तर सांगत काय होतो, मध्यंतरी आमच्याकडे नेहमी झाडू पोछा करायला येणारी मुलगी, तिची तब्येत बिघडल्यामुळे यायची बंद झाली, आणि पोछाचं काम माझ्यामागे लागलं. डॉक्टरनी तिला पूर्ण विश्रांती, म्हणजे आपल्या भाषेत bed rest सांगितली होती. डॉक्टरनी सांगून त्यांचं काम केलं, पण तिला घरी बसून पोटाला कोण घालणार ? घरभाडं, मुलांची शाळा, पोटपूजा यासाठी हालचाल करणं भाग होतं. बरं तिच्या कामाची पद्धत पाट्या टाकण्याची नसल्यामुळे, काम व्यवस्थित चालायचं. आमच्याकडे नवीनच कामाला लागली तेव्हाची गोष्ट, बेडरूम मध्ये पोछा करत होती, अचानक मी बेडरूम मध्ये काही घ्यायला आलो, तर ही मुलगी कुठेच दिसेना. आयला, म्हटलं हा काय प्रकार ? मी घाबरून बायकोला हाक मारणार, इतक्यात बेडखाली हालचाल जाणवली. पहातो तर ही पोछा करताना पूर्ण बेडखाली गेली होती. असो,
अखेर तिनेच या सगळ्यावर मार्ग काढून, फक्त झाडू पोछा करण्याची घरं (म्हणजे आमच्यासारखी) वगळून, जिथे झाडू पोछा सहित भांडी अशी एकत्रित कामं असलेली तिची घरं होती तेव्हढीच करायची असा निर्णय घेतला. त्यामुळे तिचं दहा ठिकाणी फिरणं कमी झालं, घरी लवकर जाता येऊ लागलं आणि अर्थात मिळकतही सुरू राहिली.
“आम्हाला दुसरी कुणीतरी दे ना कामाला”,
अशी आम्ही तिच्यामागे भुणभुण सुरू ठेवली होती. अखेर एक दिवस देवाने माझी प्रार्थना ऐकली वाटतं, आणि एक केरळी, मध्यमवयीन बाई हजर झाली. काळीसावळी, प्रकृतीने दणदणीत, मितभाषी, कपाळावर कुंकवाचा मोठ्ठा टिळा. बायकोचं तिच्याशी बोलणं होऊन, कामाला येणं नक्की झालं. मी आतल्या खोलीतून कान लावून तयारीत उभा होतो. उगाच बोलणी फिसकटायला नको. बोलणी यशस्वी झाली, तसा मी सुटकेचा निःश्वास सोडला.
दुसऱ्या दिवसापासून ती कामाला येऊ लागली. आता आमच्याकडे कामाला एखादी बाई येऊ लागली, की माझी बायको ती टिकून राहावी यासाठी, तिला शक्य होईल तेव्हढी मदत करते. म्हणजे ती येण्याआधी सामान हलवून ठेवणे, पाणी, फ्लोअर क्लिनर घालून पाण्याची बादली सज्ज ठेवणे, दरवाजाकडचं पायपुसणं उचलून ठेवणे, सगळे फॅन आधी बंद आणि मग सुरू करणे इ. इ.. असो,
आता या नवीन बाईंनी काही दिवस काम केल्यावर, आणि त्या काही दिवसातही दांड्या मारून झाल्यावर(मला त्रास, दुसरं काय) ती यायचीच बंद झाली. एक दिवस झाला, दोन झाले, तीन झाले……करतोय आपला पोछा मी…सांगता कुणाला ? आणि एक दिवस एक केरळी तरुण मुलगी दारात हजर झाली.
बायकोचं दिव्य आणि तिचं मोडकं हिंदी एकमेकांवर आदळू लागलं.
“कोण है ? क्या मंगताय?” इति बायको,
यावर काहीही न कळून ती बोलू लागली,
“काम करनेका, सास भेजा”
ही कोण भेजा खायला आलीय कळेना मला. पण बायको हुशार. तिला लगेच समजलं की आपल्याकडे कामाला असलेल्या बाईने च हा नवा पार्ट पाठवलेला आहे. आधीच तिच्या सुट्ट्यानी बायकोचं डोकं फिरलेलं होतं,
“है किधर….. तेरी…. तुम्हारी सास ? हां बोलो ना…? थोडा… थोडे दिन काम किया और आता गायब झाली. कितना छुट्टी ? हां? क्या है ये? बोलो ना ? ऐसा चलता है क्या ?”(प्रश्नांवर प्रश्न)
“रोज वाट देखते…वाट पहाणेला काय म्हणतात रे ?
“राह देखना”, मी
हां राह देखते…..बैठनेका क्या ? वाट देख देखके फिर कंटाळा आता है ना काम करनेका ? बोलो ना ?”
एव्हढ्या प्रश्नांचा भडिमार केल्यावर एक क्षण विश्रांती घेतली आणि….
“है किधर वो अभी ? बोलो ना ? तुमको भेजा और आपण गायब हो गयी? क्या…? बोलो ?”
बायकोचा पट्टा सुरू होता आणि ती आलेली मुलगी मात्र, काहीही समजत नसल्याने तोंडाचा आ करून हिच्याकडे फक्त पहात होती. तिला या भडिमारातलं ओ की ठो कळलेलं नव्हतं. अम्मा काही कारणाने रागावली आहे एव्हढच बायकोच्या अविर्भावावरून तिला कळत होतं, आणि ती वेड्यासारखी अधूनमधून मान उभी आडवी हलवत होती. अखेर बायकोच्याही हे थोडंफार लक्षात येऊ लागलं,आणि हिने जरा उसंत घेतली. इतक्यात पहिल्यांदाच ती मुलगी वदली,
“सास भेजा!काम करनेका…”
इतकंच, यातून घ्या जे समजून घ्यायचय ते. पण हे वाक्य…sorry हे दोन शब्द ऐकून, मला मात्र खूप आनंद झाला. मी उत्साहाने लगेच हिला म्हटलं,
“अगं, तिच्या सासूचं नंतर बघू , आधी तिला काम करुदे.”
बायकोच्या हा मुद्दा लक्षातच आला नव्हता अहो. मग ती proper घरात आली, हिने तिला सगळं काम सविस्तर सांगितलं, तिला काहीही कळलं नाही. अखेर बायकोने खुणेने पुन्हा सगळं सांगितलं( मी खुणेने सांगितलं असतं, पण उगाच गैरसमज व्हायचा) आणि तिने एकदाचं काम आटोपलं. काम झाल्यावर तिचं पुन्हा सुरू झालं……
“सास गाव में, कोई मर गया….” (घ्या समजून)
आणि पिशवीतला मोबाईल काढून तिने सासूला फोन लावायला सुरवात केली.
“तेरी सास को फोन लगाव ना, मेरेकु बात करने दो….”
चेहऱ्यावर काहीही भाव न येता, ती फक्त नंबर लावत होती, आणि तिकडून कुणीच उचलत नव्हतं.
“नही उटाता……”
असं म्हणून ती निघाली. मी घाईने बायकोला म्हटलं,
“अगं उद्या येणार का विचार ना”(मला डोळ्यांसमोर पोछा दिसत होता)
कधी नव्हे तो माझ्या मुद्द्याला विचारात घेऊन ही वदली,
“सूनो, नाम क्या है तेरा?”
मी वैतागत,
“अगं नावाचं जाऊदे, उद्या येणार का विचार ना.”
“बरं कळलं, ओरडू नकोस” , इति बायको.
“कल….(हात हवेत फिरवून कल दाखवून) कल आयेगी ना? क्या ??”
यातलं कल एवढं तिला कळलं असावं, म्हणून तिने होकारार्थी मान हलवली, आणि तिच्या होकाराने माझा जीव भांडया…..पोछात पडला.
त्या दिवसापासून हा नवा पार्ट आमच्याकडे रुजू झालाय. बायकोला तिच्याशी फारसा संवाद साधता येत नाही आणि तिला खाणाखुणांशिवाय किंवा एखादं दुसऱ्या शब्दाशिवाय बोललेलं काही कळत नाही.
मधूनच ही विचारते तिला,
“सास कभी आयेगी तेरी ?”
यातलं सास एव्हढच तिला कळतं, आणि लगेच आज्ञाधारक मुलाप्रमाणे,
“सास”, असं म्हणत ती फोन लावत रहाते. पलीकडून कुणी फोन उचलत नाही, मग ती म्हणते,
“नई उटाता सास” (काय ते समजून घ्या)
अर्थात आमचं काम होतंय हा आनंदाचा भाग आहेच, पण ही, तिची खातिरदारी करायची मात्र सोडत नाही,
“दमते रे ती, दमलेली दिसते नेहमी. तान्हं मुल आहे पदरात. काय करेल ? तिला काहीतरी खायला देते.”
आता काम पूर्ण झाल्यावर तिला प्यायला पाणी लागतं. ठीक आहे ना, दे तिला पाणी. एक नाही दोन ग्लास भरून दे. पण हीचं तसं नाही, तिचं काम पूर्ण व्हायच्या आत, ही दुसऱ्या काही कामात व्यस्त असेल, तर गडबडीने भरभरा आपलं काम सोडून, पाण्याचा भरलेला ग्लास आणून एकदाचा ठेवते. सध्या ही पायाच्या दुखण्याने आजारी आहे, आणि डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय. म्हणजे नशीब बघा कसा खेळ खेळतं, झाडू पोछा करणारी मिळालीय हा आनंद मानायचा तर असा पिट्ट्या पडतोय. गंमत म्हणजे, झोपलेल्या स्थितीत … बेडरूममधून ओरडते,
“अरे, तिला पाणी दे रे प्यायला, तहानलेली राहील नाहीतर”
मी हो म्हणतो, पण नेहमीप्रमाणे हिने ते ऐकलेलं नसतं. मग परत,
“अरे, पाण्याचा ग्लास ठेव भरून, तिला पाणी लागतं प्यायला.”
मी वैतागून,
“ठेवलंऽऽऽय”
बरं ती मुलगी पण अशी बिलंदर, की कधी मी विसरलो तर मला सांगायचं की नाही पाणी द्यायला ? पण बेडरूमचं दार उघडून हिला जाऊन सांगते,
“अम्मा पानी”
झाऽऽऽऽलं, लगेच सुरू होतं,
“अरे तुला किती वेळा सांगितलं, पाणी भरून ठेव म्हणून. तहान लागते रे, असं तहानलेलं ठेवू नये. मी उठू का ?”
म्हणजे जणू काही, मी तिला साधं पाणी द्यायला ठाम नकारच दिलाय. असो
तर सांगायचं काय, की किती सहजपणे एखादी व्यक्ती आपल्या माथी मारली जाते पहा. म्हणजे आम्ही जिला कामाला ठेवलं होतं, तिने आपण यायचं बंद करून परस्पर दुसऱ्या कुणाला आमच्याकडे पाठवून दिलं. का केलं तिने असं हे विचारायला कोणताही पर्याय ठेवला नाही. आता नशिबाने ती मुलगी बरं काम करते म्हणून ठीक आहे. मी आनंदात कारण माझा पोछा सुटलाय, पण बायकोच्या मनात या मुलीला विचारायचं खूप काही असतं. पण हिचं दिव्य हिंदी तिच्या पचनी पडत नाही.
ती येते, काम व्यवस्थित उरकते आणि चालू पडते(पाणी पिऊन). फक्त हिने कधी सास शब्द मुखातून काढला, की तिचं फोन लावणं सुरू होतं, आणि अखेर नेहमीचे दोन तीन शब्द येतात,
“सास नई उटाता” संपलं……
प्रासादिक म्हणे
–प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply