या मित्रांनो सारे या,
सर्व मिळूनी खेळू या
खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे
मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते
खेळांना त्या समजून घ्या – – – 1)
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या
हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा
स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी
एकाच दमात भिडू मारू या – – – 2)
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या
खो खो मध्ये चपळाई चकमा देण्याची घाई
उलट सुलट बसे एकाच रांगेत दिसे
मिळता खो भिडूला पकडू या – – – 3)
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या
लपंडाव हा खेळ कसा लपलेल्यांना शोधत बसा
राज्य येते त्यावरती शोध घेई सभोवती
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – – – 4)
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या
आट्या पाट्या च्या खेळात कांही घरे आखतात
सीमेवरती दक्ष राहती घरात येण्या ते रोकती
चपळाईने घरात शिरू या – – – 5)
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या
एका पायाची गम्मत लंगडी आहे माहित?
उड्या मारीत पळावे भिडू सारे पकडावे
आखल्या रेषेतच खेळू या – – – 6)
या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या
एक दिलाने खेळू या आनंद सारा लुटू या
निरोगी सदा राही तो प्रफुल्ल मन बाळगतो
शीण अभ्यासाचा घालवू या – – – 7)
मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply