या शाळेत नाव दाखल करायचं असेल तर तुमचं वय किमान ६० वर्षं असायला हवं बरं का.. ही भारतातली पहिलीच आजीबाईंसाठीची शाळा आहे. ही शाळा पुण्यासारख्या मोठ्या शहरात नाही, तर आहे एका लहानशा खेडेगावात. या नावाचं गावही तुम्ही कधी ऐकलं नसेल. हे आहे आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातलं फांगणे नावाचं गाव. गेल्या वर्षी ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी या शाळेचं उद्घाटन झालंय आणि महिन्याभरात या शाळेला एक वर्ष पूर्णही होईल.
ही शाळा मोतीराम दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीनं योगेंद्र बांगर यांनी चालू केलीय. योगेश बांगर त्यांच्या एका मुलाखतीत म्हणतात-
“आयुष्यात शिक्षण आणि ज्ञानाला खूप महत्व आहे. पण खेड्यातल्या काही आजीआजोबांना त्यांच्या लहानपणी शाळेत जाता आलं नाही आणि ते या सगळ्यांपासून दूर राहिले. त्यांच्यापर्यंत शिक्षण नेण्यासाठी आम्ही ही शाळा सुरू केलीय. खेड्यांना १००टक्के साक्षरतेकडे नेण्यासाठी हा आमचा एक प्रयत्न आहे .” त्यांना ही शाळा सुरू करायला गावातल्या कुणाचा विरोधही झाला नाही हे ही ते सांगतात. उलट तुम्ही जे करत आहात, ते समाजासाठी खूप चांगलं आहे आणि आमचा तुम्हांला पाठिंबा आहे अशीच प्रतिक्रिया बांगर यांना गावकर्यांकडून मिळाली.
योगेश बांगर हे तिथल्याच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतले शिक्षक आहेत. त्यांना शिक्षकपुरस्कारही मिळाला आहे.
या शाळेत थोड्याथोडक्या नाहीत, तर ६० ते ९० वर्षे वयापर्यंतच्या २८ आज्या सध्या शिक्षण घेत आहेत. शाळेची वेळही काही जास्त नसते. रोज संध्याकाळी ४ ते ६ बस्स. आज्यांना आपल्या नातवंडासोबत वेळ नको का मिळायला? आता ही नातवंडं आजीला रोज शाळेत काय झालं विचारतात. आजीच्या गोष्टी ऐकण्यासोबतच तिच्या होमवर्कमध्ये म्हणजेच शुद्ध मराठीत गृहपाठात ही नातवंडं आज्यांना मदत करतात.
थररथत्या हाताच्या आजीबाईंना मुलं आणि नातवंडं आता शाळेत सोडतात. पूर्वी बँकेत अंगठा उठवताना असणारी कमीपणाची भावना आता स्वत:ची सही करता आल्यानं नाहीशी झाल्याचंही एक आजीबाई सांगतात. ’पिकलं पान’ छापाचे नेहमीचे डायलॉग न मारता या सगळ्या आज्या मोठ्या उत्साहात आपला गुलाबी युनिफॉर्म नेसून रोज शाळॆत जातात. काही आज्यांच्या लहानपणी गरीबीमुळं त्यांच्या आईबाबांनी फक्त मुलांना शाळॆत पाठवलं आणि मुलींना घरकामाला लावलं होतं. त्यामुळं शाळेत कधीही पाऊल न ठेवलेल्या या आज्या शाळेत जायला मिळाल्यानं खूप खूष आहेत.
गुलाबी नऊवारीत शाळेत जाणार्या या आज्या भलत्याच गोड दिसतात. शाळेत जाण्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावरून लपत नाहीय पाहा.
Leave a Reply