ठाणे रंगयात्रा २०१६ मधील प्रा. अशोक बागवे यांचा लेख.
मी ठाण्यात आल्यापासून काय काय झालं ते सांगतो. १९७७ साली माझं लग्न झालं. ठाण्यात राहायला आलो. अगदी सुरुवातीला मुंब्य्रात राहत होतो. नंतर चेंदणी येथे सासुरवाडीला राहू लागलो. मी ‘सत्यकथा’त लिहितो आणि ठाण्यात राहायला आलो आहे, याची कुणकुण माझा मित्र विश्वास कणेकर आणि सुषमा देशपांडे या दोघांना लागली. ती दोघं श्रीरंग सोसायटीत राहत होती. आणि मी त्यावेळी आझादनगर झोपडपट्टीत राहत होतो.
‘कलासरगम’ नाट्यसंस्थेसाठी त्यांना राज्य नाट्यस्पर्धेत नाटक करायचं होतं. ठाणे नगर वाचन मंदिर येथे पी. सावळाराम आणि म. पां. भावे यांचा कार्यक्रम होणार होता. तो ऐकण्यासाठी मी जाणार असल्याचे विश्वासला समजलं. तो आणि विजय जोशी (दिग्दर्शक), जे आता सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत, असे दोघं मिळून मला भेटायला म्हणून वाचन मंदिरात मागे हातात बाड घेऊन बसले होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी मला गाठलं आणि विचारलं, ‘तुमच्याशी बोलायचं होतं.’
मग आम्ही ‘सुजय’ हॉटेलमध्ये चहा पिण्यास गेलो. ‘आम्हाला राज्य नाट्यस्पर्धेत नाटक सादर करायचं आहे. इस्मत चुगताई यांचं मूळ हिंदी नाटक आहे. त्याचा अनुवाद तुम्ही करावा, अशी आमची इच्छा आहे.’ ‘असायलम’ हे ते नाटक, जे रशियन राज्य क्रांतीवर आधारित होतं. त्याचे संवाद ऱ्हाइममध्ये (यमकछंद) होते. त्यामुळे त्यांना हे नाटक लिहिण्यासाठी कवीच हवा होता. जो या नाटकाला योग्य न्याय देऊ शकेल.
मी त्यांना सांगितलं की, ‘मी नाटक कधीच लिहिलं नाही.’ दुसऱ्या दिवशी नाटकावर चर्चा करण्यासाठी विजयच्या घरी जमलो. गोखले रोड येथे ‘नवसदन’, महाराष्ट्र बँकेच्या बाजूला विजयचं घर होतं. त्यांनी मला नाटकाचा प्लॉट समजावून सांगितला.
वेड्यांच्या इस्पितळात सांस्कृतिक कार्यक्रमात वेड्यांच नाटक बसवण्यात येतं. नाटकातून रशियन राज्य क्रांतीच्या निमित्ताने सद्यस्थितीवर ओरखडे ओढायचे होते. विजय मला सांगत होता. परंतु माझ्या काहीच पचनी पडत नव्हतं. तेव्हा मी रुईया महाविद्यालयात प्राध्यापक होतो. राज्य नाट्यस्पर्धेची तारीख फक्त २० दिवसांवर येऊन ठेपली होती.
मग विजयच म्हणाला, ‘मी तुम्हाला एकेक प्रवेश सांगतो.’ त्यानुसार मी लिहिण्यास बसलो. पहिला प्रवेश लिहून दिला. ते खूश झाले. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तालमी सुरू असायच्या. मी प्रवेश लिहून द्यायचो आणि मग तालीम व्हायची. मधेच विजयच्या डोक्यात आलं की, क्रीप्टमध्ये गाणी असतील तर आणखी धम्माल येईल. गाणी लिहिण्यासाठी मासुंदा तलावात बोटिंगला गेलो. बघता-बघता चार गाणी लिहून झाली. एक गाणं रंगायतनच्या कँटीनमध्ये चक्क बिलाच्या मागे लिहिलं. अशा प्रकारे पाच गाणी लिहून झाली. या गाण्यांना श्रीरंग अरस याने चाली बांधल्या. खूप सुंदर चाली लावल्या त्याने.
१९ वेडे असलेलं हे नाटक. विश्वासाने (टोपणनाव राजा) नाटकाचं नेपथ्य वेगळ्या पद्धतीने केलं. नाटकात लागणारे कपडे वेड्यांच्या इस्पितळातून आणले. असायलमचा प्रमुख होता डॉ. माधव रेगे. संजय केळकर, उदय सबनीस, सुनिल गोडसे, ॲड. राजू फलटणकर, दिलीप पातकर, नरेंद्र बेडेकर अशी एकापेक्षा एक नटांची फौज होती. रिहर्सल झाली की स्टेशनला चहा प्यायला जायचो. कुंजविहारच्या वड्यांचा आनंद लुटायचो.
राज्य नाट्यस्पर्धेत ‘असायलम’चा प्रयोग गडकरी रंगायतन येथे प्राथमिक फेरीत सादर झाला. विषय नवीन होता. नाटकाने अनेक संकेत मोडीत काढले. आमची दोन पात्रं प्रेक्षकांमध्ये बसली होती. वेड्यांनी रागाच्या भरात भाकऱ्या प्रेक्षकांमध्ये भिरकावून दिल्या. यावर सेन्सॉरवाले खूप रागावले होते. सर्व नट प्रयोग एन्जॉय करत होते. ‘असायलम’मध्ये शेवटची गझल प्रशांत दामले याने गायली होती. मी लिहिलेले पहिले नाटक प्रथम आलं आणि मी एका रात्रीत नाटककार झालो, याचा मला अचंबा वाटला!
आमच्या सगळ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ‘कलासरगम’चा अध्यक्ष होता अभय पटवर्धन. त्याच्या फियाटच्या टपावर बसून आम्ही तळ्याला फेरी मारून आनंदोत्सव साजरा केला.
त्यावेळी स्त्री पात्र मिळणं मुश्कील असायचं. त्यामुळे समूहनाट्यालाच प्राधान्य असे. प्राथमिक फेरी पार करून ‘असायलम’ अंतिम फेरीत पोहोचलं. त्याचा प्रयोग रवींद्र नाट्य मंदिर येथे झाला. अंतिमला परीक्षक होते प्रा. पुष्पा भावे, कमलाकर सोनटक्के व ज्ञानेश्वर नाडकर्णी. नाट्यदर्पणचे सुधीर दामले तर टॉर्च हाती घेऊन क्रीप्टवर नजर ठेवून होते. कलाकार क्रीप्टव्यतिरिक्त संवाद तर म्हणत नाहीत ना, ते पाहात होते. या नाटकाच्या निमित्ताने मला कॅरेक्टरायझेशन कळलं.
नंतर ‘आमच्या येथे श्रीकृपे करून’ हे नाटक लिहायला घेतलं. १९८१ च्या राज्य नाट्यस्पर्धेसाठी होतं. नाटकातली पात्रं सखाराम आणि कमळी यांचं लग्न होतं. त्यांच्या लग्नाची गंमत, हनिमूनची गंमत आणि त्यांना झालेल्या चार मुलांची ही गोष्ट होती. राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांच्या मुलांची नावं. दिलीप पातकर सखाराम, तर आताची आघाडीची अभिनेत्री संपदा जोगळेकरची मोठी बहीण संगीता ही कमळीची भूमिका करत होती. या नाटकात कोरसमध्ये अशोक हांडे आणि प्रशांत दामले होते. हेच नाटक पुढे व्यावसायिक रंगभूमीवर प्रशांत दामले आणि अंजली वळसंगकर करणार होते. काही कारणाने ते बारगळलं.
त्यावेळी ‘मित्र सहयोग’, ‘नाट्याभिमानी’, आमची ‘कलासरगम’ अशा नाट्यसंस्था एकमेकांविरोधात स्पर्धक म्हणून कार्यरत होत्या. परंतु मला असं वाटायचं की, नाटकाला अशा भिंती हव्यात कशाला? ते सर्वव्यापी असावं. मग असं केलं तर? म्हणजे मी माझं नाटक दुसऱ्या संस्थेतून सादर करायचं. आणि त्यातून पुढे ‘सर्ग-निसर्गाचा’ हे नाटक कल्याणच्या अभिवादन नाट्यसंस्थेच्या वतीने करण्याचं ठरलं. दिग्दर्शक होता अरविंद केळकर. तर ‘कॅलिग्युला’ नाटक अभिवादनच्या रवी लाखेने लिहिलं. यापूर्वी त्याने नाट्यलेखन केलेलं नव्हतं. मग मी आणि विजय मिळून त्याला डायलॉग्ज, सीन कसे लिहायचे याचं मार्गदर्शन केलं. त्यानुसार त्याने नाटक लिहिलं. हे नाटक ‘कलासरगम’ने केलं. ‘कॅलिग्युला’मध्ये मी अभिनयाची हौस भागवून घेतली.
‘सर्ग-निसर्गाचा’ नाटक निसर्ग आणि विज्ञान यांच्यातला संघर्ष अधोरेखित करणारं होतं. घनदाट जंगलात, पडक्या देवळात वृद्ध माणसं राहत असतात. वल्कलं नेसलेली माणसं. ‘माणूस मेला की मातीला देऊन टाकायचा,’ असं साधं, सरळ तत्त्वज्ञान म्हातारबा सांगतो. आणि निसर्गात राहण्याचं आवाहन सर्वांना करतो. एके दिवशी शहरातून एक मुलगा येतो. त्याला पुरातन वस्तू शोधून त्यांचा अभ्यास करायचा असतो. त्याची म्हातारबाशी गाठ पडते. त्याला तेथील लोकांची जीवनशैली आवडते.
‘मूर्ती असो नसो पण देव असतो,’ म्हातारबाचं हे विधान मुलाला खटकतं. मग तो इरेला पेटतो. म्हातारबाचा सहकारी तात्याबाला हाताशी धरतो. म्हातारबाचं तत्त्वज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसं तकलादू आहे, हे पटवण्यासाठी तो माचिस, बॅटरी, कॅल्युलेटर, पेन या विज्ञानयुगातील साधनांचा मोह त्याला पाडतो. आणि मग सुरू होतो निसर्ग आणि विज्ञान यांचा झगडा. ‘विज्ञान म्हणजे वेग… आणि वेग आंधळा असतो,’ असं म्हातारबा बोलतो. तात्याबा चाकूने म्हातारबाचा खून करतो. आणि मग सगळी माणसं फेर धरून नाचू लागतात. आणि तो तरुण जख्ख म्हातारा झालेला असतो. त्या तरुणाला म्हातारबा समजतात, असा नाटकाचा शेवट केला होता. हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेला अंतिमला दुसरं आलं. प्रथम क्रमांक द्यायचा की नाही, याचा वाद परीक्षकांमध्ये होता. त्या वर्षी नाटकाच्या इतिहासात प्रथमच पहिलं पारितोषिक दिलं गेलं नाही. कुमार सोहनीला नाटक खूप आवडलं होतं. त्याने ते डॉ. लागूंना वाचून दाखवलंही होतं. व्यावसायिकला म्हातारबाची भूमिका डॉ. श्रीराम लागू करणार होते.
‘श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा अथवा कुणाचाही खून; संदर्भ भाऊबंदकी’ हे नाटक वसंत आबाजी डहाके यांनी ‘कलासरगम’साठी लिहिलं. मी लिहिलेले ‘सहस्त्र वर्षांचे साचले हे काळे’ हे नाटक मित्र सहयोगने केलं. प्रबोध कुलकर्णीने दिग्दर्शन केलं होतं. त्यावर्षी ‘कॅलिग्युला’ पहिलं आलं आणि दुसरं आलं ‘सहस्त्र वर्षांचे साचले हे काळे’! हे नाटक माझ्याकडून लिहून घेतलं गेलं. मला एका खोलीत दिवसभर डांबून ठेवलं होतं. खिडकीतून अन्न-पाणी दिलं जात होतं. तीन दिवस काहीच सुचलं नाही. वैतागलो होतो. खोलीतून लवकर सुटका व्हावी, म्हणून भराभर लिहून नाटक पूर्ण केलं.
1983 साली मी ज्ञानसाधना कॉलेजला रुजू झालो. ठाणा कॉलेज सायन्स विभागाचे प्रा. आपटे हे विद्यार्थ्यांसाठी नाट्य शिबिराचे आयोजन करत असत. पुढे पुढे मी, विजय, नरेंद्र बेडेकर आणि प्रबोध नाट्य शिबिरे घेत असू.
आयएनटी, उन्मेश एकांकिका स्पर्धेत ठाण्यातून कुठलीच एकांकिका स्पर्धेत येत नसे. परंतु कालांतराने जोशी-बेडेकर कॉलेजने पहिला क्रमांक पटकावला. ‘इथे डोळ्यांच्या खाचा करून मिळतील’ ही मी लिहिलेली ती एकांकिका होय!
जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘राधी’ कथेवर आधारित नाटक मी लिहावं असं मला विनायक दिवेकरने सांगितलं. ‘राधी’चा कलासरगमतर्फे प्रयोग सादर करण्यात आला. दिग्दर्शन केलं होतं विनायक दिवेकर याने. याचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात प्रयोग केले. हेच नाटक महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने बसवलं, त्यावेळी ते पहिलं आलं होतं. उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट नाटक यांसह उदय सबनीस याने उत्कृष्ट अभिनेता म्हणून पारितोषिक पटकावलं. अजित दळवी परीक्षक होता. ‘कुसुमाग्रजानंतर तुम्हीच उत्कृष्ट संवाद लिहिले,’ असा अभिप्राय त्याने जाहीरपणे दिला.
‘विसर्जन’ या एकांकिकेमध्ये सगळे गणपती तळाला येतात आणि संवाद म्हणतात. घरगुती गणपती, संस्थेचा गणपती, सार्वजनिक मंडळाचा गणपती, म्युनिसिपाल्टीचा गणपती असे वेगवेगळ्या ठिकाणचे गणपती असतात. त्यांच्या संवादातून त्या-त्या वेळची परिस्थितीवर भाष्य केलं होतं. तर ‘झेंडावंदन २०५०’मध्ये जसे आपण गणपती आणतो, तशी झेंडावंदन ही एक प्रथा आहे. समाजसेवकाला स्वातंत्र्य माहीत नसतं. तो नाना प्रश्न विचारतो. झेंडावंदन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मग त्याला समजावण्यात येतं. तर तो म्हणतो, ‘झेंडा फडकवण्याचे दहा हजार घेणार मी.’ ‘आमचं मंडळ गरीब आहे,’ असं त्याला सांगण्यात येतं. तर तो इरसालपणे म्हणतो, ‘मग मी अर्ध्यावरच झेंडा फडकवणार!’
ठाणे पेंद्रातल्या राज्य नाट्य स्पर्धेतल्या २५ नाटकांची समीक्षा ‘टिंब’ या परीक्षण पत्रिकेत करत असे. प्रयोगाच्या दिवशी रात्री समीक्षा लिहून सायक्लोस्टाइल काढून दुसऱ्या दिवशी वाटायचो. एवढंच काय, मी आमच्या संस्थेच्या नाटकावरही टीकात्मक लिहिलं होतं.
‘मित्र सहयोग’साठी ‘सर्कस’ नावाचं नाटक लिहिलं. थीम प्रबोधची होती. सगळे डायलॉग्ज अधांतरी राहिले पाहिजेत. सर्कस हा समूहाचा खेळ असतो. प्राण्यांपेक्षा अतिशय क्रूर माणूस असतो. हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला होता.
‘माचिस’, ‘मृत्तिकाघट’ आणि ‘आमच्या येथे श्रीकृपे करून’ (या नाटकाची मी एकांकिका केली), ‘अश्वत्थामा’ आदी एकांकिकांचे लेखन केले. ‘अश्वत्थामा’मध्ये सात अश्वत्थामा होते. ती पात्रं म्हणजे प्रत्येकी एक मन असं दाखवलं होतं आणि एक दौपद्री. ही एकांकिका पहिली आली. ८० ते ९० याच कालावधीत नाट्यलेखन केलं. पुढे कवितांचा प्रवास सुरू झाला. जो अद्याप कायम आहे
प्रा. अशोक बागवे – ९६१९९७२७३२
(शब्दांकन : राजेश दाभोळकर)
Leave a Reply