल? त्यासाठी काही अगदी सोपे उपचार आपल्याला करता येतील ज्याने काहीही दुष्परिणाम न होता झोपही छान लागेल.
उपचार: १) तळपायला तूप चोळून मोजे घालून झोपावे. २) कुंकुम घृत (नस्य) २ – २ थेंब झोपण्यापूर्वी १५ मिनिटे कोमट करून नाकात टाकावेत. ३) अर्धा कप दुधात २ – ३ चिमूट जायफळ टाकून झोपताना प्यावे.
५) विस्मरण (Dementia / Alzheimer’s disease) – मेंदू आणि एकंदर सर्वच मज्जायंत्रणेची निर्मिती होण्यात स्निग्ध पदार्थांचा सर्वात जास्त सहभाग असतो. हाडांसाठी जसे कॅल्शियम किंवा स्नायूंसाठी जशी प्रोटीनन्स तसे मेंदूसाठी स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थांमध्ये सर्वात उत्तम आहे गाईचे तूप आणि त्याच्या खालोखाल नारळाच्या दुधापासून निर्मित तेल (याला व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणतात). या मिश्रणात विशिष्ट वनस्पतींचे तैलार्क मिश्र करून “कुंकुम घृत” मी स्वतः तयार करतो. हे औषध नित्यनेमाने नाकात टाकावे. खरंतर वृद्धांनाच नव्हे तर शाळकरी विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती सुधारण्यासाठी हे उत्तम पोषण आहे. वार्धक्यात विस्मरण हे लक्षण अतिशय हळूहळू दिसू लागते. सुरुवातीला एखाद्या माणसाचं नाव आठवत नाही. त्यावेळी असं वाटतं की बरेच दिवसात भेट झाली नाही म्हणून आठवत नसेल. पण ही एका रोगाची सुरुवात आहे हे समजत नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पुढे विसरण्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि घरात हा एक थट्टा मस्करीचा विषय होतो. मात्र पुढे काही वर्षांनी डिमेन्शिया किंवा अल्झायमर्सचे निदान झाल्यावर “आता यावर काही इलाज नाही” अशी परिस्थिति होते. म्हणून सर्वांना आवर्जून सांगावेसे वाटते की पन्नाशी दरम्यान हे औषध नाकात टाकायला सुरुवात करा, एकदा लक्षणे दिसू लागली की कोणत्याही औषधाचा काहीही उपयोग होत नाही.
मात्रा: २ – २ थेंब सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी, किंचित कोमट करून नाकात टाकावेत. मान कलती करून दोन मिनिटे तसेच पडून राहावे. हे कुंकुम नस्य कोमट केल्याने नाकाच्या श्लेष्मल त्वचेच्या माध्यमातून मेंदूच्या पेशींपर्यन्त हे सहज शोषले जाते.
६) कंपवात (Parkinson’s disease) – या विकारात शरीराच्या हालचालींवर नियंत्रण करणारा मेंदूतील चेतापेशींचा विशिष्ट भाग हळूहळू नाश पावतो. हातांना कंप, स्नायू ताठर होणे, हालचालींमध्ये शिथिलता येणे आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचण येणे अशी या विकाराची मुख्य लक्षणे आहेत. मज्जा यंत्रणेतील डोपामाइनचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा विकार संभवतो. या आजारपासून सुटका होण्यासाठी वरील कुंकुम नस्याचा वापर नियमितपणे करावा.
७) ऐकू कमी येणे (Hearing disorder) – वयानुसार कानाने कमी ऐकू येणे हे नॉर्मल आहे असे बऱ्याच लोकांना वाटते. वास्तविक हा दोष आहे आणि बिना औषधाने पण कधीकधी बरा होऊ शकतो. विशेषतः वारंवार सर्दीमुळे कानात दडे बसतात आणि त्यामुळे बहिरेपणा आला असेल तर एक सोपा इलाज म्हणजे लसूण आणि हिंगाचा खडा कापसात गुंडाळून रात्री कानात ठेवावा. लसूण आणि हिंग अतिशय उष्ण असतात. याने कानात आग झाल्यासारखी संवेदना होते. रात्री झोपताना पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना कानात दडे बसण्याची शक्यता जास्त असते. काहीही इलाज न करता एवढेच पथ्य केल्याने कित्येक जणांना फायदा झाला आहे. उपाय अगदी सोपा आहे, करून पाहायला काहीच हरकत नाही. कानाच्या शिरेला (नर्व्हला) दुखापत झाली असेल तर मात्र या उपायचा फायदा होणार नाही.
८) अंथरूणात लघवी होणे (Lack of bladder control) – वयानुसार मूत्राशयावर नियंत्रण करणाऱ्या चेतापेशी दुर्बल होतात आणि त्यावरचे नियंत्रण बिघडते. हा त्रास टाळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक तास पाणी किंवा कोणताही द्रव आहार (सरबत/ चहा/ कॉफी/ शीतपेय) घेऊ नये. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ‘संध्या’ नावाची पूजा करण्यामागे आरोग्याचा हाच दृष्टिकोन असावा. आहारतून गोड पदार्थ कमी करावेत, रात्रीच्या जेवणात तर गोड मुळीच खाऊ नये, केळी वर्ज्य करावीत. एवढे करूनही बरे नाही वाटले तर उंबरसाल चूर्ण अर्धा चमचा थोड्या गुळाबरोबर मिश्र करून गोळी संध्याकाळी घ्यावी.
९) अपचन (Indigestion/ Constipation) – वृद्धापकाळात शरीराची हालचाल कमी असते त्यामुळे पचनक्रिया मंदावते, पोटाला जडपणा जाणवतो, त्यामुळे कधीकधी श्वास घ्यायलाही त्रास होतो. यावर सोपा उपाय म्हणजे धान्य (गहू/ तांदूळ/ ज्वारी/ बाजरी वगैरे) भाजून आहारात वापर करावा. पोट साफ होत नसेल तर पोळ्यांच्या पिठात योग्य मात्रेत एरंडेल तेल टाकावे. एरंडेल टाकल्यामुळे पोळ्या अतिशय नरम होतात, त्याच्या गिळगिळीतपणाचा त्रास अजिबात जाणवत नाही. मालवरोध होत असल्यास सर्रास पालेभाज्या खण्यावर जोर दिल जातो. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे आतड्यांमधला स्निग्धांश शोषला जातो आणि तो स्तर अधिकच कोरडा होत जातो. काहीतरी रेचक औषध घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही अशी परिस्थिति पालेभाज्या जास्त खण्यामुळे निर्माण होते हे लक्षात ठेवावे. कोठा साफ राहण्यासाठी आणखीन काही उपाय म्हणजे जेवणाच्या सुरुवातीला १ चमचा तिळाचे तेल आणि त्यात सैंधव मीठ पाव चमचा घालून गिळून टाकावे. तेलामुळे अन्नमार्गात स्नेहन होते आणि सैंधव मिठाने मळाचे खडे ठिसूळ होतात. दुसरा प्रयोग म्हणजे अर्धा कप गरम दूध, तेवढेच पाणी आणि चमचाभर तूप सकाळी रिकाम्यापोटी घ्यावे. यानेही पोट चांगले साफ होते.
१०) मधुमेह (Diabetes) – भारताला मधुमेहाची राजधानी म्हणतात कारण जगात सर्वात जास्त माधुमेही रुग्ण भारतात आहेत. मधुमेहात दोन मुख्य प्रकार आढळतात. ज्यांना इन्सुलीनचे इंजेक्शन घ्यावे लागते आणि दुसऱ्या प्रकारात केवळ औषधाने उपयोग होतो. औषधे घेत असताना सोबत मोड आलेल्या मेथीचे २ चमचे सकाळी रिकाम्यापोटी चावून खाण्यामुळे वाढती रक्तशर्करा चांगलीच नियंत्रणात राहते.
इतर फायदे – याने पचन सुधारते, सांधेदुखी कमी होते, हृदयाचे रक्ताभिसरण सुधारते, रोग प्रतिकरक्षमता सुधारते, अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी करण्यासाठी हा प्रयोग उपयोगी आहे.
-डॉ. संतोष जळूकर
वैयक्तिक सल्ल्याकरिता फोन +91 7208777773
Leave a Reply