नवीन लेखन...

आणि माझं सायकलीचं वेड

(ब्रिटिश काळातील बॉम्बेच्या रस्त्यावर सायकल चालवणारी भारतीय स्त्री. मराठी लुगडं नेसून ही तरुणी सायकल चालवताना दिसतेय. हा फोटो मिळाला एका पोस्टकार्डच्या जाहिरातीत.)

.,..काही वर्षांपूर्वी स्कूटर, मोटर सायकली यांची रस्त्यावर भरमार होण्याआधी,सायकल ही एक चैन असायची..मैत्रिणींना सायकल चालवताना पाहून आपल्याला कधी चालवता येईल याचे ध्यास लागत. सर्वात आधी मी सोलापूरला असताना मुलींना सायकल चालवताना पाहिलं होतं , माझी मैत्रीण पुष्पा राठी आणि तिची मोठी बहिण सुशीला यांची दिवसांची वाटणी झालेली होती.. तीन तीन दिवसांची..तेव्हां मी सोलापूरच्या हरिभाई देवकरण शाळेत होते. एक दिवस सुशीला आणि एक दिवस पुष्पा सायकल घेऊन जाताना दिसत , आम्ही जवळपास रहाणार्‍या तीनचार मैत्रिणी मिळून शाळेला जात असू..या बहिणी पण एक दिवसाआड आमच्याबरोबर येत.त्यावेळी मी पाचवीत होते. एकदोनदा त्यांच्या सायकलवर पेडलिंग करायचा मी प्रयत्न करुन पाहिला होता.नंतर वडिलांची धुळे येथे बदली झाली.तेथे शिकायला मिळालं नाही.,नंतर पुण्याला आलो , जिल्हा परिषदेच्या मागील सारस्वत काॅलनीत रहायला आलो ..,तर घरासमोर एक मोठ्ठं ग्राऊंड होतं..तिथे संध्याकाळी मुलं सायकल फिरवत, कोणी शिकत..आणि तेव्हां ठरवलं..आता शिकायचंच.. सायकलींच्या दुकानात एक आणा तासाने सायकल मिळायची, लहान मुलांसाठी कमी उंचीच्या सायकली असत , माझी उंची कमी असल्यामुळे मी तशीच घेऊन येत असे. शिकवायला कोणी नव्हतं..मग स्वतःच शिकले..इतर कसे चालवतात तिकडे लक्ष देऊन पाहिलं,,पाय टाकून बसायचं आणि फेर्‍या मारायच्या, जमायला थोडा वेळ लागला, गोल गोल फेर्‍या मारताना मस्त वाटायचं..आता थांबायचं कसं हे कुठे माहित होतं.,ब्रेक नावाचं काहीतरी असतं ह्याचा ‘पत्त्या ‘कुठे होता .,मग तिथे एक दूधकेंद्राचं छोटं लाकडी खोपटं होतं.,त्याला धडक मारायची आणि उतरायचं असा माझा रोजचा क्रम सुरु झाला..(तेथे रोज सकाळी मी दुधाच्या बाटल्या घ्यायला यायचे ) बहुतेक ती खबर पोचली असावी..काही दिवसांनी ते केंद्र ग्राऊंडबाहेर हलवलं गेलं..आता आली का पंचाईत , मग दुकानदाराला, एकदोन लोकांना विचारलं..तेव्हां कळलं की डाव्या बाजूला ब्रेक असतो तो दाबून गाडी थांबवायची असते.,आणि उजव्या बाजूचा दाबायचा नाही.,गाडी उलटू शकते. हेही सांगितलं होतं.

आता मला पंखच फुटले होते,,एकदा कंट्रोल आला आणि मग ग्राऊंडबाहेर रस्त्यावर फेर्‍या मारायला सुरवात केली . आता आत्मविश्वास अधिक वाढला. सायकल येण्याचे काही फायदे आणि काही तोटे ही असतात. घरातून बरीच कामं सांगितली जाऊ लागली..रद्दी घेऊन जा आणि येताना रास्ता पेठेतून भाजी घेऊन ये,,.कधी कॅम्पात कयानी बेकरी, कराची स्वीट मार्ट …वगैरे ठिकाणची कामं माझ्या गळ्यात पडू लागली. सायकल चालवण्याचा (खरं म्हणजे हाणण्याच्या) आनंदात मला त्याचं काही वाटेना.,नंतर तर धाकट्या भावाला शाळेतून डबलसीट आणण्याची ड्यूटीही करावी लागली. माझी मोठी बहिण माझ्या आधी शिकली पण रस्त्यावर चालवण्याची तिला nerve /हिम्मत नव्हती..एकदा रस्त्यावर घेऊन गेली..एका लहान मुलाला धडकली..ती एकीकडे, सायकल दुसरीकडे आणि मुलगा घाबरुन पळत त्याच्या घराकडे.,तसं त्याला थोडं किरकोळ खरचटण्यापलिकडे काही झालं नव्हतं ..पण बहिणीने परत सायकलीला हात लावला नाही.

त्यामुळे घरात माझा भाव थोडा वाढला होता..(ती आधी आणि लवकर शिकल्यामुळे खूप फुशारक्या मारत होती.,”तुला काय येणार “,,वगैरे मला बरंच ऐकवून झालं होतं..मला शिकवायलाही तयार नव्हती, पण मीही जिद्दीची होते..).त्या वयात हे असं भांडणं वगैरे चालतंच ना.!!!.नववीत असताना शिकले मी ..नंतर मग काॅलेजला जाणे, दुपारी शनिवार पेठेतल्या एका क्लासमध्ये इंग्रजी, गणित शिकवण्याचे कामही मला मिळाले होते.,त्यावेळी सायकल खूप उपयोगी पडली. त्यावेळी महिना बारा रुपये भाडं देऊन सायकल घरी पण ठेवता येत होती..(१९६२/६३ ) बी ए झाल्यानंतर मला केंद्र सरकारची नोकरी मिळाली ” हिंदी शिक्षण योजना” येथे हिंदी शिक्षिका या पदावर. तेथे मोठ्या लोकांना शिकवण्याचे काम होते. त्यावेळी शाळेत सर्वांना हिंदी विषय नसे..आणि सरकारला या सर्व लोकांना हिंदी राष्ट्रभाषा करायची ठरल्यामुळे हिंदीतून पत्रव्यवहार करता यावा यासाठी हे शिक्षण compulsory केलं गेलं होतं. परीक्षा पास झाल्यावर त्यांना पगारवाढ ही मिळे. तो एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी..मी (शिक्षिका )वर्गात वयाने सर्वात लहान.,बाकी सगळे क्लार्क ते आॅफिसर या पदावर ..त्यासाठी मलाही हिंदी Drafting करणे वगैरे शिकावे लागले. कारण बीए हिंदीच्या अभ्यासक्रमात असं शिकवलं जात नाही, त्यावेळी मला सायकल येत असल्याचा खूप फायदा झाला. कारण एका केंद्रावरुन दुसर्‍या केंद्रावर जावे लागे, CESE Southern Command, AFMC वानवडी, ARDE ERDL पाषाण ,कधी NDA खडकवासला ही.,अशा ठिकाणी क्लास घेण्यास जावे लागे. बससाठी थांबण्यापेक्षा सायकल मला खूप कामी आली.

लग्न ठरलं , झालं ,आग्र्याला पोचले आणि सायकल चालवणं थांबलं .तरी मधूनमधून हौस म्हणून एखाद्या मुलीची सायकल घेऊन मी भटकून यायचे ..तेव्हां मी घरी हिंदी शिकवणं सुरु केल होतं ,त्या सायकलीवर येत.

..,त्यानंतर सायकल चालवली ती इंग्लंडमध्ये,,१९७६-८० आम्ही इंग्लंड येथे होतो.,भारत सरकारनेच पाठवलं होतं. खाली एक फोटो पोस्ट केलाय..बर्फ पडलेलं असताना सायकल चालवली होती..फोटो काढून घेतला होता,,तेथे एक असतं रस्त्यावर मीठाच्या गाड्या फिरवल्या जातात, त्यामुळे बर्फ वितळतं त्याचं पाणी होतं आणि रस्ता फक्त ओला रहातो..बाजूला मात्र बर्फ जमलेलं असतंच . तेथे मी लायब्ररी सायन्सचा कर्स करत होते , त्याचवेळी आमच्या क्रॅनफील्ड Institute of Technoligy येथे आणखी एक संस्था होती ..BHRA..(British Hydromechanics Research Association ) यांच्या लायब्ररीत नोकरी मिळाली .रहात होतो तेथे जवळच दहा मिनिटांच्या अंतरावर., कधीकधी मी साडी नेसूनही जायचे..त्याचं त्यांना खूप अप्रूप वाटे.,साडी नेसून सायकलीवर गेले की मला पहाण्यास लायब्ररीतली समस्त मित्रमंडळी खिडकीत किंवा बाहेर जमा होत,,मी एखाद्या सर्कशीत आहे की काय असंच वाटलं मला .,मला सुरवातीला कळेचना, त्यात एवढं काय ते.,त्यांना सांगितलं ..या भारतात आणि बघा किती बायका साडी नेसून सायकल चालवतात ते. पण त्यांना ते एक गूढच वाटे..” अगं, तू कशी काय चालवतेस साडी नेसून” असा प्रश्न जवळजवळ सगळ्यांनीच विचारला असेल..

…आज ते सगळं आठवून मजा वाटतेय, हसू येतंय,,,पण खरोखरच फार आवडायचं मला सायकल चालवायला,,नंतर स्कूटर चालवली, कार चालवायला इंग्लंडलाच शिकले आणि अजूनही चालवते.,लहानपणापासूनच वाहनं चालवायला शिकण्याची खूप इच्छा होती..

..पण या सगळ्यात सायकलीची मजा वेगळीच हे मात्र खरं..इतर गाड्या पेट्रोलवर चालतात..सायकलीवर आपलीच एनर्जी वापरतो , उतारावर पेडलिंग न करता जोरात सोडून देण्याची मजा अनुभवलीत कधी..?..
..एकदम भन्नाट असतं ते..एकदा अशाच वेळी वडिल समोर त्यांच्या कारने येत होते,,त्यावेळी हसले .,पण घरी आल्यावर चांगलीच कानउघाडणी झाली…

..गुडघ्याचा प्राॅब्लेम झाला आणि मग मात्र चालवणं थांबलं.. आज रात्री बहुतेक स्वप्नात सायकल चालवणार.,तसंच स्वप्न पडणार..इतकं सगळं लिहिल्यावर आणखी काय होणार..???
..सायकल ती सायकलच..

— देवकी वळवडे 

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपच्या लेखिका 

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..