जगामध्ये छंद वेड्या लोकांची काही कमी नाही, जन्माला येणारी व्येक्ती काहीना काही छंद घेऊन येत असते आणि काही छंद तर आश्चर्य वाटेणारे असतात.त्यांचा छंद,त्यांची आवड लोकांच लक्षवेधुन घेत असते,त्यांचा छंद चर्चेचा विषय ठरतो.म्हणून माणसाला काहीना काही चांगला छंद असावा जेणेकरून आपण केलेल्या चांगल्या कामाची कोणीतरी दखल घेतली पाहिजे.माणसाच काम आणि कर्तृत्व लक्षवेधी असेल तर त्यांच्या कामाची दखल निश्चित घेतली जाते. आणि अनेकांच लक्ष त्याच्या कामाकडे जातं.खरचं जगावेगळं काम करण्यात जो आनंद असतो ना तो कशातच नसतो.लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या कामाचं आपल्याला समाधान आणि आनंद झाला ना तर समाजाने दखल घेतल्यावर आपल्या कामाचं सार्थक झाल्याचा आनंद आपल्याला झाल्याशिवाय रहात नाही.तेव्हा आपला आनंद जोपासताना परिस्थितीचा विचार न करता आहे त्या परिस्थीत आपला छंद पुर्ण केला तर एकना एक दिवस आपली आवड, आपला छंद आभाळा एव्हढी उंची गाठतोच.फक्त आपलं काम आपण न लाजता प्रामाणिकपणे केले तर यश स्वतःहून आपल्याजवळ आल्यावाचून रहात नाही मग एखाद्या हॉटेलमध्ये पुस्तकांच दालन सुरू करावं लागलं तरी हरकत नाही.खरतर मोबाईलच्या काळात वाचक,वाचन संस्कृती, वाचनालयात आणि ग्रंथालय काही प्रमाणातच शिल्लक राहिली आहेत. अशाही मोबाईलच्या युगात एखाद्या आजीने हॉटेलमध्ये पुस्तकांच दालनं सुरू केले तर यात आश्चर्य वाटायला नको.हो वाटल ना आश्चर्य,हॉटेलमध्ये पुस्तकांच दालन कसं असु शकतं,हो असु शकतं.अशीच एका आजीच पुस्तकांच हॉटेल धुळ्याहून नाशिकला जाताना मुंबई आग्रा महामार्गावर ओझरच्या पुढे अवघ्या दहा मैलांवर रोडालगतच आहे.आजींच पुस्तकांच हॉटेलचं हे नाव वाचून सुरवातीला आश्चर्य वाटलं मग त्या हॉटेल मध्ये जाण्याची मनात ईच्छा होते आणि मग कोणीही सहज तेथे थांबतात चहा, नास्ता जेवण,सोबत पुस्तकं वाचनाचा ही आस्वाद घेतात.
या निमित्ताने का होईना येणारे खवय्ये पुस्तके बघतात तरी.या हॉटेल बद्दल मी ही खूप ऐकून होतो आणि मलाही वाटायचे की आपणही एकदातरी या हॉटेलला भेट द्यावी पण या पुस्तकांच्या हॉटेलला भेट देण्याची उत्कंठा वाढवली ती नाशिक चे ख्यातनाम कवी गझलकार आदरणीय बाळासाहेब गिरी सरांनी, ते काही कामा निमित्ताने पुस्तकांच्या हॉटेलमध्ये गेले असताना तेथे बाळासाहेब गिरी सरांनी अंजली राऊत लिखीत *भावस्पर्शी॑* या कवितासंग्रहाला मी लिहिलेली प्रस्तावना वाचली आणि तेथूनच मला फोन करून आजींच्या पुस्तकांच्या हॉटेल बद्दल खूप काही सांगून एकदातरी या पुस्तकांच्या हॉटेलला भेट देण्याचे सांगितले आणि माझी या आगळ्यावेगळ्या हॉटेलला भेट देण्याची तळमळ आणखीनच वाढली.खरतर या हॉटेलचे संचालक आदरणीय प्रविण जोंधळे सर हे माझे चांगलेच साहित्यिक मित्र आहेत तेव्हा भेटीदरम्यान मला जो आनंद झाला तो वेगळाच होता.आणि आपण आगळ्यावेगळ्या ठिकाणी येण्याचा आनंद मला वेगळ्याच विश्वात घेऊन गेला.अस हे सुरेख सुंदर आणि खूपच स्वच्छ पुस्तकांच हॉटेल पाहून अक्षरशः भाराऊन गेलो.असही असु शकते याची नवलाई ही मलाच नाहीतर येणाऱ्या प्रत्येक साहित्यिक, ग्राहकांना वाटल्याशिवाय रहात नाही. हॉटेल म्हटले की अस्वच्छता ही पाचवीलाच पुजलेली असते.हॉटेल बाहेरुन खूप छान दिसत असले तरी आत गेल्यावर मात्र अपेक्षाभंग होतात पण इथे तसं काही दिसतं नाही.हॉटेल मधे प्रवेश करतांना प्रथमतः जुन्या काळातील सुमधुर गाणी ऐकायला येते तसेच जुळ्या काळातील काही मराठमोळ्या वस्तु वरवंटापाटा,खलबत्ता,मुसळ, काही दुर्मिळ भांडी संग्रहित करून ठेवलेली आहेतं.हॉटेलची स्वच्छता पाहून तर मन अगदी प्रसन्न होते.आणि आपसुक चौफेर नजर फिरते.टेबलावर नास्ता जेवण येईपर्यंत पाय पुस्तकांच्या दालन कडे वळतात,बघता बघता हातात पुस्तक येतं,बोटं पाने चाळायला लागतात,चांगलं वाचण्याचा,खाण्याचा आणि बघण्याचा त्रुप्तीचा डेकर देऊन च माणसं हॉटेलच्या बाहेर पडतात.मी जेव्हा या पुस्तकांच्या हॉटेलला भेट दिली तेव्हा प्रविण जोंधळे सरांसोबत मस्तपैकी चमचमीत मिसळपाव खातांना या हॉटेलच्या वेगळेपणा बद्दल जाणून घेतले.आणि माझीही नजर चौफेर भिरभिरली.
प्रत्येक टेबलवर असलेली पुस्तके, टेबला शेजारी असलेल्या स्टँडवर मांडलेली पुस्तके,शेजारच्या हॉलमध्ये मोठ्या टेबलवर प्रदर्शित केलेली अनेक पुस्तके,अक्षरचित्र काव्यांनी नटलेली कवितेची भिंत,आजीला मिळालेली साहित्य अकादमीसह प्रतिष्ठित पुरस्कार,नाशिककर साहित्यिकांच्या छायाचित्रांची भिंत,वाचनाचा आनंद घेत बसलेले खवय्ये, हे सुखद चित्र डोळ्यांना दिसले.हॉटेल मधे प्रवेश होताच स्वागताला आजीबाई पुढे आल्यात मला हात जोडून नमस्कार केला.आणि सन्मानपूर्वक आसनस्थ व्हायला सांगितले आजींच व्यक्तीमत्व म्हणजे काय सांगाव नऊवारी पातळ, कपाळावर रुपयाएवढा कुंकू, करारी बाणा, मितभाषी अशा भारदस्त व्यक्तिमत्त्वाच्या आजीच्या चेहऱ्यावर स्वागताचा आनंद ओसंडून वाहत होता.आजीबाई म्हणजे भीमाबाई संपत जोंधळे.अवघ्या पाचवीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेल पण त्यांचं पुस्तकांवर प्रचंड प्रेम दिसुन येतं आजीबाई ७३ वर्षांच्या आहेत. मुलगा प्रवीण आणि सून यांच्या मदतीने त्या हे हॉटेल चालवतात.आजींच्या हातचं जेवण तर काय लाजवाबचं म्हणायचं. शिवाय खाता खाता पुस्तकं चाळताना आजीच नाही तर प्रविण जोंधळे सर सुध्दा येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची व्यक्तिगत विचारपूस करतात.म्हणजे येणाऱ्या ग्राहकांच्या स्वागता पासून तर हॉटेलच्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्या पर्यांत माणूस अगदी भाराऊन जातो असं हे आगळेवेगळे वैभव बघण्यासाठी अनेक साहित्यिकांनी या आजींच्या हॉटेलला भेट दिलेली आहे. हॉटेलचं कौतुक करताना साहित्यिक किंवा ग्राहकांनी काही सूचना केल्यात तर आजी कुठलाही कमीपणा वाटून न घेता त्यांच्या सुचनांची आवर्जून दखल घेतात.त्यामुळे प्रत्येक भेटीत या हॉटेल मध्ये नवीन काही तरी बघायला मिळते. हॉटेलच्या मागील बाजूला सोफे,झोपाळे आहेत तसेच काही नावाजलेल्या साहित्यिकांचे सुविचार किंवा कवितांच्या ओळींचे छायाचित्रे झाडांना लावलेली दिसतात अशा काव्यमय,काव्यप्रेमी झाडांच्या सावलीत निवांत पुस्तके वाचत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो. हॉटेलच्या गच्चीवर छोटेखानी कविसंमेलन किंवा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम घेण्याची व्यवस्थासुध्दा प्रवीण सरांनी केली आहे.आजींनी चहाच्या टपरीपासून सुरुवात केली. त्यासोबत वर्तमानपत्रांची एजन्सीही घेतली.आणि इथूनच भीमाबाईंचे वाचन संस्कृतीशी नाते जडले. टपरी शेजारी वर्तमानपत्र वाचनासाठी स्टँड उभारला.दहा वर्षांनंतर हॉटेल सुरू केले.लोक हॉटेलमध्ये येत आणि खाद्यपदार्थ येईपर्यंत मोबाइलमध्ये गुंग होत.हे आजीबाईंना खटकत होते. त्यातून आजींना पुस्तकांची कल्पना सुचली. मुलाला सांगून घरातील पुस्तके आणून टेबलवर ठेवली. तुम्ही हॉटेलमध्ये या, पुस्तके वाचा. कितीही वेळ बसा,असे आजीबाईं सांगत असे. हॉटेलमध्ये येऊन काही खाल्ले नाही तरी चालेल; पण या आणि वाचा, या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपल्याकडील पुस्तके भेट दिली.काही साहित्यिकांनी पुस्तकांच्या प्रती पाठवल्या.आज मोठा संग्रह तयार झाला आहे. हॉटेलमध्ये होणाऱ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात सहभागी लोकांना आजी पुस्तके भेट देतात. शाळांमध्ये वाचन चळवळ वाढावी, म्हणून स्वत: जाऊन मुलांना पुस्तके भेट देतात. रुग्णालयांमध्ये फळांच्या टोपली ऐवजी पुस्तकांची टोपली भेट देतात. वाचनालये, आश्रमशाळांना पुस्तके भेट देत असतात.आजी स्वत: अल्पशिक्षित असल्या तरी आजींनी मुलांना उच्चशिक्षण दिले.आणि आज आजींचा मुलगा श्री प्रवीण जोंधळे सर हे पत्रकार, साहित्यिक व प्रकाशकही आहेत. शिवाय आजींच्या सूचनेनुसार पुस्तकांचे हॉटेल फुलवत असतात.
आजींच पुस्तकांच हॉटेल हे राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे येथे अनेक प्रवाशी साहित्यिक मित्र या हॉटेलला भेट देतात भोजन येईपर्यंत,टेबलावर ठेवलेली पुस्तकं वाचायला घेतात.खाद्य व वाचनसंस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांच्या कार्याची दखल वेगवेगळ्या संस्थांनी घेतली.अनेक साहित्यिक वाचकांनी आजींच्या हॉटेलला भेट दंदंदेऊन वाचन चळवळीस चांगली चालना दिली आहे.यामुळे अनेकांना प्रेरणा मिळते व आजींनी वाचा आणि वाचत रहा अशी पुस्तकांच्या हॉटेलच्या माध्यमातून उर्जा देण्याचं काम आजी करत आहे.सध्याचा काळ पुर्णतः मोबाईलमय झाला आहे.माणसांना इतर माणसांशीच नाही तर आपल्या घरातल्या माणसांशीसुध्दा बोलायला वेळ नाही एव्हढ मोबाईलच व्यसन लागलेले आहे.अशाही बिकट काळात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत वाचन संस्कृती जोपासली पाहिजे हिच तळमळ मला आजींशी संवाद साधताना जाणवली. इंग्लिश मिडीयम मधे शिकणाऱ्याचं प्रमाण अधीक वाढल्यामुळे मराठी शाळा बंद पडल्यात तेव्हा मराठी भाषेचा प्रभाव कमी होऊ नये म्हणून पुस्तकांच्या माध्यमातून वाचन वाढले तर मराठी भाषा टिकून राहील.पोटाची भुक भागवताना वाचनाची गोडी निर्माण होऊ शकते हे आजींच्या लक्षात आले.आणि त्यांनी हॉटेल मध्येच पुस्तकाचं दानलं सुरू करून आपला आगळावेगळा छंद जोपासताना अनेकाचं लक्ष वेधुन घेतलं.मी सुध्दा आजींना *वळण* कथासंग्रह व *सुकलेल्या मातीच गाऱ्हाणं* कवितासंग्रह अशी माझी दोन पुस्तकं भेट दिलीत आणि खूप वेळपर्यंत साहित्यिक गप्पा करुन या हॉटेलला भेट देण्याचा अविस्मरणीय आनंद झाला.अशा पुस्तकांच्या गावाला एकदातरी कवितांची सहल घेऊन शब्दांचा उत्सव करायला हवा.हे हॉटेल नाही तर पुस्तकांच मंदिर आहे येथे लक्ष्मी, सरस्वती आणि अन्नपुर्णादेवी वास्तव्य आहे अलीकडच्या कालखंडात मोबाईलच्या जंजाळात अडकलेल्या आजच्या तरूण पिढीला पुस्तकं वाचण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे म्हणूनच जन्माला आल्यावर आपण चांगल्या ठिकाणी भेट देऊन आपल्या जन्माचे आणि जगण्याचं सार्थक करून घेण्यासाठी एकदातरी या आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलला भेट दिलीच पाहिजे.आपण पर्यटक म्हणून इतर ठिकाणी भेट देते.मग एक साहित्यिक,वाचक म्हणून या आजींच्या पुस्तकांच्या हॉटेलला एकदातरी भेट द्यायला काय हरकत आहे.काय ….शेवटी ऐकणं सांगेल.
संजय धनगव्हाळ
धुळे
Leave a Reply