एक वर्ष,सव्वा वर्षाचे मूल…मुंबई शहरात एकटं फिरतय..गर्दीतून..गाड्यांच्या मधून..रेल्वे ट्रॕक वरुन…मधेच कुठल्यातरी बाकावर झोपतय…भूक लागते म्हणून एक पडलेली गोळी खातो तर ती झोपेची गोळी असल्याने गाढ झोपी जातय..पुन्हा उठतय…आपल्या आईला शोधत फिरतय…
कुणी तुम्हाला एखाद्या चित्रपटाचा अर्धाअधीक भाग असा एखाद्या एक वर्षाच्या मुलावर चित्रीत झालाय हे सांगितले तर पटेल का?
माणसाचे आयुष्य अकल्पनीय आहे. ‘Truth is stranger than fiction’ असे मार्क ट्वेनचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. सिनेमाच्या पडद्यावर ज्या गोष्टी आपण काल्पनिक म्हणून पाहतो त्यात माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचेच प्रतिबिंब असते का, हा एक जुना वादाचा विषय. सिनेमॕटीक इलेमेंट म्हणून काही वेळी कल्पनेची फोडणी द्यावी लागते. तरीही सिनेमा पाहून बाहेर पडणा-या प्रेक्षकांना जे आपण पाहिलं तसे खरेच घडले असणार हे वाटत रहावे, त्यांना त्या विचाराने अस्वस्थ करावे, अशी ताकत काहीच सिनेमांमधे असते. ‘आखरी खत’ हा त्यापैकी एक.
माझ्यावर ‘आखरी खत’ या चित्रपटाची एक अजब मोहिनी आहे. याचे कारण जेंव्हा केबल टिव्हीने नुकतेच डोके बाहेर काढले होते तेंव्हा त्यावर येणारी काही मोजक्या चॕनेल्समधे एक होते ATN. या चॕनेलवर दुपारी हा सिनेमा नियमीत लागायचा. मी तेंव्हा काॕलेजमधे होतो. काॕलेजला सुट्टी असायची तेंव्हा केबलवर ‘पडीक’ असायचो. त्यामुळे चॕनेल बदलता बदलता या चॕनेलवर असेन व हा सिनेमा लागलेला असेल तर बोटं आपसूक स्थिरावायची. मग तो सिनेमा तिथून पुढे पाहिला जायचा.
आखरी खत हा चेतन आनंद यांचा चित्रपट. हकीकत, हिर रांझा यासारखे दर्जेदार सिनेमे देणारा हा आवलिया एक दिवस अचानक साधारण सव्वा वर्षाच्या एका मुलाला मुंबईत फिरायला सोडतो व सिनेमॕटोग्राफर जाल मिस्त्री यांना घेउन त्याच्या मागे त्याचे शुटींग करत फिरतोय अशी बातमी बाॕलीवूड मधे पसरली व काही जणांनी त्याला चक्क वेड्यात काढलं. राजेश खन्ना नावाचा एक नवा कलाकार व इंद्राणी मुखर्जी सारखी तितकी प्रसिद्ध नसलेल्या आभिनेत्री घेउन चेतन आनंद काय हा वेडेपणा करताहेत असेही लोक म्हणू लागले होते. पण अर्थातच चेतन आनंद यांना आपण काय करतोय व आपल्याला काय बनवायचय याची पूर्ण जाणीव होती.
कथा तशी नेहमीच्याच धाटणीची.. एक तरुण शिल्पकार गोवींद काश्मिरमधे आलेला आहे. ज्या गावात तो आहे तिथल्या एका साध्याभोळ्या मुलीवर लज्जोवर त्याचा जीव जडतो. तिलाही तो पसंत आहे. दोघे गुपचूप मंदिरात लग्न करतात. काही दिवसांनी तो शहरात परत येतो, त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करायला. नंतर तिला कळते की तिला दिवस गेले आहेत. तिची सावत्र आई लज्जोला विकून टाकते. लज्जो तिथून कशीबशी सुटते. एका मुलाला जन्म देते. आपल्या मुलाला कष्ट करुन सांभाळू लागते. पण तिची तब्येत खूप खराब होते आणि आपला अंत जवळ आलाय हे पाहून आपल्या मुलाला, बंटूला, घेउन शहरात येते व गोवींदला शोधत फिरु लागते. ब-याच प्रयत्नांनी गोवींदचा पत्ता मिळतो पण गोवींद तिच्यावर शंका घेतो व तिला स्विकारत नाही. म्हणून ती त्याला एक पत्र लिहीते व जेंव्हा तो घरी नसतो त्यावेळी त्याच्या दाराशी सोडते..हेच ते ‘आखरी खत’.
गोवींदला ते पत्र मिळते पण तोवर खूप उशीर झालेला असतो. लज्जो हे जग सोडून निघून गेलेली असते..त्याचे मूल शहरात हरवलेले असते. पश्चातापदग्ध गोवींद पोलीसांच्या मदतीने बंटूचा शोध घेउ लागतो. बंटू फिरत फिरत एका अनाथ आश्रमातल्या माणसाला सापडतो. तो त्याला घेउन येतो..खायला घालतो. रात्री आई स्वप्नात येते…तिच्या आठवणीत तो उठतो व त्या अनाथ आश्रमातून बाहेर पडतो. रात्रभर फिरत राहतो. त्याचा ट्रेस लागल्याने पोलीस व गोवींद शहरभर त्याला शोधत फिरत असतात. पहाटे पहाटे बंटू गोवींदच्या घराजवळ पोहोचतो. तिथे गोवींदने बनवलेला लज्जोचा पुतळा पाहतो..आईचा पुतळा बंटू ओळखतो व पुतळ्याला जाउन मिठी मारतो..तिचा पान्हा शोधू लागतो.
गोवींद दोन रात्र झोपलेला नसतो. तो व पोलीस परत येतात तेंव्हा बंटू त्यांना घरीच सापडतो..तो लज्जोच्या पुतळ्याला धरुन झोपी गेलेला असतो.
हा सिनेमा पाहताना तुम्हाला रडू आले नाही तर तुम्ही स्वतःला चेक करुन घेउ शकता. कारण कोणीही असो, डोळ्यात पाणी येणार नाही असे हा चित्रपट पाहताना होत नाही.
मुलांवर आलेले खूप चित्रपट आपण पाहिले आहेत. या चित्रपटातील मुले जराशी तरी कळत्या वयातील असतात. त्यांच्याकडून भूमीका करुन घेणं तसंही अवघडच असतं..इथे तर जेमतेम एक वर्षाचं मूल. मग चेतन आनंद या महाभागाने आख्खा चित्रपट (जवळ जवळ सत्तर टक्के भाग) त्याच्यावर कसा चित्रीत केला असेल? चेतन आनंद आणि जाल मिस्त्री या दोघांनाही यासाठी ‘लवून कुर्नीसात’. त्याकाळी त्यांनी आउटडोअर चित्रीकरणासाठी (मुख्यतः बंटूच्या मागे मागे फिरताना) हँडहेल्ड कॕमेरा वापरला. चित्रपटात निओ-रिॲलिझम चा इफेक्ट आणण्यासाठी कदाचित हा चित्रपट कृष्णधवल बनला. कारण १९६६ साली रंगीत पडदा भारतात अवतरला होता.
चित्रपटातील गाणी एकदम उच्च दर्जाची. रफीनी गायलेले ‘और कुछ देर न जा और कुछ देर ठहर’ हे अतिशय तरल गीत खास खय्याम टच असलेलं. मन्ना डे यांनी म्हंटलेले एक पार्टी साँग ‘ओह माय डार्लिंग’ हे तितके प्रसिद्ध नाही पण छान आहे. असेच एक क्लब साँग भूपिंदर सिंग यांनी पडद्यामागे व पडद्यावर देखील गायलय..’रुत जवाँ..जवाँ..रात मेहेरबाँ..’ खूप साॕफ्ट व छान लयीतलं हे गाणं तस खय्याम पठडीतलं नाही पण तरीही श्रवणीय.
पण या चित्रपटातील कळसाध्याय अर्थातच लता दिदींच्या आवाजातील दोन गाणी..
पहिलं अर्थात सदाबहार गीत ‘बहारों..मेरा जीवन भी संवारो..कोई आयें कहींसे..यूं पूकारो..बहारो..’ गोवींद भेटण्याआधी लज्जो तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला साद घालते तेंव्हाचं हे कमालीचे सुंदर गीत..माझ्या स्वतःच्या टाॕप टेन मधील एक.
दुसरं गाणं आहे एक अंगाई..’मेरे चंदा..मेरे नन्हे..तुझे अपने सिनेसे कैसे लगांउ..’ लज्जो मृत्युनंतर बंटूच्या स्वप्नात येउन ही अंगाई गातेय..गोवींद रस्तो-रस्ती झोपलेल्या लोकांमधे त्याच्या मुलाला शोधतोय. बंटू एक चर्चच्या आवारात झोपलाय..सकाळ होताच तो पुन्हा उठून रस्त्यावरुन फिरायला लागलाय..अशी या गाण्याची पार्श्वभूमी. लताजींनी या गाण्यात प्राण ओतलाय..
कैफी आझमी व खय्याम ही बाप माणसं का होती हे तुम्हाला ही गाणी ऐकून पटतंच.
असो. चित्रपटाने रिलीजच्या वेळी फारशी कमाई केली नाही. राजेश खन्नाचा हा पहिलाच चित्रपट. पण त्याकाळी तो स्टार नव्हता. पण नंतर राजेश खन्ना सुपर स्टार झाला. त्यानंतर या चित्रपटाने रिपीट रिलीज मधे कमाई करीत खर्च वसूल केला.
चित्रपट विलक्षण होता..व त्याच्या आख्यायिका त्याहून विलक्षण.
मार्क ट्वेनचे वाक्य म्हणूनच इथे चपखल लागू होते..
Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn’t.
कोण जाणे असे किती बंटू रस्त्यांवर आजही फिरत असतील..
— सुनील गोबुरे.
सांगली.
Leave a Reply