आमचं अन्न, आमची माती
आमचं धान्य, आमची शेती
कळेनाच कोणालासुद्धा
कुठून कोठे जाती !
–
आमच्या विहिरी, आमच्या सरिता,
आमचे निर्झर अन् सरोवरें
पडतिल कधि कोरडेठाक हे,
कोणां ना ठाऊकच रे !
–
वितळतील कां नद्या हिमाच्या
चढेल वरवर सागर-पाणी ?
बुडतिल कां काठाची शहरें ?
विचार हृदयीं कंपन आणी !
–
‘घडलें नाहीं असें आजवर
म्हणुनच, ना घडणार उद्याही’,
व्यर्थच आहे सें बोलणें
घटित उद्या कळणारच नाहीं !
–
ज़रा बघा रे होउन जागे,
भूमातेच्या नयनीं पाणी,
‘मला वाचवा’, भिक्षा मागे,
‘तऽरच टिकेल मनुष्यप्राणी’ !
*
आपली माणसं, आपली नाती
हलवुन उठवूया सर्वांना
पिढ्या-उद्याच्या ज़गण्यांसाठी
जिवंत ठेवूं पर्यावरणा .
– सुभाष स. नाईक
Leave a Reply