जन्म. २ जून १९५७
महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच महिला व्यावसायिक आणि उद्योजक आहेत. अशा मोजक्या पर्यंत कमी वेळात यशाचे शिखर गाठलेल्या उद्योजिका मीनल मोहाडीकर महाराष्ट्रासह ज्या ज्या ठिकाणी मराठी महिला उद्योजिका आहे त्या त्या प्रत्येक महिलेसाठी प्रेरणास्थान आहेत. कुठल्याही डेरेदार वृक्षाचे मूळ हे एका छोट्या बीजामध्ये असते. तसेच मीनल मोहाडीकर यांच्या व्यवसायाची सुरुवातही अशीच अगदी लहान गोष्टीतून झाली. मीनल यांनी कधीही मार्केटिंगचे वेगळे शिक्षण घेतले नव्हते. परंतु अनुभवाने त्यांनी मार्केटिंगच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारली ती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
मीनलताईंच्या व्यवसायाची सुरवातही अगदी साधेपणाने व लहान प्रमाणात झाली. मीनल यांनी ‘डीएमएलटी’ हा लॅबोरेटरी टेक्नशियनचा कोर्स करून लग्नानंतर लासलगावला १९८१ च्या सुमारास लँब सुरू केली होती. परंतु सर्वच स्त्रियांच्या आयुष्यात येणारे, संसार, बालसंगोपन इ जबाबदाऱ्या पार पडताना त्यांनी मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, मीनल यांची आई मुंबईत आपले बंधू ‘देसाई बंधू आंबेवाले’ यांच्या उत्पादनांची विक्री करत असत. साधारणपणे १९८८ चा सुमारास ‘देसाईबंधू आंबेवाले’ या नावाने मामांकडून सुरू असलेल्या व्यवसायात मीनल यांनी त्यात पदार्पण केले आणि दादरच्या वनिता समाज मार्फत पहिल्यांदा प्रदर्शनात देसाई बंधू आंबेवाल्यांची उत्पादने विकण्यास प्रारंभ केला, त्यावेळी ही संकल्पना तशी नाविन्याची होती, दरम्यान इस्टंट फुडने नुकता कुठे भारतीय बाजारपेठांमध्ये शिरकाव केला होता. त्यावेळी त्या उत्पादनांची उपयुक्तता हेरून मीनलताईंनी हिंदू कॉलनीतील एका दुकानाबाहेर इन्स्टंट पुलाव, छोले, बिर्याणीची पॅकेटस् विकण्याचा स्टाॅल लावला अन हातोहात खपवून दाखविला.
उद्योगाच्या ह्या छोटेखानी प्रयोगानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी ९ मे ते १३ मे १९९० रोजी दादर येथील सावरकर स्मारक येथे पहिल्या प्रदर्शनाचे आयोजन केले. याचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षा कमलताई विचारे यांच्या हस्ते झाले होते. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘आनंद ट्रेड डेव्हलपमेंट’चा जन्म झाला आणि घरगुती वस्तूंपासून मोठमोठ्या इलेक्ट्राॅनिक गॅसपर्यंतच्या खरेदीचे मुक्तद्वार अवघ्या महाराष्ट्राला मीनलताईंनी उघडून दिले. त्यांचा उत्साह पाहून मग माहेरच्या-सासरच्या मंडळीनी पाठिंबाही दिला आणि मग या उद्योगिनीच्या वाटचालीने वेग घेतला. त्यातही कौटूंबिक अडी-अडचणी होत्याच. मात्र थांबायचे नाही या मंत्राने वाट मिळत गेली आणि ‘कारवॉं’ बढता ही गया! या सर्व प्रदर्शनात अपना बाजारचे सुरेश तावडे व अपना परिवार तसेच लोकप्रभाचे संपादक प्रदीप वर्मा व त्यांची टीम यांचा पाठींबा मिळाला.
त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर त्यांच्या लक्षात आले कि महिला उद्योजिकांसाठी वेगळे व्यासपीठ स्थापन झाले पाहिजे.
त्यातून सर्वसामान्य उद्योगिनींसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून ८ मार्च १९९७ मध्ये ‘आम्ही उद्योगिनी’ या संस्थेची स्थापना करण्यात आली.
मीनल या आम्ही ‘उद्योगिनीच्या संस्थापक’ अध्यक्ष आहेत.
या संस्थेला २४ वर्ष पूर्ण झाली असून आम्ही उद्योगिनीच्या एकूण अठरा हून अधिक शाखा आहेत. महाराष्ट्र आणि गोव्या मध्ये ही संस्था आहेच पण आता बंगलोर आणि दुबईला देखील या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे .
मग एकामागोमाग एक यश प्राप्त होत गेले. आपल्याला सर्वांनी साथ दिली पण इतर महिलांना अशी हक्काची बाजारपेठ मिळावी या हेतूने महिला लघु उद्योजक उत्पादनांची प्रदर्शने भरवण्यास सुरवात केली आणि त्यांना विनामूल्य मार्गदर्शन सुरू झाले. ‘आनंद बाजार’ नावाच्या या मेळ्यांना गावोगावी भरवण्याचा उद्योग करताना समविचारी मैत्रिणींच्या सहकार्याची एक साखळी आपोआप तयार होत गेली आणि ‘आम्ही उद्योगिनी’चे काम देशात –विदेशात जाऊन पोहोचले. महिला उद्योगीनींना वस्तूंची कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी या हेतूने दादर येथे देसाई बंधू आंबेवाले दालन महिला उद्योजकांना उपलब्ध करून दिले.
मुंबई येथील सावरकर स्मारक मध्ये अपना बाजार आणि लोकप्रभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात आम्ही उधोगिनीने छोट्या महिला उद्योगिनींना कमी पैशात स्टॉल्स उपलब्ध करुन दिले. तेव्हा ‘आम्ही उद्योगिनीचे पहिले प्रदर्शन पार पडले. पुढे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी तसेच दुबई येथे अनेक प्रदर्शने झाली. ही प्रदर्शन करत असताना त्यांनी अनेक माणसे जोडली. आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरची पहिली महिला अध्यक्ष जर कुणी असेल तर मीनलताईंचे नाव सन्मानपुर्वक घेतले जाते. ‘मराठी माणसाने आपली नोकरी करावी’ या पराभूत मानसिकतेमधून जगणाऱ्या समाजात कोणत्याही पाठबळाशिवाय उभ्या राहिलेल्या मीनल यांनी २०१३ साली शारजात केवळ उदघाटन करून कुठलेही प्रदर्शन न भरवलेल्या इंडियन एग्झिबीशन सेंटर शारजा येथे प्रदर्शन केंद्रात, २०१४ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे यशस्वी उद्योजकांची बाजारपेठ प्रदर्शनाद्वारे नुसतीच आयोजित करुन दाखवली नाहीतर यशस्वी करून दाखवली. ज्या अरब देशात तेथील महिलांना देखील सार्वजनिक जीवनात असे कार्य करण्याची मुभा नाही तेथे जाऊन एका मराठी महिलेने हा नेत्रदीपक उद्यम यशस्वी केला. ही सर्वांनाच झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाइतकी भव्य-दिव्य वाटणारी गोष्ट होती. तसेच ह्या आयोजित प्रदर्शनात भाग घेतलेल्या महिलांना शासकीय योजनेच्या माध्यमातून अर्धी रक्कम परत देण्यात आली. या प्रदर्शनाच्या वेळी दुबईत स्थायिक झालेल्या महाराष्ट्र मंडळ दुबई, GMBF व आरती अशोक कोरगावकर यांची साथ मिळाली.
राज्याच्या उद्योग विभागाच्या मार्फत दिल्लीत आयोजित होणाऱ्या प्रदर्शनांपासून महाराष्ट्र मंडळांच्या आयोजनापर्यंत साऱ्या ठिकाणी ‘आम्ही उद्योगिनी’पोहोचली आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply