
२२) मांसाहार करावा की नाही? (Is non-veg good): जगात एकूण लोकसंख्येपैकी फक्त १० टक्के लोक शाकाहारी आहेत. हे प्रमाण खरोखर आश्चर्यकारक आहे. भारतात सुमारे ३९% शाकाहारी आणि ८१% मांसाहारी आहेत. वार्धक्याचा विचार करता, धातूंचा क्षय अधिक असतो म्हणून त्यांना पोषक प्रथिनांची गरज तुलनेने जास्त असते. म्हणून आठवड्यातून एक वेळा मांसाहार घेण्यास हरकत नाही. मात्र मांसाहार शक्यतो दिवसाच्या जेवणात असावा, रात्रीचे भोजन शाकाहारी आणि हलके असावे. ज्यांना मांसाहार वर्ज्य आहे त्यांनी दूध किंवा सोया मिल्क घ्यावे जेणेकरून प्रथिनांची गरज भरून निघेल. मांसाहारात २० प्रकारची अमायनो अॅसिड्स असतात जी कोणत्याही प्रकारच्या शाकाहारातून मिळू शकत नाहीत. काही लोक दुधालाही मांसाहार समजतात. वास्तविक दूध हा प्राणिज पदार्थ आहे पण मांसाहार नाही. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ सेवन न करणाऱ्यांना व्हेगन म्हणतात.
२३) करोना पासून संरक्षण (Protection from Corona): यालाच कोव्हिड १९ म्हणतात कारण २०१९ साली हा नवीन विषाणू वैद्यक शास्त्राला माहिती झाला. मार्च २०२० पासून पुढे दोन वर्ष अख्ख्या जगात याने थैमान घातले आणि सुमारे ६३ लाखपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला. आता २०२२ मध्ये जरा शांत झालेला दिसतो. २०१९ पूर्वी कोणालाच याबद्दल काही माहिती नव्हती. सुरुवातीला बातम्यांमध्ये वाचून किंवा ऐकून याचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले नाही. या विषयाकडे खरोखर लक्ष देण्याची गरज आहे असे लक्षात आल्यावर मी आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून याचा अभ्यास सुरू केला. अभ्यास सुरू करायला काहीतरी संदर्भ किंवा पार्श्वभूमी असावी लागते. करोनाच्या बाबतीत असे काहीही नसल्यामुळे अभ्यासाला सुरुवात कशी करावी इथपासून मनात गोंधळ. मग प्रथम WHO (जागतिक आरोग्य संघटना) या संस्थेच्या वेबसाईट वाचन सुरू केले. तसा हा व्हायरस अॅलोपॅथीला पण नवीनच होता. त्यावर अगदी निवडक अभ्यास त्यावेळी उपलब्ध होता. हा अभ्यास करताना एक विशेष गोष्ट लक्षात आली ती म्हणजे WHO ने स्पष्ट दिले होते की या रोगावर अजून काहीही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. आणि पुढे लिहिले होते की कोणतीही अल्टरनेटिव्ह किंवा हर्बल औषधे घेऊ नयेत. हे वाचल्यावर मोठा धक्काच बसला. आपल्या अॅलोपॅथीच्या शास्त्रात काही इलाज नाही हे माहिती असूनही दुसऱ्या वैद्यक शास्त्राचा आधार घेण्याला कट्टर विरोध? म्हणजे कोणी भुकेला आपल्यापाशी आला तर आपण त्याला सांगावे की बाबारे माझ्याकडे तुला द्यायला काहीही नाही पण तू समोरच्याकडे काही खाऊ नकोस. कीती चुकीचा विचार आहे? असो, “सत्तेला शहाणपण नसते” ही म्हण आपल्या पूर्वजांनी कीती विचारपूर्वक तयार केली आहे हे आता लक्षात येते. मुळात आयुर्वेदाचा पाया एका शास्त्रीय तत्वज्ञानावर उभा आहे म्हणून त्याला अनादी आणि अनंत म्हणतात. करोनाची सर्व लक्षणे आणि रोगाचे वास्तव्य शरीराच्या ज्या भागावर होते त्यावरून हा व्हायरस कफाच्या जातीचा आहे हे निश्चित होते. याचा संसर्ग मुख्यतः श्वासमार्गातून होतो, सर्दी, खोकला, मंद ताप आणि फुप्फुसाशी संबंधित लक्षणे यातून उत्पन्न होतात. या लक्षणांच्या आधारे एक गोष्ट आपल्याला नक्की करता येते ती म्हणजे याला कफनाशक चिकित्सा करावी. आयुर्वेदाचा आणखीन एक पैलू म्हणजे रोगाची चिकित्सा करताना पहिले ‘निदान परिवर्जन’ करावे. ‘निदान परिवर्जन’ म्हणजे रोग होण्याची कारणे बंद करावीत. याचे साधे उदाहरण म्हणजे “मधुमेह झाल्यावर गोड खाणे बंद करावे”. उद्या कोणी म्हणेल मला हवे तेवढे गोड खायला द्या पण औषधांनी रोग आटोक्यात आणा तर ते शक्य नाही. रोगाचे कारण दूर करणे अतिशय आवश्यक आहे. करोनाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. करोना विशिष्ट व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस (विषाणू) मुख्यतः श्वासातून शरीरात शिरतो म्हणून मास्क लावावा, स्पर्शातूनही याचा प्रसार होऊ शकतो म्हणून ज्या वस्तूला आपण स्पर्श करतो ती वस्तू निर्जंतुक करावी, गर्दीच्या ठिकाणी एकमेकांच्या श्वासतून संक्रमण होऊ नये म्हणून लांब अंतरावर उभे राहावे हे सर्व योग्य आहेच. याच्या पुढची पायरी म्हणजे आयुर्वेदाचा सिद्धांत. करोनाचे विषाणू हे कफ जातीचे असल्यामुळे ते दूध आणि गोडाने वाढू शकतात. आयुर्वेदात गोड पदार्थ कसा ओळखवा हे स्पष्ट करताना “प्रियः पिपीलिकादीनाम्” असे वर्णन केले आहे. पिपीलिका म्हणजे मुंग्या, अर्थात मुंग्यांप्रमाणे इतर जंतूंना आवडतो तो पदार्थ म्हणजे गोड. करोना व्हायरसच्या बाबतीतही हेच लक्षात ठेवावे. जे लोक जास्त दुधाचे पदार्थ आणि गोड खातात त्यांना करोना संसर्गाची भीती जास्त असते. माझ्या या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी आपण एक नजर जगातल्या करोना बाधित अकडेवारीवर टाका. चीनमध्ये याचा उगम झाला असला तरी जगात सर्वात जास्त करोना रुग्ण अमेरिकेत आढळले, त्याच्या खालोखाल भारतात. आज दिनांक ३१ मे २०२२ रोजी https://www.worldometers.info/coronavirus/#countries या विश्वासार्ह संकेतस्थळावर पहा.
अमेरिकेत एकूण करोना बाधित लोकांचा आकडा ८५७३०५९७ आणि मृत्यू झालेल्यांची संख्या १०३१२८६ एवढी आहे.
भारतात एकूण करोना बंधितांचा आकडा ४३१५८५८२ आणि मृत्यू झालेल्यांची संख्या ५२४६३०
https://www.worldatlas.com/articles/top-sugar-consuming-nations-in-the-world.html या संकेतस्थळावर पहा, अमेरिका हा जगात सर्वाधिक साखर खाणारा देश आहे. या देशात सरासरी दरमाणशी १२६.४ ग्रॅम दररोज साखर खालली जाते. भारताला तर मधुमेहाची राजधानीच म्हणतात. या संदर्भात मी काही संस्थांशी संपर्क केला आणि मास्क, सॅनिटायझेशन, डिस्टन्सिंग व्यतिरिक्त गोड खाण्याबद्दलचा विषय सांगण्याचा प्रयत्न केला पण जागतिक आरोग्य संघटना कुठे आणि आम्ही कुठे? आमचं कोण ऐकणार? शेवटी मी एवढं सांगितलं की “किमान आहारात साखर कमी करा” हा संदेश तरी समाजात पोचवा, त्याने काही नुकसान तर होणार नाही. पण आमचं कोण ऐकतं? वारंवार चहा, कॉफी, घेण्याची सवय बंद केली तरी साखरेवर कितीतरी नियंत्रण राहील.
-डॉ. संतोष जळूकर
वैयक्तिक सल्ल्याकरिता फोन +91 7208777773
Leave a Reply