नवीन लेखन...

आणि बाळ हसले

अनघा दिवाळी अंक २०२१ मध्ये प्रकाशित झालेली सुप्रसिद्ध लेखिका भारती मेहता यांची कथा.


‘नारायण… नारायण..’ त्रिभुवनसंचारी नारद मुनींचा सुपरिचित स्वरकानी आला, तेव्हा यमाच्या कपाळावर आठी उमटली. याला कारणही तसच हातं. त्सुनामी, बाँबस्फोट, भूकंप, अपघात हे कमी झालय म्हणून आता करोना! मृत्युचे प्रचंड प्रमाण वाढल्यामुळे यमावर इतका कामाचा ताण वाढला की तो अगदी वैतागून गेला.

‘आता यांच्याशी बोलण्यात आणखी वेळ फुकट जाणार!’ असे मनात पुटपुटत असतांनाच ह्याला सुचले की यातून कदाचित नारदमुनी मार्ग दाखवू शकतील. म्हणून पुढे होऊन यम आदराने बोलला.

“वंदन करतो मुनिराज.’

“कल्याणमस्तु!”

“कसलं कल्याण घेऊन बसलात? अहो मान वरती करायला सवड नाही.”

“आं ऽ काय म्हणता काय यमराज?”

“काय सांगू? पृथ्वीवर लोकसंख्या वाढते आहे खरी पण मृत्युदरही तेवढाच वाढलाय.”

“तेवढाच कसा?”

“म्हणजे अगदी तेवढाच नाही हो जन्मापेक्षा मृत्यु पावणारांची संख्या नक्कीच कमी आहे”

“तेच म्हणतो मी. नाहीतर लोकसंख्या वाढली नसती ना?”

“ते सगळं खरं पण पूर्वीपेक्षा माझ्या कामात प्रचंड वाढ झाले त्याचं काय? तुम्हीच आता उपाय सुचवा मुनिराज.”

“त्यात काय? दुतांची संख्या वाढवायची.” नारदांनी त्वरित उपाय सुचविला.

“तोच विचार करतोय. पण इथले दूत जरा आळशीच बनलेत. काय करावं तेच कळत नाही. पृथ्वीलोकात कसं पगारवाढीच्या आशेने तरी काम करतात.”

नारदांनाही विचार पडला. डोक्याला हात लावून ते काही काळ आसनस्थ झाले तोवर दासींनी सरबताचे चषक भरून आणले. अचानक त्यांना काहीतरी आठवले.

“हं! आठवलं. आता येता येता मी मुंबापुरी नगरीवरुन येत होतो. एका भल्या मोठ्या ऑफिसमध्ये खूप गर्दी दिसली. सहज डोकावलो मला वाटलं काही नृत्याचा वगैरे कार्यक्रम असावा.”

“मग काय होतं?” उत्सुकतेने यमाने विचारले.

“एका कारकूनाचा निरोप समारंभ! भूलोकात ठराविक वयानंतर कामातून निवृत्त होण्याची रीत आहे.”

“छान, छान! इथे पण तशी काही व्यवस्था करता आली तर…”

“यमराज हा पृथ्वीलोक नाही. तिकडे वृध्दावस्था, आजारपण, मृत्यु यातून मानवाला जावे लागते. तुम्ही निवृत्त होऊन काय करणार?”

त्यातून वय झालं की माणसाला काम करणे त्रासदायक होऊ लागते. हां, तर मी काय म्हणत होतो… त्या कारकुनाची सर्वजण स्तुती करत होते. अगदी वरिष्ठ अधिकारी सुध्दा! स्तुतीबरोबर सुमनेही देत होते आणि भेटवस्तूही!

“इतका गौरव!”

“अहो, ही त्याच्या उत्तम कामाची पावती!”

“मग?”

“मग काय? त्याचं तिथलं काम संपलेलं दिसतंय. दूताकरवी आणा इकडे, आपल्या मदतीसाठी करा नेमणूक! नारायण.. नारायण!”

नारदमुनी निरोप घेणार इतक्यात यम म्हणाला.

“मुनिराज तुम्हीच म्हणालात की वय झाल्यावर माणसाला काम होत नाही -मग हा कारकून काम कसं करणार?”

“यमराज मी त्याला प्रत्यक्ष पाहिलंय. तो माणून त्याचं नाव अनिरूध्द अगदी तरतरीत… उत्साही वाटला. अजुन थकलेला दिसत नाही. त्यातून सध्या तरी मदत होईल. पुढचं पुढे बधू दुसरा कोणी आणू”

“हे बाकी खरं आहे. थांबा जरा मुनिराज… काही जलपान…”

“छे हो! रूक्मिणीदेवीकडे आता जायचय. तेव्हा थांबत नाही.”

प्रस्थान ठेवतो… नारायण… नारायण!

यमराजांनी पाहिलं पृथ्वीलोकाकडे तर अनिरूध्द सर्वांचा निरोप घेऊन घरी जाण्यासाठी बसस्टॉपकडे निघाला होता. दूताला सांगितले-

“झटकन जा.. तो अनिरूध्द घरी पोचता कामा नये.”

“पण महाराज आता तर एका बालकाचा मृत्युयोग आहे. तिकडे निघालोय आम्ही. गाडीखाली सापडून मृत्यु आहे त्याचा.”

“तो कारकून आहे ना तो त्या बालकाला वाचविण्यासाठी धाव घेईल. तो त्या बालकाला ढकलून दूर सारेल. त्यामुळे बाल मरता मरता वाचेल मात्र हा- काय नाव सांगितलं बरं- हां अनिरूध्द त्याच गाडीखाली सापडेल. मरता मरता एक सत्कृत्य त्याच्या खात्यावर जमा होईल.”

अशा तऱहेने अनिरूध्दची उचलबांगडी झाली. मात्र खाली हलकल्लोळ माजला फुलांचे गुच्छ-भेटवस्तु सर्व इतस्तत: पसरलं आणि पाचच मिनिटापूर्वी मजेत असणारा अनिरुध्द रक्ताच्या थारोळ्यात पाहून सर्व हळहळत होते.

यमाच्या दरबारात लगेच प्रवेश नसतो. जवळ जवळ पंधरा दिवस अनिरूध्द निश्चेष्ट होता. पंधराव्या दिवशी तो जागा झाला. डोळे चोळत चोळत त्याने सभोवताली पाहिले. “शिलू चहा!” असे रोजच्या सवयीने म्हणणार पण घरचे कोणीच दिसेनात. माणसांचे राहो पण स्वत:चे घरही ओळखू येईना.

सगळच अपरिचित. त्याला काही कळेना.

“हे काय? मी आहे तरी कोठे? उत्तर नाही”

पुन्हा तो रागानेच विचारू लागला-

“आधी मला सांगा तुम्ही कोण? आणि हा सगळा काय प्रकार आहे? मला घरी जाऊ द्या पाहू.”

“शांत हो. शांत.. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मी तुला दुतांमार्फत इकडे आणले माझ्या मदतीसाठी.” प्रेमाने सांगितले.

“तुम्ही कोण? कसली मदत हवी? नोकरी देणार असाल तर स्पष्टच बोललेलं बरं! नंतर कटकट नको”

“मी यम, हा माझा रेडा आणि बाकी सगळे दूत आहेत.”

“हा! म्हणजे नाटककंपनी आहे तर तुमची! खरं सांगायचं तर निवृत्त झाल्यावर छान आराम करण्याचा विचार होता माझा.”

अंदरकी बात अशी की निवृत्त होण्याआधीपासूनच दुसरी पार्टटाईम नोकरी मिळते का याच्या शोधात अनिरुध्द होता. पण आपण गरजू आहोत कळलं तर पगार वाढवून कसा मागता येईल? त्यामुळे गरज नाहीच असे भासवित होता.

“आम्ही कोणाला पगार बिगार देत नाही. सगळं मोफत काम करतात.”

“म्हणजे नाटककंपनी एकदम नवीन दिसते. की एकदम डबघाईला आले? मग ही यम आणि रेड्याची पौराणिक नाटके कशाला बसवता? ड्रेपरीचा खर्च वाढवायला? नाटक कसं हल्लीच्या काळानुरूप हवं. ठीक आहे तुम्हाला काय हवं ते करा. मी पाहतो काय झालंय ते? माझ्याकडे हिशोब ठेवायचं काम आहे का?”

कपाळावर हात मारून घेत यम म्हणाला-

“तुझी ती नॉनस्टॉप गाडी आधी बंद कर. किती बोलशील.. किती बोलशील? सत्यवानाला आणायला गेलो तेव्हा सावित्रीने अशीच बडबड लावली होती. ती सुध्दा यापेक्षा कमीच होती.”

“आँ? सावित्रीचं नाटक आहे? कोणती नटी करते तिचं काम? ”

“अरे बाबा, कसलं नाटक आणि कोणती नटी? तू आता भूलोकात नाहीस स्वर्ग आणि नरकाच्या मधे आहेस. आठवतय का तू निवृत्त झालास त्यावेळी निरोपसमारंभ सुरू होता-”

“बरोबर… मी आज निवृत्त झालो नाही का?”

“आज नाही त्या गोष्टीला पंधरा दिवस झाले.”

“पंधरा? इतके दिवस मी कुठे होतो?”

“आमची वेगळी कार्यपध्दती असते. त्याप्रमाणे 15 दिवस देखरेखीखाली ठेवावे लागते. ते तुला काही आठवणार नाही.”

“मला आठवतयना निवृत्तीच्या म्हणजे त्या निरोपसमारंभाला खूप मजा आली नेहमी मला पाण्यात पाहणाऱ्या कोठारेंनी पण किती स्तुती केली. वर्षावच स्तुतिसुमनांचा! तरी पण नंतर 15 दिवस? मला चांगलं आठवतंय मी फुलांचे गुच्छ आणि भेटवस्तु सर्व घेऊन बाहेर पडलो बसस्टॉपवर पोचण्यापूर्वीच विरुध्द बाजूने एक कार वेगात येत होती. शाळेतून घरी निघालेला एक छोटा मुलगा धावताना त्या गाडीखाली सापडणार हे पाहिल्यावर मी जोरात ओरडलो आणि त्याला बाजूला सारलं. ब्रेकचा खरकन आवाज आला कानावर. पुढचं नाही आठवत काही. त्या मुलाचं काय झालं पुढे?”

“वाचला तो. म्हणजे तूच वाचवलंस त्याला. तू मात्र गाडीखाली सापडलास म्हणून इकडे आणलं.”

“बाप रे! म्हणजे मी मेलोय असं म्हणा की चक्क! मी आपला भ्रमात मला नाटककंपनीत कशाला बोलाविले? ते काही नाही. मला घरी गेलं पाहिजे. घरी काय प्रसंग ओढवलाय… मुलगा, सून आणि माझी शिलू रडत असतील. जाऊ द्या मला.. नको तुमचं कसलं काम बीम मला.”

“आता काही बोलून उपयोग नाही, एकदा मृत्यु पावलेला मनुष्य जिवंत होतो का? विसर सगळं.”

अनिरुध्द स्वस्थ बसला खरा पण त्याला काही सुचेना. निवृत्त होण्याच्या आधीची रात्र त्याला आठवली तो आणि शीला अर्धी रात्र उलटली तरी गप्पा मारत होते. त्याला पार्टटाईम जॉब बघायचाय. हे तिला माहीत होतं. ती म्हणाली-

“हे पहा काही दिवस तरी तो जॉबचा विचार काढा बघू डोक्यातून!”

“आणि काय करू? भजन म्हणत बसू? मला ते टिपिकल निवृत्त लोकांसारखं देवळात जा, जेष्ठ नागरिक संघात जा. पत्ते खेळा. असलं काही जमायचं नाही. सांगून ठेवतोय. मी काही इतका म्हातारा झालो नाही अजून!”

“तुम्हाला? कोण म्हणेल हो म्हातारा!” मिश्किल नजरेने त्याच्याकडे पहात शीला म्हणाली. तेव्हा ती इतकी छान लाजली होती-

“मी काय म्हणते-”

“म्हण.. म्हण! आज मी खूप खूष आहे. तू म्हणशील ते ऐकेन.”

“ऐका तर खरं. आधी घरात मोठी माणसं, त्यांचं आजारपण नंतर मुलं लहान, त्यांच्या शाळा या सगळ्यात कोठे जाता नाही आलं. कसली हौस मौज करता नाही आली. आता न आपण दोघे थोडे दिवस फिरून येऊ या.”

“अगदी करेक्ट! लगेचच जाऊ. माझा मित्र आहे ना तो ट्रॅव्हल कंपनीत आहे. तुला माहिती आहे गं. विसरलीस? अगं रोहित…”

“हो हां आठवलं..”

“त्याला सांगतो बुकींग करायला. तू फक्त ठिकाण सांग. कन्याकुमारी काश्मीर की आणखी कोठे?”

“बापरे! इतक्या दूर? मी म्हणत होते चार दिवस महाबळेश्वरला आधी जाऊन येऊ या. मग करा बाकीचे बेत.”

“हं! महाबळेश्वर काय परवा पण निघता येईल.”

हे सर्व आठवून त्याला वाईट वाटले. बिचारीला कधीच सुख मिळाले नाही आता नुसतं महाबळेश्वरला जाऊ म्हटल्यावर किती हरपून गेली. झोपेपर्यंत तेच डोक्यात. महाबळेश्वरला खूप थंडी असते ना? स्वेटर काढून ठेवायला हवेत. खूप चालायला लागेल का हो? आणि आपण मध नक्की आणूया हं.. अनुताई सांगत होत्या मध छान मिळते म्हणून! एक की दोन.

तिच्या सगळ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी पडले.

अनिरुध्दला काही तरी – आठवले तो म्हणाला-

“यमराज, सर्वसाधारणपणे एक तारखेपासून कामाला सुरूवात होते. अजून 5/6 दिवस बाकी आहेत. मग एक तारखेर्पंत घरी लांबूनच फेरफटका मारून आलो तर…”

“इथे रजा वगैरे काही नाही, पगारही नाही. मग तारखा.. वार हे मोजमाप कशासाठी? अगदी या क्षणापासून कामाला सुरूवात.”

“वा! म्हणजे कॅज्युअल लिव्ह, सीक लिव्ह काहीच प्रकार नाहीत?”

“पुन्हा तेच! तुला समजत नाही का? हे सर्व पगार देताना लक्षात ठेवण्याचे प्रकार.. हजेरीपत्रक, लेटमार्क काही नाही. फक्त काम आणि रजा कसली? मिनिटामिनिटाला माणसं मरताहेत जगभरात काम उरकेनास झालंय. दूतांना. तुझा उरक चांगला आहे असं ऐकलं नारदमुनींनी निरोप समारंभात म्हणून तर तुझी नेमणूक केली.”

“अनिरूध्द खूष! तसा तो पक्का कामचुकार. पण मन्याने केलेली भरमसाठ स्तुती नारदमहाराजांनी नेमकी ऐकली.. छान.. पण लगेच त्याला परिस्थितीचे भान आले.”

“अरे मूर्खा मन्या कशाला इतकं खोटं बोललास? तुझ्यापायी माझा जीव गेला ना फुकट! आता करू तरी काय? चला अनिरुध्द आलिया भोगासी असावे सादर.. आता कुठली आलिया.. नुसतेच भोग कर्माचे. इथेच राहायचं आहे तर बाजूचा परिसर पाहून घ्यावा.”

“इथे गाडी वगैरे नसते.”

“बरोबर तुमचे वाहन रेडा नाही का? म्हणजे अजून काही सुधारणा नाही पृथ्वीवर पहा कारची रोज नवी मॉडेल्स, बरं मोबाईल तरी आहे का? घरच्यांशी थोडं बोलून घेतो. सगळे काळजी करत असतील”

“अजाण बालका, तुला माहीत आहे का मोबाईल गाडी चालवताना, चालताना क्रॉस करताना देखील कानाशी चिकटलेला. त्यामुळे अपघात मृत्यु मग आमचंच काम वाढतंय. जा मुकाट्याने काम शिकून घे आधी.”

एका दूताला बोलवून अनिरुध्दला काम शिकायला सांगितले. पण त्याचा पडलेला चेहरा पाहून यमालाच थोडं वाईट वाटलं. पहिल्याच दिवशी इतकं रागावून नको होतं बोलायला म्हणून त्यांनी अनिरुध्दला जवळ बोलावून म्हटले.

“तुमच्या बाकीच्या सुधारणा आम्ही इकडे आणल्या नाहीत तरी महाभारतात संजयने धृतराष्ट्राला युध्दांतील प्रसंग सांगण्यासाठी उपयोग केला होता. नंतर बऱयाच वर्षांनी आता पुन्हा तुम्ही वापर करू लागलात ते यंत्र मात्र इकडे आणलंय.”

“तुम्ही टी.व्ही. बद्दल बोलताय का? झालं! म्हणजे इथल्या महिलांना पण वेड लागणार त्याचे.”

“अगदी बरोब्बर! लागणार काय वेड लागलंय. इंद्रदेव तक्रार करत होते. रंभा, उर्वशी वेळेवर हजर नाही राहात म्हणून आठवण येत असेल तर बघ थोडा वेळ. नंतर वेळ नाही मिळणार.”

“एक विनंती करू का? टी.व्ही. दाखविण्यापेक्षा थोड्या वेळासाठी मला माझं घर दाखवता का? अचानक तुमही इकडे आल्यामुळे मी घरी जाऊ शकलो नाही. तेवढं मला दाखवा.”

“खरं म्हणजे ते नियमाविरुध्द आहे. पण तुझी जिद्दच आहे तर दाखवतो डोळे मीट आणि पहा फक्त पाचच मिनिटे हं.”

अनिरुध्दने डोळे मिटले. घर दिसू लागले. भिंतीवर त्याचा हार घातलेला फोटो. फोटोपुढे शिलू उभी, डोळ्यात पाणी. बिच्चारी! पंधरा दिवसातच काय हालत झाली. खचूनच गेली अगदी! अरे पण हे काय डॉक्टर कशाला आलेत? मधूला बरं नाही की काय? पण तो तर डॉक्टरांसोबतच बाहेर आला. आणि हसतोय चक्क!

“गुड न्यूज मधू बाबा होणार बरं का!” हे त्यांनी शीलाला सांगितले क्षणभरच तिच्या चेहऱयावर हसू. लगेचच हुंदका दाटून आला.

“ते हवे होते रे आज! किती खूष झाले असते ऐकून.” मधूने तिच्या पाठीवर थोपटले-

“आई बाबांची आठवण आता प्रत्येक आनंदाच्या क्षणी येणार. पण आपल्या हातात काही आहे का?”

अनिरुध्दच्या डोळ्यातून पाणी आले. इतक्यात यमराज बोलले-

“संपली वेळ. आता जास्त अडकायचं नाही. चल-”

पण अनिरुध्दला वाटले शीलाची कोणतीच इच्छा पूर्ण नाही का होणार…

तो जागचा हलेना

“मला घरी जायचंय”

“हा कसला वेडा हट्ट.. भूलोकीचे नियम तुला माहिती नाहीत का?”

“तरी सत्यवानाला केलेच ना जिवंत. थोडे दिवस हवं तर मी करतो तुमचं काम पण इतकी माणसं तुम्ही आणता त्यातल्या कोणाला तरी शिकवू आपण पण काही झाले तरी मी जाणार म्हणजे जाणार. तुम्ही हो म्हटल्याशिवाय मी उठणारच नाही येथून.”

यम पहातच राहिला. सावित्रीपेक्षाही हा हट्टी दिसतोय. सावित्रीच्या बोलण्याला फसून आपण उगीच सत्यवानाला जीवदान दिले असा पश्चाताप त्यांना आता होऊ लागला. अनिरुध्दची दयाही येऊ लागली. पण त्यांच काम असं होतं की अशी दयामाया करू लागलं तर काम करणे अशक्य. तरीही ते म्हणाले-

“हे बघ अनिरुध्द असा हेका बरोबर नाही आणि मी तो पुरवू शकत नाही. पण काही महिने का होईना तू इथे काम करणार आहेस म्हणून मी एक करू शकतो. तू प्रत्यक्ष नाही जाऊ शकत. पण तुझी सून ज्या मुलाला जन्म देणार आहे तो तुझा पुनर्जन्म असेल. अशा रीतीने तू पुन्हा घरी जाशील.”

तेवढ्यावर समाधान मानून अनिरुध्द तेथे कामावर रूजू होऊन व्यवस्थित काम करू लागला. काम म्हणजे तेही यमाकडचे! म्हणजे शरीरातून सूक्ष्म जीव काढून आणणे. प्रत्येक वेळी तसे करताना त्याला खूप वाईट वाटे. पण काय करणार.

योग्य वेळी मधूची पत्नी प्रसूत झाली. शीला आणि मधू दवाखान्यातच होते. चांगल्या गोऱयापान गुटगुटीत नातवाला शीलाने हातात घेतले दंडावर तुळशीच्या पानाची खूण पाहिली. अगदी अनिरुध्दच्या दंडावर होती तिथेच आणि तशीच! शीलाला आश्चर्य वाटलं आणि आनंदही. मनोमनी ओळख पटली. इतक्यात शीलाकडे पाहून बाळ ओळख असावी असे हसले. शीलाच्या चेहऱयावरही हसू उमटले. मधूने बाळाचे गूढ हास्य पाहिले नाही. आईचे हसू पाहून मात्र त्याला वाटले – “चला नातवाला पाहून इतक्या दिवसानंतर का होईना आईच्या चेहऱयावर आनंद पसरला.”

— भारती मेहता
(अनघा दिवाळी अंक २०२१ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..