नवीन लेखन...

आम्ही स्वतंत्र आहो

(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )

आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
जागतीकरण मारी देशी उद्योगाला
इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’

शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
उघडलें दार आम्हिच, सार्‍या उगाच बाता
बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
‘जयकार’ झाकतो की – जन फोडतात टाहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
ठरवूं या – हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।

– – –
लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )

– सुभाष स. नाईक
( M- 9869002126).

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..