नवीन लेखन...

आकाशवाणीची लोकप्रियता

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात उमा दीक्षित  यांनी  लिहिलेला लेख.

वेळ साधारणपणे दुपारी १२.३० वाजताची. १२.०५ वाजता सुरू झालेला वनिता मंडळ कार्यक्रम पाककृती सांगण्यासाठी श्रोत्यांनी केलेले फोन घेण्यासाठी तयार होता. आषाढी कार्तिकी अगदी दोन दिवसांवर होती. त्यामुळे वारकऱ्यांच्या आवडीच्या भाजी भाकरीच्या आणि उपासाच्या पदार्थांच्या पाककृती हा आजच्या ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या सदराच्या ‘डायल इन’चा विषय होता. आकाशवाणीच्या संग्रहात असलेले एकापेक्षा एक अप्रतिम अभंग वाजवताना आणि वारकऱ्यांच्या विठ्ठलभक्ती बद्दल बोलताना जणू स्टुडिओत पंढरीच अवतरल्यासारखं वाटत होतं. पाककृती सांगणारे श्रोत्यांचे फोन एव्हाना सुरू झाले होते. श्रोते भरभरून वारीबद्दल बोलत होते आणि बरोबरीने एखादी मस्त चटकदार पाककृतीही सांगत होते.

एक फोन परत परत येत होता. आणि कट होत होता. कुणीतरी फोन लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतं. काही वेळाने या प्रयत्नांना यश आलं. लागला एकदाचा फोन. तिकडून उत्साहाने थबथबलेला गोड आवाज आला, ‘उमाताई, मी सायली थत्ते-गोडबोले दुबईहून बोलतेय, मी ऐकतेय वनिता मंडळ’. दुबईतल्या रखरखाटात आणि गगनचुंबी इमारतींच्या चकचकाटात माझ्या इथल्या घरात चक्क पंढरपूरच्या वारीचा माहौल निर्माण झालाय! इतकं मस्त वाटलं ते ऐकून. ‘ आकाशवाणीचे कार्यक्रम ती किती आवडीने ऐकते हे सायलीने भरभरून सांगितलं. एक छानशी पाककृतीही सांगितली.

एकदा माझ्या मोबाईलवर फोन आला. मी कार्यक्रमात सहभागी नव्हते. कार्यक्रम सुरू होता. मधुलिका दीपाली या आमच्या निवेदिका कार्यक्रम सादर करत होत्या. आजही ‘डायल इन’ होता. विषय होता ‘माझी झालेली फजिती’… मी मोबाईलवर आलेला फोन उचलला. ‘मला आजच्या वनिता मंडळात सहभागी व्हायचं आहे, पण फोन लागत नाहीये.’

‘बरं तुम्ही कुठे असता? ‘ मी विचारलं.

‘मी लंडूनहून बोलतोय’, तिकडून उत्तर आलं.

मला क्षणभर खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं.

allindiaradio.gov.in या वेबलिंकवरून जाते आहे.

आकाशवाणी साता समुद्रापार आकाशवाणीच्या लोकप्रियतेला नवं परिमाण मिळतं आहे. आकाशवाणीची लोकप्रियता एक परिपूर्ण शब्द. यावर्षी आकाशवाणीला ९२ वर्षे पूर्ण होतील. या वयातही ती तरुण आहे. उत्साहाने सळसळणारी तशीच आहे. नि:धर्मी, जातीभेदाच्या पल्याड, एकात्म भावनेला सतत खतपाणी घालत जगण्यातलं चैतन्य अबाधित ठेवण्याचं तिचं ध्येयही तसेच आहे. ‘बहुजन हिताय – बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याचा आव राखत त्याला अनुसरून कार्यक्रमांची निर्मिती करण्याची शिस्त आपल्या निर्मात्यांमध्ये बाणवणारी आकाशवाणी भारतभर पसरलेल्या आपल्या ४२० केंद्रांमध्ये श्रोत्यांमधली लोकप्रियता म्हणूनच टिकवून आहे.

विषयांचं प्रचंड वैविध्य, सगळ्या वयोगटांचा – विचार, विज्ञानाचं अधिष्ठान आणि सगळ्याला कल्पक सर्जनशीलतेची जोड हे आकाशवाणीच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य.

‘गंमत जंमत’ या लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमापासून ते ‘अमृत कलश’ या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमापर्यंत आणि स्त्रियांसाठीच्या वनिता मंडळ कार्यक्रमापासून ते शेतकरी बांधवांसाठीच्या ‘माझे आवार माझे शिवार’ पर्यंत अनेकविध कार्यक्रम श्रोत्यांना श्रवणानंद देतात.

खरंतर खासगी एफएम वाहिन्या आल्या तेव्हा आकाशवाणीची लोकप्रियता कमी येईल की काय असा धोका निर्माण झाला होता. पण या खासगी वाहिन्यांना आकाशवाणीच्या लोकप्रियतेवर आक्रमण नाही करता आलं. याचं कारण एक वरिष्ठ अधिकारी सांगतात,

‘The target audience of the private channels is the customer of this country and the target audience of the Akashwani & Doordarshan is the citizen of this country.’

भारतातल्या सर्वसामान्य नागरिकाला डोळ्यांसमोर ठेवून, तळागाळातल्या समाजाचा विचार करून स्त्रीसक्षमीकरणाला प्राधान्य देऊन आकाशवाणीचे कार्यक्रम केले जातात. शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम आणि चित्रपट संगीत हा तर आकाशवाणीचा आत्मा आहे. अनेक दिग्गज कलाकारांची ध्वनीमुद्रणे, अभिजात रंगमंचीय नाटकांचे नभोनाट्य रूपांतर आकाशवाणीच्या संग्रहात आहेत. जेव्हा जेव्हा आकाशवाणीच्या संग्रहातल्या या कार्यक्रमांचे प्रसारण होतं तेव्हा ती खरं तर श्रोत्यांच्यासाठी मेजवानी असते.

आपली कामं करता करता रेडिओ ऐकता येतो तर झालंच. पण रिमोटची गरज नसलेला आपल्या घरातलं एकमेव गॅझेट म्हणजे रेडिओ. आणि आता तर वेबलिंकमुळे जगभरात आकाशवाणीचे विविध चॅनल्स – ऐकता येतात. आकाशवाणीच्या बातम्या अजूनही ब्रेकिंग न्यूज झालेल्या नाहीत. त्यामुळे आकाशवाणीच्या बातम्यांचा एक वेगळा श्रोतृवर्ग आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ‘मन की बात’ सांगण्यासाठी आकाशवाणी हेच माध्यम निवडलं कारण त्यांना या माध्यमाची ताकद माहीत आहे. ‘सत्यमेव जयते’सारखा शो खासगी वाहिनीबरोबरच आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून ही व्हावा हा आमिर खानचा हट्टच होता.

तर अशी ही आकाशवाणी पूर्वी कामगार सभेची संकेत धून लागली की शाळेला निघायचं हे ठरलेलं असायचं. अशी आठवण आजही सांगतात. हा निव्वळ नॉस्टॅलजिया न रहाता वर्तमानातही लोकप्रियता मिळवणारी आकाशवाणी, गुणवत्तेच्या बाबतीत कधीही तडजोड न करणारी आकाशवाणी, मूळ तत्त्वांशी प्रामाणिक रहाणारी आकाशवाणी, आणि पुढच्या पिढ्यांचा विचार असणारं आजच्या काळातलं मुद्रित माध्यमाचा काही अपवाद वगळता कदाचित एकमेव माध्यम म्हणजे आकाशवाणी.

मात्र या ठिकाणी एक खंत व्यक्त करावीशी वाटते. आकाशवाणीत नवीन भरत्या नाहीत. निर्मात्यांची अनेक पदं रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या निर्मात्यांच्या पदोन्नतींना कित्येक वर्ष AD HDC असाच दर्जा असतो. यामुळे अर्थातच एका प्रचंड मोठ्या समाजजीवनाचंच नुकसान होणार आहे. कारण ज्या पद्धतीने श्रोत्यांची मनं घडवण्याचं प्रशिक्षण आकाशवाणीच्या निर्मात्यांना आहे ते पुढच्या निर्माता पिढीपर्यंत झिरपणार नाही.

आकाशवाणीची लोकप्रियता आजपर्यंत अबाधित आहे. याचे दाखले मात्र पुन्हा पुन्हा मिळतात. काही वर्षांपूर्वी आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून डॉ. वि. ना. श्रीखंडे यांचं ‘आणि दोन हात’ या पुस्तकाचं अभिवाचन प्रसारित केलं होतं. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त नाट्यकलाकार उदय सबनीस यांनी हे अभिवाचन केलं होतं. त्यावेळेस या पुस्तकाचे प्रकाशक पॉप्युलर प्रकाशन यांच्याकडे पुस्तकाच्या प्रतींच्या विचारणेसाठी फोन गेले. पॉप्युलरच्या अस्मिता मोहितेंनी तेव्हा आवर्जून कळवलं होतं… ‘आमच्या प्रती संपल्या पण श्रोतावाचकांचे फोन नाही संपले’. नुकतंच आम्ही ‘सय’ या ज्येष्ठ लेखिका – दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकाचं त्यांनी स्वतःचं केलेलं अभिवाचन प्रसारित केलं. प्रसारण सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी मला एडिटींगसाठी आणखी एक प्रत हवी होती ‘सय’ची. म्हणून मी ठाण्याच्या मॅजेस्टिकमध्ये गेले.

पुस्तकाच्या प्रती संपल्या होत्या. हीच आकाशवाणीची लोकप्रियता…

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात उमा दीक्षित  यांनी  लिहिलेला लेख.

उमा दीक्षित
कार्यक्रमप्रमुख, अस्मिता वाहिनी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..