पावसाची वाट बघता बघता
सरी लागल्या कोसळू
राने झाली हिरवीगार
नद्या लागल्या ओसंडू !
वाऱ्याची थंड झुळूक
करी मना आनंद
सगळा आळस क्षणात
जाई कुठे पळून !
मोरांचे थुईथुई नाचणे
सांगत होते आले मेघ दाटून
बरसला मनसोक्त
हातचे काही न राखून !
घरांच्या छपरावरून वाहणारे पाणी
पडत होते पाघोळ्यांनी अंगणात
प्रत्येक थेंबाचे होत होते बुडबुडे
साचलेल्या पाण्यात !
बुडबुड्यांचे वेगळे विश्वव
वेगळी चमक, आकार आणि रंग
थरथरणारे इंद्रधनुष्य
आणि न मावणारे जग !
बुडबुड्यांच्या फुटण्याचा एक वेगळाच नाद
वाटत होते एकमेकांशी करीत असावेत संवाद
एकमेकांच्या बोलण्याचे शब्द पडले कानात
वर्षानंतर भेटलो करावया पुन्हा सुसंवाद !
खळखळणाऱ्या नद्यांचे फेसाळणारे पाणी
ओसंडत होते धबधब्यातून
चिंब भिजताना
त्या आठवणी जाग्या झाल्या मनातून !
जगदीश पटवर्धन
Leave a Reply