सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते.
लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर केलेल्या असतात. तिने जीवनाचा संसारिक अनुभव अनेक प्रसंगातून घेतलेला असतो. आजपर्यंत ती जीवनाची गाठोडी, केवळ जमा करण्यातच व्यस्त होती. आज्ञा ऐकणे पाळणे, वा करणे, ह्याच कार्यचक्रात ती गुंतलेली होती. आता ती परिपक्व भूमिकेत आलेली आहे. येथे जे जे आजपर्यंत जमा केलेले होते ते सारे वाटीत जाणे आता तिचे काम झाले आहे. निसर्ग चक्रानुसार घटनाची सतत पुनुरावृती होत असते. तशाच गोष्टी थोड्याश्या फरकाने होत असतात. ज्या इतरांना सर्वस्वी नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या असतात, त्याचा आंतरिक गुंता आजीच्या अनुभव चौकटी मधलाच असतो. त्यामुळे त्याचा धागा तिच्या लक्षात येत असतो. अनुभवाच्या मार्ग दर्शनाचे पैलू येथेच मदत करतात.
आज मला माझ्या बालपणीची आठवण झाली. मी त्यावेळी दहा वर्षाचा असेन. मला शिकवण्यासाठी एक शिक्षक ( त्यांना आम्ही गुरुजी म्हणत असू ) घरी येत होते. चांगले शिक्षक परंतु अतिशय शिस्तप्रिय व कडक अश्या स्वभावाचे होते. त्याकाळी मुलांना त्यांच्या चुकाबद्दल बेशिस्तपनाबद्दल सतत मार बसे. रागावले जायचे. कोणतीही गोष्ट मुलांना समजावून सांगणे, त्यांच्या भावना जाणणे, ह्याबाबतीत पालकांना, शिक्षकांना, आणि कोणत्याही वडील व्यक्तींना मुळीच आस्था नव्हती. हा केवळ वेळ व्याया घालविण्याचा मार्ग आहे ही त्यांची धारणा असे. ” छडी लागे छम छम, विद्या एयी घम घम.” ह्या पुर्वकालीन तत्वज्ञानात त्यांचा विश्वास होता. त्याच प्रसंगी योग्य वेळी योग्य शिक्षा ही धाक व शिस्त निर्माण करते ही त्यांची अनुभव संपन्न समजूत होते. ( आता काळ पूर्ण बदलला, शिक्षक बदलये, आणि विद्यार्थीही.).
माझे शिक्षक अर्थात पूर्वकालीन होते. रोज रात्री सात वाजता ते एकतास शिकवीत असे. त्या वेळचे पाठ शिकवीत व गृहपाठ देत असे. बालवय व विद्यार्थी म्हणून अनेक चुका करीतच शिक्षणाचा मार्ग चालला होता. मात्र चुकले की ” गाढवा, मूर्ख ” असल्या शिव्या ते देत व अधून मधून पाठीत धपाटा ही लागावीत. मी निराश होत होतो. केव्ह्ना केव्ह्ना रडू येत होते. परंतु ” रडतोस काय असा ?” म्हणून त्यावरचा शांत करण्याचा उपाय म्हणून आणखी एखदा धपाटा पाठीत बसत असे. शिकणे तसे सारे दिव्यच होते. त्या वेळेला कळवळंल्याच्या आजही आठवणी येतात व हसू येते.
माझी वेगळी खोली होती. खाली सतरंगी अंथरून आम्ही बसत असू. एक दिवस अचानक माझी आजी तेथे आली. तिच्याजवळ कापूस होता. ती वाती व फुलवाती करीत तेथेच बसली. नेहमीच्या सवयी प्रमाणे, माझे चुकतच “ गाढवा ही बेरीज अशी होती का?” म्हणत गुरुजींनी माझा कान पिळला व मला धपाटा लगावला. मी कळवळंलो. मला रडू आले. आजी जवळ होती. तिला वयाचा एक अलिखित अधिकार मिळालेला होता. ती उसळून गुरुजीना म्हणाली “ अहो एवढे काय मारता त्या लहान मुलाला. चुकला असेल तर समजावून सांगा.” गुरुजी एकदम सटपटले. त्यांनी उत्तर दिले नाही. मात्र त्यानंतर त्यांच्या वागण्यातला झालेला बदल जाणवला. आता आजीच्या केवळ तेथे अस्तित्वामुळे वातावरण बदलल्याचे माझ्या लक्षात येऊ लागले. शिक्षेऐवजी प्रेमळ शब्दात समजावणे हे होऊ लागले. दुसऱ्या दिवसा पासून सतरंजी टाकून ठेवणे, वह्या पुस्तक पेन्सिल घेणे, ह्याच बरोबर ताटात कापूस, वाटीत थोडीशी रांगोळी आणि खिडकीजवळ आजीसाठी पाट ठेवणे हे आठवणीने केले जायचे. कदाचित त्यासाठीच व अशाच प्रसंगांना आई बाबा पासून वेगळ्याच संरक्षणाची भिंत बनणारी आजी मला खूप आवडायची.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply