महाराष्ट्राने ज्या लाडक्या व्यक्तिमत्वावर जीव ओवाळून टाकला त्या पु.ल. उर्फ भाईंचा जन्मदिवस येताच मी आठवणींच्या हिंदोळ्यांवर झुलू लागलो.
माझं वय होतं अकरा वर्षे. इयत्ता सहावी. एक दिवस आईने माझ्या हातात एक चिटोरा दिला व मला म्हणाली जोग काकांकडे जा आणि त्यांच्याकडे उतरलेल्या पाव्हण्यांची सही घेऊन ये. सही कशाला म्हणतात, ती कशासाठी घ्यायची असते हे न कळण्याच्या वयात अत्यंत अनिच्छेने मी जाण्यासाठी निघालो. जाता जाता आई ओरडली, ‘आणि हो, त्यांच्यासमोर शुंभासारखा उभा राहू नको, त्यांना काका म्हण आणि सही देण्याची विनंती कर.’ आमच्या घरापासून जोगांचं घर अगदी जवळ असल्यामुळे मी काही मिनिटातच तिथे पोहोचलो. पांढरा पायजामा आणि फिकट निळ्या रंगाचा झब्बा परिधान केलेले पाव्हणे कोणतं तरी गाणं गुणगुणण्यात तल्लीन होऊन झोपाळ्यावर झकास झोके घेत होते. सही घेण्याच्या भानगडीत त्यांची तंद्री भंग पावली तर काय होईल या कल्पनेने मला घाम फुटला. पण तरीही धीर एकवटून मी हळूच म्हणालो – ‘काका’. त्याचं माझ्याकडे लक्ष जाताच ते तत्परतेने म्हणाले ‘बोल पुतण्या’! ते मला पुतण्या वगैरे म्हणतील याची कल्पना नसल्यामुळे मी बावळटासारखा त्यांच्या तोंडाकडे बघू लागलो. त्यांनी मला झोपाळ्यावर त्यांच्या शेजारी बसवून घेतलं व म्हणाले ‘बोल कसा काय आलास?’ मी थोडाही वेळ वाया न घालवता त्यांच्यासमोर आईने दिलेला कागदाचा चिटोरा धरला व त्यावर सही देण्याची विनंती केली. मला त्या धर्मसंकटातून स्वतःची शक्य तितक्या लवकर सुटका करून घ्यायची होती. पण पाव्हणे काही मला सोडायला तयार नव्हते. त्यांनी मला विचारलं ‘ काय होतं असतं रे कुणाची सही घेऊन?’ माझा रडवेला झालेला चेहरा बघून त्यांना माझी कीव आली आणि त्यांनी सही देऊन व माझ्या पाठीवर थाप मारून मला पिटाळलं.
मित्रांनो, काही वर्षांनंतर कागदाच्या त्या छोट्याशा तुकड्याचं मोल मला कळल्यानंतर मी तो तुकडा आजपर्यंत प्राणपणाने जपून ठेवला आहे कारण त्यावर सही करणारे ते पाव्हणे होते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थातच अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे !
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply