भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्लीत १९५८ साली सुरू झाले. त्यानंतर २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झाले. नंतरच्या काळात आशियाई क्रिडा स्पर्धांच्या वेळी भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. तेव्हा अगदी मोजकीच चॅनेल असायची आणि कार्यक्रमसुद्धा अत्यंत दर्जेदार असायचे. या दर्जेदार कार्यक्रमातलाच एक कार्यक्रम म्हणजे शेतकरी बंधूंसाठी असलेला ‘आमची माती- आमची माणसं’ !
खरंतर पहिले केंद्र दिल्लीत सुरू झाल्याने आणि तब्बल १२ वर्षे त्यावर कार्यक्रम करण्याचा अनुभव घेतल्याने दूरदर्शनच्या अधिकार्यांना लोकांच्या गरजांसाठी कोणते कार्यक्रम करायला हवेत याची माहिती झाली होती. त्यामुळेच मुंबई केंद्र सुरु झाल्यावर आपण कोणकोणती सदरे सुरू करावीत, याचेही मार्गदर्शन मिळाले.
सुरुवातीला मुंबई दूरदर्शनवर काम करण्यासाठी दिल्ली केंद्रावरची काही अनुभवी माणूस मागवून घेतली गेली. मात्र बाकीचे सगळे दूरदर्शनचा अनुभव नसलेलेच होते. निदान कार्यक्रम तयार करण्याचा व तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अनुभव असवा या उद्देशान जागोजागच्या आकाशवाणी केंद्रांवरची माणसे दूरदर्शनवर आणली.
आकाशवाणी आणि दूरदर्शन यात काही साम्ये आहेत तसेच काही फरकही आहेत. लोकांना कोणते कार्यक्रम द्यायचे, त्याचा आराखडा कसा असावा, विविध विषयावरील माहिती देणारे तज्ज्ञ कोण आहेत, या गोष्टी दोन्ही माध्यमांना समान आहेत. पण आकाशवाणीवर चित्रे दाखवता येत नसल्याने तेथे शब्दांना फार मोठे महत्त्व असते.
आकाशवाणीवरील भाषणावरून श्रोत्यांपुढे त्याचे हुबेहुब चित्र दिसले पाहिजे. प्रत्यक्ष चित्र दाखवता येत नसल्याने जी कमतरता आकाशवाणीच्या माध्यमात आहे तीच दूरदर्शनची ताकद असते कारण दूरदर्शनवर चित्रे दाखवता येतात. यामुळे वक्त्याचा संदेश अधिक स्पष्ट होतो. त्यासाठी दूरदर्शनवर काम करणार्या व्यक्तींना अधिक कष्ट ग्यावे लागत. भाषणाला साजेशी चित्रे, दृश्ये, छायाचित्रे मिळवणे हा त्यातला कष्टाचा भाग असे आणि ती चित्रे योग्यवेळी दाखवणे हाही तितकाच महत्त्वाचा भाग असे. त्यावेळी आतासारखा मोठा चित्रसंग्रह किंवा व्हिडिओजचा संग्रह उपलब्ध नव्हता.
‘आमची माती- आमची माणसं’ या कार्यक्रमात अनेक कृषी-तज्ज्ञांच्या मुलाखती प्रत्यक्ष शेतावर घेतल्या जात. दृक-श्राव्य माध्यमातून एखादा रोग पडलेले पीक कसे दिसते ते नीट दाखवता येते. सकस फळ आणि रोगट फळ
यातील फरक चित्राच्या माध्यमातून नीटपणे दाखवता येतो. यामुळे शेतकरी वर्गामध्ये हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला.
आज दूरदर्शनवर असंख्य खाजगी चॅनेल्स आहेत. त्यातील काही कृषी-शेती या विषयाला वाहिलेली सुद्धा आहेत. मात्र याची पायाभरणी ‘आमची माती- आमची माणसं’ या कार्यक्रमाने केली असल्याने या कार्यक्रमाचे महत्त्व अबाधित आहे.
सुप्रसिद्ध कृषीतज्ज्ञ डॉ. यशवंतराव नेने एकदा म्हणाले होते की, मुंबई दूरदर्शनवरील शेतीविषयक कार्यक्रम महाराष्ट्रात ज्या गुणवत्तेचा असतो, तितका इतर राज्यांतील नसतो. यातच हा कार्यक्रम सादर करणार्यांचे योग्य कौतुक होते.
—
आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम खुप सुंदर आहे.
श्री. प्रधान साहेब,
आपला ‘आमची माती आमची माणसं’ या कर्यक्रमावरील लेख वाचला. ‘जुन्या’ काळातील टीव्हीच्या प्रोग्राम्सबद्दल माहिती नसणार्यांसाठी खूपच माहितीपूर्ण ठरेल. असेच लेख, ‘गजरा’, ’शब्दांच्या पलिकडले’, ‘प्रतिभा व प्रतिमा’ यावरीलही उद्बोधक ठरतील.
आपण लेखात, कृषीविषयक चॅनल्स् चा उल्लेख केला आहे. ते कोणते, कृपया कळवाल काय ?
स्नेहादरपूर्वक,
सुभाष नाईक.