नवीन लेखन...

आली दिवाळी..

गणपती गेल्यानंतर वेध लागतात ते नवरात्राचे व त्यानंतर येणाऱ्या दसरा दिवाळीचे..दुकाने नविन कपड्यांनी सजू लागतात, सेल सुरू होतात..वर्तमानपत्रांत इलेक्ट्रॉनिक वस्तू, गाड्यांच्या मोठमोठ्या जाहीराती प्रसिद्ध होऊ लागतात अन् चाहुल लागते ती दिवाळीची..आणि दिवाळी म्हटलं की हटकून आठवतं ते अजरामर बालगीत–

“दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुनाच्या, लक्षुमनाच्या..
लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी,
वाघाच्या पाठीत घालीन काठी..!!”

मऱ्हाठी समाजाच्या पिढ्यानपिढ्या या गाण्याने पहिली दिवाळी साजऱ्या करत आल्यात.आणि अजूनही मऱ्हाटी कुटुंबातील लहान बाळाच्या हातात फुलबाजा देऊन त्याची दिवाळी याच गाण्याने साजरी केली जाते ..

तसा शहरी जीवनात आपल्याशी गाई-म्हशींचा संबंध कधी येत नसूनही शहरातली मराठी दिवाळी सुरू होते, ती याच गाण्याने, असं का? आणि मुळात गाई-म्हशी आणि दिवाळीचा काय संबंध?

आपण दिवाळी का साजरी करतो याचं गुपित या लोकगीतात दडलंय..!

तर, शहरात अत्यंत थाटामाटात व झगमगाटात आपण साजरी करत असलेल्या श्रीमंत दिवाळीची मुळं आपल्या ग्रामिण संस्कृतीत, गावाकडच्या मातीत रुजलेलीआहेत.. आपल्यासाठी दिवाळी म्हणजे नविन कपडे, फटाके, फराळ, कंदील आणि चार–सहा दिवसाचा आनंद येवढाच तपशील असतो, तर गावाकडे दिवाळी हा गत वर्षभरात निसर्गाने केलेल्या कृपेला स्मरून, नवीन वर्षातही अशीच कृपा आमच्यावर ठेव असं सांगत निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा असतो..आपल्या इतर सर्व सणांप्रमाणेच दिवाळी हे आपल्या प्राचीन व समृद्ध ‘कृषीसंस्कृती’चं आपल्याला देणं आहे..

पावसाळा संपून दसऱ्याला नवीन पिकांची कापणी झालेली असते..नविन पिकांच्या राशी खळ्यात सांडलेल्या असतात…अशाच वेळी शरद ऋतूच्या ऐन मध्यात,आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात, दिवाळी हा सण येतो..घरात नव्याने आलेल्या धान्यरुपी दौलतीची व ती ज्यांच्यामुळं प्राप्त झाली त्या गो-धनाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘दिवाळी’ सण साजरा करण्याची सुरूवात आपल्या ‘कृषीसंस्कृती’त प्राचीन काळी झाली ..भूमातेने भरभरून दिलेल्या पिकातून स्वत:च्या वापरापुरतं धान्य घरात ठेवून जास्तीचं धान्य विकलं जायचं व त्यातून आलेल्या पैशातून घर बांधणी, घर दुरूस्ती, घराची रंग-रंगोटी, घरच्या लक्षुमीला एखादा सोन्याचा डाग व घरातील सर्वांनी नविन कपडे केले जायचे , घरात गोडधोड केलं जायचं , एखादी नवीन बैलजोडी खरेदी केली जायची .. ही प्रथा आपण शहरातही अद्याप जिवंत ठेवलीय..शहरात दिवाळीच्या निमित्ताने आपण फराळाचे पदार्थ करतो, घराला रंग काढतो, एखादी महागडी वस्तू किंवा दागीने घेतो, शहरात बैलजोडी ऐवजी गाडी घेतली जाते… या प्रथेचं मुळ आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीत सापडतं..

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.. दिव्यांचे महत्व जगातील सर्वच मानवी संस्कृतीत आढळतं..अग्नीच्या शोधानंतर पशूच्या पातळीवर जगणारा आदिम मानव खऱ्या अर्थाने ‘मानव’ म्हणून उत्क्रांत झाला असे म्हटले तर चुकणार नाही..अग्नी हे मनुष्याला मिळालेलं सर्वात मोठ वरदान आहे..आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत माणसाच्या जीवनातील बाळाच्या जन्मापासून ते चितेवर दहन होईपर्यंतचे सुख-दु:खाचे सर्वच प्रसंग अग्नीच्या साक्षीनेच साजरे होतात..दिवाळी हा कृषिसंस्कृतीतील सर्वात महत्वाचा सण आणि या महत्वाच्या सणादिवशी दिव्यांचा लख-लखाट होणे अगदी स्वाभाविक आहे..दिवाळीत दिव्यांचे महत्व आहे ते त्या अर्थानेच..अग्नीने मनुष्याच्या दैनंदिन व सांस्कृतीक जीवनात येवढे महत्वाचं स्थान का प्राप्तं केलं, यावर पुन्हा कधीतरी स्वतंत्रपणे लिहिण्याचा मानस आहे..

ग्रामीण संस्कृतीतूनच शहरी संस्कृती उदयाला आल्यामुळं गावाकडची दिवाळी शहरातही आली..मात्र शहरीकरणाच्या वेगात दिवाळीचं रुपड साफ पालटून तो एक शहरी इव्हेन्ट झाला..असं असलं तरी शहरातल्या दिवाळीची सुरुवात आज हजारो वर्षानंतरही ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी..’ याच गाण्यानं होते… गावातून आलेल्या चाकरमान्यानीच शहर वसवलं असल्याने त्यांच्याबरोबरच गावातलं गाण शहरी जीवनात आलं, काळाच्या ओघात त्याचा अर्थ मागे पडला मात्र ते शहरातही पक्कं रुजलं..!

शहरातल्या घाईगर्दीत आपण अनेक गोष्टींसाठी शोर्टकट्स शोधत असताना मुळ उद्देश अपरिहार्यपणे बाजूला पडत असतो, तसच दिवाळीचही झालं..हा सण किंवा कोणताही सण आपण का साजरा करतो हेच आपण काळाच्या ओघात विसरून गेलो..परंतू आपल्या मुळ संस्कृतीची मुळं इतकी घट्टअसतात, की ती त्यांची ओळख, त्यांचं आपल्याशी असलेलं सख्खं नातं कोणत्या न कोणत्या रुपाने टिकवून ठेवत असतात.. आपलं ग्रामीण संस्कृतीशी असलेलं तेच नातं ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ या गाण्यातून चिवटखपणे टिकून राहिलेलं दिसतं..अर्थात प्रांता प्रांतानुसार हा सण साजरा करण्यात वेगळेपणा जरूर असतो मात्र मुळ सण शेतीचाच हे सत्य त्यात असतच..

आपल्या प्राचीन कृषीसंस्कृतीतील आत्यंतिक महत्वाच्या दिवाळसणाची सुरवात ‘वसुबारस’पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते..आपण वर्षभर वाट पाहात असतो, असा एकूण सहा दिवसांचा हा सोहळा..

दिवाळी संपली, की मग त्या वर्षातल्या सणांचीही सांगता होते व पुन्हा नविन वर्षात मकर संक्रमणाने हेच चक्र नव्याने सुरु होते, पुन्हा सर्व सण ओळीने येत जातात. आपण जुने होत जातो पण सण मात्र नव्याने भेटत जातात. मला तर वाटतं, की सणांमुळे जगायला मजा येते. सणांची वाट पाहात पाहात आयुष्य कसं सरतं हेच कळत नाही..

वर्षांतून केवळ मोजके सण साजरे करणारे त्यांतं आयुष्य कसं काढत असतील हा प्रश्न मला अनेकदा पडतो. ते कसंही असलं, तरी आपल्या इतकं समृद्ध नसावं हे नक्की. म्हणून तर इतर धर्मीय आपल्या आयुष्याचा वेळ लढाया किंवा धर्मप्रसार करण्यात घालवत असले पाहिजेत असं मला वाटतं..! विविध जाती-पंथांमधे हिन्दू टिकले, त्याचं मोठं श्रेय निसर्गाच्या कलाने चालणाऱ्या आपल्या कृषीसंस्कृतीतील सणांना आहे असं मला वाटतं. आणि जसजस शेती आणि शेतकऱ्याचं महत्व कमी होतंय, तस तसं सणांचाही आनंद कमी होत चाललाय असंही माझं निरिक्षण आहे, काळजी करण्यासारखं जर काही असेल, तर ते हेच..सण संपले की मग आपणही संपू असं मला राहून राहून वाटतं..!

‘वसुबारस’ ते ‘भाऊबीज’ अशा दिवाळीच्या प्रत्येक दिवसाची माहिती मी त्या त्या दिवशी देईन..!

– नितीन साळुंखे
9321811091

‘दिवाळी’वरील लेखमालिकेतील हा पहिला लेख. ही माझी संपूर्ण लेखमाला साप्ताहीक ‘लोकप्रभा’, दि २८.१०.२०१६ मध्ये गतवर्षी प्रसिद्ध झालेली आहे..!

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..