दिवाळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करुन प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या ,आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे लावले जातात.
दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे, तसेच वात्स्यायनाच्या कामसूत्रातही हेच नाव नोंदलेले आहे. नीलमत पुराण या ग्रंथात या सणास “दीपमाला” असे म्हटले आहे. कनोजाचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नाटकात या सणाला “दीपप्रतिपदुत्सव” असे नाव दिले आहे. ज्योतिषरत्नमाला या ग्रंथात “दिवाळी” हा शब्द वापरला आहे.भविष्योत्तर पुराणात दिवाळीला “दिपालीका” म्हटले आहे, तसेच काल्विवेक या ग्रंथात तिचा उल्लेख “सुखरात्रि” असा येतो.व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथात “सुख सुप्तिका” म्हणून दिवाळी ओळखली जाते.
दिवाळी या शब्दातच दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाशकंदीलाचे महत्व विशेष होतेच.
नावे –
आकाशकंदील हा दिवाळी या सणाचा अविभाज्य भाग. रंगीबेरंगी आकाशकंदीलानी बाजारपेठा सजून जातात. घरोघरी विकत आणलेले किंवा स्वतः उत्साहाने तयार केलेले आकाशदिवे लावले जातात. या दिव्यांना संस्कृत भाषेत “आकाशदीप” म्हटले जाते. कानडी भाषेत गुडू दीप किंवा नक्षत्र दीप म्हणतात.
धार्मिक महत्व –
कार्तिक महिन्यात आकाश दिवा लावणे हे भारतीय संस्कृतीतील एक व्रत मानले गेले आहे. हा दिवा मांगल्य आणि समृद्धी यांचे प्रतीक मानला जातो. आश्विन शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या काळात सूर्यास्ताच्या वेळेला आकाशदिवा घराच्या परिसरात लावावा.
यज्ञाला योग्य असे लाकूड सर्वप्रथम जमिनीत खड्डा करून पुरून घ्यावे.आठ पाकळ्या असलेले दिव्याचे यंत्र तयार करावे.हे यंत्र उंचावर टांगण्यासाठी या पुरलेल्या लाकडाचा उपयोग होतो. संध्याकाळी त्याच्या आठ पाकळ्यात आठ दिवे लावावेत. या दिव्यात तिळाचे तेल वापरावे असा संकेत रूढ आहे. प्रत्येक पाकळीतील दिवा हा धर्म,हर,भूती,दामोदर,धर्मराज,प्रजापती,अंधारातील पितर व प्रेत यांच्यासाठी असतात असे मानले जाते. हा दीप देवाला अर्पण करावा. त्यावेळी –
दामोदराय नभासि तुलायां लोलया सह। प्रदीपं ते प्रयचामि नमः आनंताय वेधसे।। हा श्लोक म्हणावा असे धर्मसिंधु या ग्रंथात सांगितले आहे.
आधुनिक काळात नवनवीन संकल्पना वापरून आकाशकंदील तयार केले जातात, आवर्जून विकत घेऊन दिवाळीत घरावर लावले जातात. घरी तयार केलेला कंदील मुलांच्या उत्साहात भरच घालतो. अशा या आपण वर्षानुवर्षे लावत असलेल्या आकाशकंदिलाचा हा इतिहास आणि धार्मिक महत्व आपल्या दिवाळीच्या आनंदात नक्की भर घालेल.
— आर्या आशुतोष जोशी
छान माहिती