” विदर्भ स्पेशल पुडाची वडी/सांबार वडी पुण्यात कुठे मिळेल ” अशी चौकशी कोणीतरी करत होतं आणि माझ्या लक्षात आलं अरेच्चा, आपण तर या सिझनमध्ये एकदाच करून खाल्लीये सांभार वडी..आहाहा अगदी नाव काढलं तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटतंय.. वरचं खरपूस आवरण, आत हिरव्यागार कोथिंबिरीचं गच्च भरलेलं सारण..व्वा! माझी आजी फार छान करायची ही सांबार वडी, मस्तपैकी त्या बेसनाच्या पोळीला काळ्या मसाल्याचा हात लावून त्यावर ती कोथिंबिरीची जाड लेयर..खूप भारी लागायच्या खायला. ज्या लोकांना अजिबातही कोथिंबीर आवडत नाही असे लोक एक किती महत्वाचा पदार्थ मिस करतात याचे मलाच दुःख होते. हिवाळ्याच्या सिझनमध्ये किमान दहावेळा तरी या सांबार वड्या करून खाव्यात असे माझे प्रामाणिक मत आहे.
मी म्हणजे आम्ही सगळेच मुळात फार खवय्ये आहोत त्यामुळे सिझनप्रमाणे असे खास पदार्थ करून खाणे म्हणजे आमच्या घरात शास्त्र असतं ते..याला माझी मुलं अपवाद निघतील असं कसं होईल? परवालाच लेक म्हणाली, आई गं, गाजराचा हलवा कर ना पुन्हा, एकदाच केला होतास..आता हेही खरंच म्हणा, या सिझनमध्ये हलवासुद्धा खंडता कामा नये, एकदा केला की किमान चार दिवस तरी पुरायला हवा. हिवाळ्याची चाहूल लागली की आमच्या घरात येणारं दळणाचं स्वरूप बदलतं. एरवीच्या गहू, ज्वारीच्या सोबतीने बाजरी, मिसळीची भाकरी, थालीपीठ भाजणी, गव्हाचा जाडसर रवा, मुद्दाम दळून आणला जातो. घरचं लोणी झालं की तर मग बाजरीची भाकरी, त्यावर घट्ट लोण्याचा गोळा सोबत एखादी पीठ पेरलेली भाजी असा मेन्यू फिक्स असतो. लोण्यावरून आठवलं, आमचे चिरंजीव कधीही चकली खायला मागतात त्यामुळे चकलीची भाजणीही घरात असतेच असते. त्यासोबत लोणी किंवा अगदीच लोणी नसलं तर दह्यावर तो काम भागवून घेतो.
हिवाळ्यात सुटीच्या दिवशी कधी सकाळी मिरचीची भाजी भाकरी तर कधी मस्तपैकी बाट्या वांग्याची रस्सा भाजी असा बेत हमखास होतो. मग रात्रीच्या जेवणात दाल खिचडी, कढी खिचडी, दलिया असं हलकं काहीतरी करूनही भागतं. कढी म्हणजे आमच्या चिमणा ताईंची खूप फेव्हरेट, मोठ्या माणसांसारखी ती कढीच्या वाट्या मागून वाट्या वरपते.. पण या कढीच्या बाबतीत आम्ही फार पर्टीक्युलर आहोत बुवा..मध्यंतरी कुठेतरी जेवायला गेलो होतो तेंव्हा मला हळूच म्हणते कशी, ” आई यांना नाही जमलीये कढी.. मला नाही आवडत अशी येल्लो कलरची घट्ट कढी..”
वांगं सुध्दा आमचं तसंच फेव्हरेट बरं का, आमचं म्हणजे मोठ्या माणसांचं..बारीक वांगी असतील तर रस्सा भाजी, काटेरी छोटी वांगी असतील (स्पेशली विदर्भातील) तर वांग्याचं लोणचं.. म्हणजे फक्त तेलावर परतून केलेली भरपूर मसाला घातलेली भाजीच. अशी भाजी फ्रीज शिवाय देखील आठवडाभर सहज टिकते. घरात मेथी, मटार असं सगळं साग्रसंगीत असलं की मस्त मसाला भरीत अन बाजरीची वरतून तीळ लावलेली भाकरी, आहाहा काय फक्कड मेनू होतो हा म्हणून सांगू, कोणाला जेवायला बोलावले असेल की तर खासच करावा, नेहमीचं तेच तेच खाण्यापेक्षा हे फार उत्तम जमून येतं. अशाच मसाला भरताबरोबर आम्ही जाडसर दळून आणलेल्या कणकेचे पाणगे करतो अनेकदा, अगदीच तळाव्या एवढा पाणगा डायरेक्ट आचेवर खमंग भाजायचा, तो आपोआपच उकलतो, आतून बाहेरून मस्त तूप लावायचे अन भरीत, तूप गुळाबरोबर खायचा..सुख म्हणजे आणखी काय असतं! याच वांग्याला असं सगळं साहित्य नसलं तरी चालतं बरं का, भाजलेल्या वांग्याचं कच्चा कांदा, भरपूर कोथिंबीर, कच्च तेल घालून मस्तपैकी भरीत करायचं, बरोबर तव्यावर वाटलेला ठेचा अन भाकरी असली की आणि काहीही लागत नाही..
हिवाळ्यात, खरंतर वर्षभर सततच जेंव्हा केंव्हाही आमच्या परिवारात गेट टूगेदर ठरतात तेंव्हा मुद्दाम कढी गोळे, गोळा भात, शेव भाजी, मिरचीची भाजी भाकरी असे मेनू ठरवून केले जातात, नव्हेच घरातल्या अनेकांच्या आवडी निवडी नुसार आम्ही मुद्दाम असे मेनू ठरवतो. बाहेर गावाहून येणारं कोणीतरी अगदी आवडीने हुरडा आणतं. तेंव्हा भाजलेला तीळ टाकलेला हुरडा, कधी हुरड्याचा वाटून उपमा कधी हुरड्याचे वडे असे पदार्थ हमखास होतात. तुरीच्या ओल्या दाण्यांची आमटी, तुरीच्या कचोऱ्या देखील हिवाळ्यात आवडीने केल्या जातात, सोपा सुटसुटीत स्वयंपाक अन वेगळा मेन्यू. त्यात अनायसे मटार सिझन भरीस असतो, बाजारात मटारचे ढिगच्या ढिग दिसून येतात..मग मटार रेसिपीजना उत येणार नाही कसा..मटार कचोरी, मटार करंजी, मटार पराठे, ओल्या मटाराची उसळ, मटार पॅटिस असे अनेक पदार्थ करून खाल्ले जातात. त्याचबरोबर वर्षभर पुरावा म्हणून किलो किलोने मटार सोलून फ्रिजमध्ये भरून ठेवण्याचा कार्यक्रम देखील होतो.
माझ्या सासूबाई मोदकांची भाजी फार छान करतात, मस्त ओल्या नारळाचं खमंग सारण भरलेली भाजी पोळी, पराठा भाकरी कशाबरोबरही उत्तम लागते. मुख्य म्हणजे घरात भाजीला काही नसलं की ही भाजी म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे. खरंतर माझ्या सगळ्याच सासवा खूप सुगरण आहे, प्रत्येकीची काहीतरी खासियत आहे. कोणी थालीपीठ उत्तम करतं, कोणी कलसा वरण छान करतं, कोणी पिठपोहे छान करतं, कोणाचा चटण्या कोशिंबिरी करण्यात हातखंडा आहे..तर कोणी आधुनिक सगळे पदार्थ फार चवदार करतं. एकूणच काय तर या सगळ्यांमुळे आम्ही खवय्ये आहोत. एक मात्र नक्की, आम्ही पारंपरिक पदार्थ किंबहुना लॉस्ट रेसिपीज जसं की शेंगुळे, वरण फळं, उकड पेंडी, दह्याचं पिठलं, कैरी भात, चुबुक वड्या फार फार चवीने खातो.
असे आम्ही सारे खवय्ये आणि अशा आमच्या खाण्याच्या तऱ्हा..आम्ही खूप खातो आणि खाऊ देखील घालतो..अरेच्चा, गोडाचं तर राहिलंच.. आम्ही गोड पदार्थ देखील तितक्याच आवडीने खातो बरं का, खरंतर गोडाचे पदार्थ यावर स्वतंत्र लिखाण होईल, त्यातही प्रत्येकीची खासियत आहेच…तूर्तास एवढेच!
प्राजक्ता राजदेरकर
Leave a Reply