मन की बात..
“प्रत्येकाला आपण आनंदात असावं असं वाटणं हा मनुष्यस्वभाव झाला व आपल्यासारखंच इतरांनीही आमंदात असावं असं वाटण ही माणुसकी झाली..” हे पुलंचं ‘पाचामुखी’ या पुस्तकातलं वाक्य. किती गहन अर्थ भरलाय या वाक्यात..! पण होतं काय, की आपण ते वाचतो, पांच मिनिटं भारावल्यासारखं होतो आणि पुन्हा मी, माझं सुरू करतो..
सर्व आनंदी राहावेत असं सांगणारे पुलं काही पहिलेच नव्हेत..! ज्ञानेश्वरांनी पसायदानात हीच इच्छा व्यक्त केली होती तर कुत्र्याने पळवलेल्या रोटीवर तुपाचा चमचा सोडण्यासाठी कुत्र्याच्या मागे धावणरे संत एकनाथही याच जातकुळीतले..आपल्या तमाम संत-महात्म्यांनी हीच इच्छा व्यक्त केलीय..
पण जर का इतक्या सर्व मोठ्या लोकांनी दिलेली शिकवण खरोखरीच कोणी आत्मसात केली असती, तर आज आपल्या आजुबाजूला दु:ख औषधालाही दिसलं नसतं..पण तसं झालेलं दिसत नाही. संतांची शिकवण ही सुविचारांसारखी असते आणि सुविचारांचा उपयोग परीक्षेत चार-दोन मार्क मिळवण्यासाठी आणि इतर वेळी कालनिर्णयप्रमाणे भिंतीवर लावण्यासाठीच करायचा असतो, तो प्रत्यक्षात आणायचा नसतो याचंच प्रात्यक्षिक आपल्या आजुबाजूचं जग आपल्याला रोजच्या जगण्यातून नकळत देत असतं हे त्याचं कारण असावं हे कोणी नाकारणार नाही..
आनंद कशात असतो? खरं तर हा प्रश्न आनंद कशात नसतो असा हवा. आनंद प्रत्येक गोष्टीत असतो आणि तो सहज वाटताही येतो..लोकलने प्रवास करताना, एक तासाच्या प्रवासातला अर्धा तास उभ्या असलेल्या व्यक्तीला आपली सीट आॅफर करणं हा आनंद वाटण्याचा आणि वाटण्याचाही भागच आहे..मी तर अनेकदा प्रवासात देवाची पोथी वाचत प्रवास करणारी अनेक माणसं पाहातो. रोजच पाहातो. पण ह्या देवभक्त लोकांना शेजारी उभ्या असलेल्या एखाद्या वयस्क व्यक्तीला आपली जागा द्यावीशी वाटत नाही. हेच लोक मुंबईच्या गर्दीत जरा जरी धक्का लागला तर हातात पोथी घेऊन रागाने अर्वाच्य बोलायलाही कमी करत नाहीत. मग पोथी वाचून असं कोणतं पुण्य आणि पुण्य कमावल्याचा आनंद ह्या पोथीवाच्या लोकांना मिळतो हे तो भगवंतच जाणो..
आपण आनंद नाही वाटू शकलो तर किमान दु:ख तरी कुणाला देऊ नये. आता मला वाटत नाही कुणी कुणाला जाणून बुजून त्रास देत असेल म्हणून. अतिसामान्य, सामान्य, सेकंड क्लासची माणसं तर मुळीच देत नाहीत असं मी ठामपणे सांगू शकतो. उलट ही माणसं स्वत: त्रास सोसून दुसऱ्याला बरं वाटेल असं अगदी सहजतेने करत असतात, ते ही कोणताही मोठेपणाचा आव न आणता..पण माणूस जसजसा पुढे जातो, मोठा होतो (वयाने नव्हे, शिक्षण, पैसा अन् प्रतिष्ठेने) तेवढा तो दुसऱ्याचा आनंद हिरावून घेण्यात आमंद मानू लागतो. अर्थात यातही काही सन्माननीय अपवाद असतील, आहेत परंतू ते अपवादच..! आॅफिसातलं प्रमोशन मिळणार अशी पक्की खात्री असलेल्या एखाद्या कामसू माणसाला डावलून ऐनवेळी मर्जीतल्या एखाद्या माणसाला दिलं जातं. निवडणूकीचं तिकीट मिळणारच असा विश्वास असलेल्या हाडाच्या कार्यकर्त्याचं तिकीट एखाद्या नेत्याच्या मुलासाठी ऐनव्ळी कापलं जात..ही दुसऱ्याचा आनंद हिसकावून त्याच्या पदरात दु:ख टाकण्याचीच उदाहरण आहेत..
‘शिक्षण’ आणि त्यातून प्रकट पावलेल्या ‘विकास’ व ‘प्रगती’ या जोडप्याने माणसापासून माणूसकी हिरावून घेतली की काय असं मला वाटायला वागलंय हल्ली..माणूस जेवढा शिकतो तेवढी बुद्धी प्रज्वलीत होत जाते परंतू मन मात्र विझत जातं असंही मला वाटतं..पुल सांगतात ती माणुसकी मनात असते, तिचा बुद्धीशी काही संबंध नसतो..कठोर कवटीच्या सानिध्यात बुद्धी कठोर व आपल्यापुरताच विचार करते तर नाजुक हृदयाच्या सानिध्यातलं वढाय मन मात्र हळुवार वागतं..
म्हणून मला बुद्धीमान व्यक्तींपेक्षा उमद्या मनाच्या व्यक्तींचं प्रचंड आकर्षण आहे.. कारण अशाच व्यक्ती पुलंची, संतांची शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणत असतात..अशा व्यक्ती स्वत: आनंदात असतातच परंतू दुसऱ्यांच्याही जिवनात आनंद निर्माण करत असतात, अगदी सहजपणानं, त्यांच्याही नकळत..वाटणं हेच असतं..
उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही कळता कामा नये असं दानाच्या बाबतीत म्हणतात. आनंदाचंही तसंच असतं..आनंद वाटला असं वाटता कामा नये..तो सहज वाटला आणि वाटला पाहीजे..
– नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply