नवीन लेखन...

आणि मी ज्येष्ठ झाले

म्हातारा नुसता वयानं वाढतो. स्वकेंद्री असतो. वृद्ध हा वय, अनुभव आणि ज्ञानानं वाढतो, पण ज्येष्ठ नकाराला सकारात बदलतो. ती ताकद ठेवतो. अशा लोकांची समाजाला गरज आहे.कारण ज्ञान आणि अनुभव त्यांच्याजवळ आहेच. शिवाय निराशा या लोकांना शिवू शकत नाही. म्हणून तर माझी पणजी ठणठणीत आहे. स्मरणशक्ती दांडगी आहे.’

काही काही क्षण आयुष्यात असे येतात की, मनात घर करून राहातात. घर काय म्हणते, बंगलाच म्हणा ना! मला आठवते ती 2001 ची जगणना. डोंबिवली पूर्वेचा भाग, साधारण 250 ते 260 घरे गणनेसाठी माझ्याकडे आली होती. 1991 ची जनगणना आली आणि अशा कामात खूप  वेगवेगळे अनुभव गाठीशी बांधले जाऊन आपण संपन्न होतो. थोडी मौजच मानावी लागेल. कारण कुठलंही काम लादल गेलंय असं वाटलं की ते ओझं होतं. पण मनापासून स्वीकारलं की त्यात मौज वाटते. एक बिल्डिंग होती. नाव ‘मनीषा’. चार मजली बिल्डिंग. एक ब्लॉक तीन बेडरूम, हॉल, कीचन आणि दुसरा ब्लॉक चार बेडरूम, हॉल आणि कीचन. प्रत्येक फ्लोअरवर दोनच घरे.

मी तळमजला करून पहिल्या मजल्यावर आले. एका ब्लॉकची बेल वाजवली. आडनाव ‘देठे’. दार उघडलं तेच मुळी एका मख्ख चेहऱ्याच्या गृहिणीनं.

‘येऊ का? जनगणनेला आलेय. मी घारपुरे.’

‘हं, या,’ एक कोरडं उत्तर आलं.

‘आपण पाच मिनिट बसाल का? मला जरा उत्तरं हवी आहेत.’

‘सकाळच्या घाईत? बसा जरा. येते.’

सासूनं हात झटकला. ‘असंच काय आहे हो! काय करायचं?’ म्हणाली. जरा वेळानं त्या बाई समोर येऊन बसल्या. ‘हे विचारा आता काय विचारायचंय ते. माझ्याजवळ 10/12 मिनिटं आहेत.’

मी प्रश्न विचारायला सुरुवात केली. ‘घरात माणसं किती़? कर्त्या माणसाचं नाव, वय, शिक्षण, जन्मगाव, मुलं किती? मुली किती? किती हयात आहेत? किती दुर्दैवानं गेली?’ इत्यादी प्रश्न.

‘इतकी माहिती घेऊन तुम्ही काय करणार?’

‘मी काहीच करणार नाही. जे करणार ते सरकार करेल.’

मध्येच सासरे म्हणाले, ‘जरा चहा टाक गं! त्या ताईंना दे आणि मलाही हवाय थोडा.’

सुनबाई पुटपुटली. ‘त्यांचं नाव कशाला? तुम्हाला ढोसायचा असेल. मला तेवढाच उद्योग,’ फणकार्यानं उठली.आत गेली. ती आत गेल्यावर आजी म्हणाल्या, ‘ताई, तुला सांगते. तू आलीस म्हणून. नाहीतर उठते आणि प्रत्येकाला आत नेते. आमच्याकडे बोलायला कोणी नाही. या वयात जगणं ही एक शिक्षा आहे. दोनातल्या एकानं मरणं ही पण शिक्षाच आहे. ताई, गरिबी म्हणजे अन्न न मिळणं नव्हे गं. प्रेमाचा अभाव ही खरी गरिबी. आज ना उद्या आपणही म्हातारे होणार हे का नाहीगं लक्षात घेत? जिवंत असून एकटेपणा वाट्याला येणं, मी कुणाचा नाही, एकटा आहे. ही काट्यापेक्षा अधिक जास्त टोचते, सलते आणि त्रास देते. म्हातार्यांनी जगूच नये, पण ते हातात नाही ना?’

तोवर चहा बाहेर आला. माझ्या हातात एक कप दिला आणि दुसरा आजोबांच्या समोर आपटला म्हणा नां!

‘आजींना,’ मी म्हटलं.

‘त्या घेत नाहीत आता!’ मी अर्धा कप आजींना दिला आणि मी घेतला. थोडी उत्तरं देऊन माझ्यावर उपकारच जणू केले. ‘बाकी उत्तरं यांचा ‘श्रावण बाळ’ सॉरी हे येताहेत. ते देतील. मला वेळ नाही’ म्हणून ती आत गेली.

‘पोरी. वृद्धाश्रम भरलेत गं! घर असून बसायचं नाही. टीव्ही पहायचा नाही. सारखं किती माळ ओढणार? प्रेमाचा ना शब्द ना स्पर्श.’ असं म्हणणार्या आजींना मी म्हटलं,

‘आजी, प्रेम किंवा मधुरपाणी उपजत काही प्रमाणात असते. किंवा क्षणभर त्या त्या व्यक्तीला आपटायला ठेवून पाहिलं तर कळेल की काय होतं ते! शिवाय आजकाल मुलींच्या संसारात आया जास्त लक्ष घालतात. त्याचाही परिणाम होतो. काय बोलू?’

असं म्हणेपर्यंत आजींचा मुलगा आला. आवश्यक ते आमचं बोलणं झालं मी निराशेनेच आजोबा-आजींचा निरोप घेतला. निघताना त्यांच्या पाठीवर हात ठेवून म्हटलं, ‘सांभाळा हं स्वतःला.‘

विचार करत करतच दुसऱ्या ब्लॉकमध्ये गेले. आता इथं काय चित्र पहायला मिळणार? विचारातच बेल वाजवली. इथल्या बाईनं सांगितलं होतं की, आता पांजरपोळात जा. हीऽऽऽ  ढीगभर माणसं आहेत. तासाभराची निश्चिंती.

साधारणपणे 80 पर्यंत असणाऱ्या आजोबांनी दार उघडलं. समोर साधारण शंभरी ओलांडलेली पण खुटखुटीत आजी बसल्या  होत्या.

‘या बसा. सेन्सला आलात का? नात सांगत होती.’

‘बरोबर आहे आजी. मी ‘सेन्सस’ला, जनगणनेला आली आहे. मी खुश आहे. एका पणजीने चुकीचा का होईना पण सेन्सेस शब्द वापरायचा प्रयत्न केला. हे घर मला महाल वाटलं. कारण घरात आनंदाचं वावतावरण. 103 वर्षाची पणजी, 85 वर्षाचे आजोबा, 60 वर्षांचे वडील, 35 वर्षाचा मुलगा, त्याची मुलं, सुना सगळी गोडीने होती हे भिंतीच बोलत होत्या.’

‘तुम्हाला कुटुंबाची माहिती हवी असेल ना?’

‘मी देते सगळी,’ पणजी म्हणाली.

‘आई तू स्वस्थ बस. तुझी अर्धवट माहिती चालणार नाही,’ आजोबा.

‘बाबा तुमची पंचाहत्तरी ओलांडली. सगळ्या जन्मतारखा आठवणार नाहीत. तुम्ही माझ्याजवळ बसा,’ असं म्हणून 58 वर्षांचा सदाशिवाने हाताला धरून बाबांना खुर्चित बसवले. ‘आमच्या घरात सगळ्यांना सांभाळत सगळं करावं लागत,’ सदाशिवराव म्हणाले.

त्याने बिनचूकपणे 10 मोठी आणि सहा लहानांची माहिती  मला  दिली. फॉर्म लवकर भरले. मी निघाले तसं सदाशिवराव म्हणाले, ‘आता शांतपणे चहा घेऊ.’

मी म्हटलं, ‘तुम्ही आमचं गोकुळ म्हणताय पण खरं तर हा आनंदाश्रम आहे.’

‘खरं आहे. आम्ही भाग्यवान आहोत. आमचं सुख पहायला पणजी, आजोबा, आई-बाबा आहेत. ही पोरं त्यांच्या आंगाखांद्यावर नाचताना आम्ही पहातोय.’ सदाशिवरावांचा प्राध्यापक मुलगा म्हणाला.

म्हातारी म्हणाली, ‘हा माझा मोठा पणतू. प्रेम आमच्या घराचा पाया आहे. मला सुखाचं अजीर्ण होईल इतकं सुख दिलंय तोवर डोळे मिटावेत ही इच्छा आहे. आज सुद्धा उठल्याबरोबर माझा हा 80 वर्षांचा रघुनाथ माझ्या पायावर डोकं ठेवतो. ते बघून हा 58 वर्षांचा नातू सदाशिव पण पाया पडतो. मग सगळ्यांनाच सवय लागली. या सार्यांचे स्पर्श मला दिवसभर टवटवीत ठेवतात. हे संस्कार आहेत. हे पाढ्यांसारखे शिकवता येत नाहीत. ते माठातल्या पाण्यासारखे पतवंडापर्यंत झिरपत आलेत.’

यांच्या बायका आधुनिक नातसुना हो – 15 माणसं एकत्र रहायची तर भांड्याला भांडं लागणारच. आवाज होणार, पण नाद घुमणार नाही. एक आहे की पुरुष यात पडत नाहीत. बायकांना एक ताकीद ‘रात गई बात गई.’

दुसरा नातू, नात सून, दोघंही डॉक्टर. वेगळं राहू शकत  होते. पण मुलं पाळणाघरात ठेवायची नाहीत म्हणून इथंच जमवून घेऊन राहिलेत.

हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. ते वात्सल्याचं होतं.

प्राध्यापक मुलगा म्हणाला, ‘मॅडम, आमच्या कुटुंबात ना कोणी वृद्ध ना कोणी म्हातारा. आहेत ते हे चार-पाच जण ज्येष्ठ आहेत.’

‘मी समजले नाही,’ मी म्हटलं.

‘म्हातारा नुसता वयानं वाढतो. स्वकेंद्री असतो. वृद्ध हा वय, अनुभव आणि ज्ञानानं वाढतो, पण ज्येष्ठ नकाराला सकारात बदलतो. ती ताकद ठेवतो. अशा लोकांची समाजाला गरज आहे.कारण ज्ञान आणि अनुभव त्यांच्याजवळ आहेच. शिवाय निराशा या लोकांना शिवू शकत नाही. म्हणून तर माझी पणजी ठणठणीत आहे. स्मरणशक्ती दांडगी आहे.’

शाळा शिकलेली नाही, पण व्यावहारिक ज्ञान उत्तम. सल्ले उत्तम देते. पण गंमत अशी की, सल्ला मागितला तर देते. आपणहोऊन मध्ये येत नाही. तसंच आजी पण ‘माझंच ऐका’ कधीच म्हणत नाही. आजोबांना सांगत असते, ‘मुलांच्या मध्ये मध्ये बोलू नका. त्यांचे ऑफिसमधले मित्र आले तर उठून आत जात. माझा काय त्रास? म्हणू नका. त्यांना अडचण होत नाही, पण ती वेळच आपण आणू नये.’

सदाशिवराव म्हणाले, ‘माझ्या भावानं अनेकांना शिकवलं. फी भरल्या, औषधपाणी केले. त्याला ‘मदत काका’ म्हणूनच गल्ली ओळखायची, पण तो खरा ज्येष्ठ. ज्याला त्याला पकडून आपण काय काय केलं हे गर्वाने कुणाला सांगत बसत नाही. आमची वहिनी सतत सांगत असते ‘आम्ही मोठ्यांनी पण (नवरा-बायकोने) भांडू नये. कारण नवर्याचं वय वाढतं तसं बायकोचंही  वाढलेल असतं. दुसऱ्याच्या वेदनेचा आणि दुःखाचा विचार करावा. आठ्या असलेला चेहेरा गोरा असला तरी काळाच दिसतो.’

शंभरीची पणजी ओरडली, ‘पोरांनो तिला पण दहा घरी  जायचंय. आपली कहाणी आपल्याजवळ. सोडा आता तिला.’

प्राध्यापक मुलगा म्हणाला, ‘मॅडम, आम्हाला एक समस्या आहे. ती सोडवता येते का पहा.’

‘मीच इथं शिकले. मी काय सल्ला देणार? पण सांगा तर खरं.’

‘माझा भाऊ ‘बीई’ झाला आणि ‘एमएस’ करायला यूएसएला गेला. तीन-चार वर्ष झाली. त्याचे त्यानेच तिथे लग्न ठरवले. मुलगी तिथलीच आहे. तिचे नाव ‘मार्शा.’ गोड आहे. भारतीय संस्कृतीची आवड आहे. पण तो तिथलीच सिटीझनशीप घेणार आहे. वर्षातून एखादेवेळेस येणार.’

‘पण प्रश्न काय आहे?’

‘प्रश्न असा की माझी आई असून जुन्या आचार-विचारांची आहे. त्याने आम्हाला सांगितलंय, पण आईला अजून माहीत नाही. तो तिथेच रजिस्टर लग्न करेल, इथे दणक्यात रिसेप्शन करू. आईला कसं सांगायचं? तिचा देव देव जास्त असतो. अलीकडे तर दोन महिने झाले ती नऊ ते साडेदहा देवळात जाऊ बसते. समजूतदार आहे, पण ज्येष्ठ नाही असं वाटतं…’

आई घरात यायला आणि हे वाक्य ऐकायला एक गाठ पडली.

‘कोण म्हणतं मी ज्येष्ठ नाही? बुरसटलेली आहे म्हणून.

‘तसं नाही गं आई, मी सांगत होतो…’

‘काय? ते मी ऐकलं. आपल्या अंगदनं अमेरिकेतच मार्शा नावाच्या मुलीशी लग्न ठरवलंय. इथे रिसेप्शन करू. आपण तिच्यासारखं न होता तिला आपल्यासारखं करू! ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे. अमेरिकेत असली तर तिलाही मन, भावना, बुद्धी  सगळं आपल्यासारखंच आहे ना? अंगदचं मन दुखवून आपल्याला काय मिळणार?’

‘हे जर समजतंय तर तू त्या दिवसापासून अशी गप्प गप्प का आहेस?’ मुलगा म्हणाला.

‘मला पचनी पडायला जरा वेळ लागतोय. कळतंय पण वळत नाही. आता मात्र माझ्या विवेकावर विचारांनी मात केली आहे,’ आई.

‘म्हणजे काय करणार आहेस नक्की?’

‘खरं तर सांगणार नव्हते, पण या पोरीसमोर तुम्ही माझे ज्येष्ठत्व काढायला लागलात म्हणून सांगते. मला वाटलं, आपणच वाट वेगळी निवडली तर?’

‘घरबीर सोडणार की काय?’ घाबरत सून म्हणाली.

‘तसलं काहीही करणार नाही. तुम्ही हसाल, पण सांगते. मी मॅट्रीक तर आहेच. इंग्रजी शिकायचं ठरवलंय. देवळाशेजारी इनामदार क्लासेसमध्ये विचारलं की मला स्वतंत्र इंग्रजी शिकवाल का? ते ‘हो’ म्हणाले. मग नऊ ते साडेदहा, आज दोन महिने झाले मी क्लासला जाते. Now I can speak little little English. How are you? What do you want? Do you like it? असं. उद्या नव्या सुनेला मराठी येणार नाही. मीच तिच्याशी न बोलून कसं चालेल?’

टाळ्यांचा कडकडाट झाला आणि 103 वर्षांच्या आजेसासूनं डोक्याशी बोटं मोडली. म्हणाली,

‘गुणाची गंऽऽऽ नातसून माझी!’

विचारांच्या बदलाशिवाय ज्येष्ठत्वाला अजून काय हवं?

-माधवी घारपुरे

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..