नवीन लेखन...

आणि ते हुकलंच

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये मुरलीधर नाले यांनी लिहिलेला हा लेख


बेंबीत कस्तुरी बाळगणाऱ्या मृगाला त्याची जाणीव नसते. ते बेभान होऊन त्या वासाचा शोध घेत जंगलात धावत सुटते. मानवाचे देखील काही अंशी तसंच असतं. जीवनाचं ध्येय काय व ते साध्य करण्यासाठी त्या स्वप्नाचा धांडोळा शोधत मनुष्य आयुष्य कंठीत असतो. आयुष्याच्या संध्याकाळी स्वप्न कितपत साध्य करता आले याचा हिशोब पाहू लागल्यावर लक्षात येतं की काही स्वप्नं या प्रवासात हरवलीत.

एस. एस. सी. च्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले होते. विशेषत: गणितात तर जास्तच. साहजिकच त्यामुळे वडिलांना मी इंजिनियर व्हावे असे वाटत होते. त्यानुसार त्यांनी जळगावला शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.

जळगाव जिल्ह्यातील एका खेड्यातील गरीब कुटुंबातील असल्यामुळे भावी आयुष्यात काय व्हायचे हा विचार मनात कधी उगवलाच नाही. मशीन ड्राईंग हा विषय मला अवघड वाटत होता. एका मशीनचा साईड व्ह्यू, प्लॅन व्ह्यू, एलिव्हेशन व्ह्यू कसा असेल याचे ड्रॉईंग कसे काढावयाचे हा मला यक्षप्रश्न वाटायचा. शेवटी व्हायचे तेच झाले. निराशा पदरी पडली. महाराष्ट्र सेवा आयोगाची लिपिक पदासाठी जाहिरात आली होती. परीक्षेला बसावयाचे ठरवले. कां कुणास ठाऊक पण मी सांगत सुटलो मला मंत्रालयात नोकरी करावयाची आहे. जवळची माणसं हसत म्हणत, ‘ते सोपं नाही. या परिक्षेत उत्तम मार्क्स मिळविणाऱ्या पहिल्या काही उमेदवारांनाच केवळ मंत्रालयात नियुक्ती मिळते. कारण ज्या हुषार विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळून देखील घरच्या गरीब परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही असे बहुतांशी विद्यार्थी या परिक्षेला बसतात. मुंबई, पुणे, नागपूरला त्यासाठी क्लासेस आहेत. मला त्याची काहीच कल्पना नव्हती. केवळ जनरल नॉलेजचे एक पुस्तक घेऊन मी वाचत होतो. माझ्या अपेक्षेहून मला त्या परीक्षेत जास्त मार्क्स मिळालेत व माझी मंत्रालयात नियुक्ती झाली. व मी मंत्रालयात कारकून म्हणून कामाला लागलो.

आयुष्यात तुम्ही काय होणार असा निबंधाचा विषय जरी मला शालेय जीवनात आला असता तरी गावच्या त्या वातावरणात माझ्या विचारशलाकेची गती मंदच राहिली असती. नोकरी लागल्यावर मी माटुंग्याला पेईंगगेस्ट म्हणून राहू लागलो. तिथून सकाळी उल्हासनगरच्या महाविद्यालयात जाणे, तीन पिरीयड झाल्यावर लोकलने मंत्रालयातील नोकरीसाठी वेळेवर पोहोचणे, ऑफिस सुटल्यावर एका जज्जच्या मुलाला एक तास शिकवणे, त्यानंतर रात्रीच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करणे असा माझा दिनक्रम सकाळी ५ ते रात्री १० । । वाजेपर्यंत चालू होता. या धबडग्यात फुरसतीचे क्षण कधी उगवलेच नाहीत. ट्रेनमध्ये व सुटीच्या दिवशी माटुंग्याच्या फाईव्ह गार्डनमध्ये अभ्यास करून पदवी प्राप्त केली. त्याचवेळी स्फूर्तीचे धुमारे फुटू लागले होते व मी कथा, कविता लिहू लागलो होतो. पदवी मिळाल्यावर मात्र हायस्कूलमध्ये शिक्षक व्हावे असे वाटू लागले होते. मुंबईला आल्यावर माझा डोंबिवलीला विजय तेंडुलकरांचा परिचय झाला. त्याचे रूपांतर ते माझे फिलॉसोपर व गाईड असे झाले. त्यांना नोकरीत बदल करण्याबद्दल विचारले. गंमत अशी की तेंडुलकर मला आयुष्यभर मास्तर म्हणायचे. परंतु त्यांनी माझ्या मास्तरकीच्या प्रस्तावाला मात्र रूकार दिला नाही. नोकरीच्या आधी  शिक्षणशास्त्राची पदविका मिळवलेली होती त्यामुळे शिक्षकी पेशाची आवड तयार झाली होती. शिक्षक व्हायचे नाही असे ठरल्यावर मी एम.ए. चा अभ्यास करू लागलो. त्याच काळात मंत्रालयातील पदोन्नतीची परीक्षा पास झाल्यामुळे आता मला राजपत्रित अधिकाऱ्याचे पद लाभले होते. माझ्या कथा, कविता मुंबई, पुण्याच्या मासिकांमध्ये छापून येऊ लागल्या होत्या. आणि आता मला माझी आवड कळू लागली होती. एम. ए. (मराठी) च्या परीक्षेत प्रथम वर्ग मिळाल्यामुळे शिक्षकीपेशाची इच्छा पुन्हा उफाळून आली व मला मराठीचा प्राध्यापक व्हायचे स्वप्न पडू लागले. विजय तेंडुलकरांना पुन्हा सल्ला विचारला. त्यांनी सांगितले, ‘मास्तर तुम्ही मंत्रालयात राजपत्रित अधिकारी आहात. नोकरीची शंभर टक्के हमी आहे. मराठीच्या प्राध्यापकांची परिस्थिती तशी नाही. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील कुणाचा नातेवाईक एम.ए. झाला की तुमच्या हातात नारळ मिळेल.’ झालं मला तो विचार सोडून द्यावा लागला. कारण त्यावेळी आजच्यासारखं प्राध्यापक वर्गाला संरक्षण नव्हतं. शेवटी शिकविण्याची हौस ७/८ वर्षे प्रायव्हेट शिकवण्या करून भागवून घेतली. मंत्रालयात पदोन्नत्या मिळत गेल्यात. उपसचिव झाल्यावर संशोधन अधिकारी म्हणून थेट नोकरीत प्रवेश मिळवलेल्या अधिकाऱ्यांना राज्याच्या नियोजन प्रक्रियेबद्दल व्याख्याने देऊन शिकविण्याची माझी हौस मी भागवून घेतली.

अनघा प्रकाशनाच्या सुरुवातीपासून ज्येष्ठ लेखक ना.ज.जाईल यांचे सक्रीय सहाय्य लाभत गेले आहे. कालानुरूप त्यांचा जिव्हाळा लाभला. त्यांची खूप इच्छा होती की, मी पी.एच.डी करावे. मी त्यांना सांगितले होते की, माझ्या वडिलांनी पण माझ्या नावाच्या मागे डॉ. हे उपपद लावावे अशी इच्छा प्रगट केलेली होती. जाईलसाहेबांनी मी थिसीस लिहिण्यासाठी नेपाळहून खास छान पेनपण आणले होते व  मला देतांना डॉ. होण्यासाठी अशी शुभेच्छा देखील दिल्या होत्या. परंतु कार्यालयीन कामाचा गराडा प्रकाशनाचा व्याप यात ते राहुन गेले. ही खंत गहिरी जखम करणारी आहे.

माझ्या कथा, कविता छापून येऊ लागल्यावर मला मासिकाचे संपादन करावेसे वाटले. नित्याप्रमाणे सुरुवातीला तेंडुलकरांनी त्याला विरोध केला. ते म्हणाले, ‘मास्तर तुम्ही शासनात उच्चपदस्थ अधिकारी आहात. नोकरीच्या निमित्ताने तुम्हाला भरपूर प्रवास करावा लागतो. या प्रवासात ठिकठिकाणी तुम्हाला वेगवेगळी माणसं भेटतील तुम्ही आता कादंबरी लेखनाकडे वळा. तुम्हाला भेटलेली माणसं ही तुमच्या कादंबरीतील पात्र असतील.’ परंतु मी थांबलो नाही. प्रकाशनाच्या नोंदणी प्रक्रियेनंतर मी त्यांचा सल्ला घेतला. त्यांच्या आपुलकीच्या मार्गदर्शनामुळे व सक्रीय सहाय्यामुळे मी ४० दिवाळीअंक व सुमारे ८०० पुस्तके प्रकाशित करू शकलो. उत्कृष्ठ प्रकाशनाचा मान देखील मिळाला.

आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांना राज्य शासनाची, विविध साहित्यिक संस्थांची बक्षिसे देखील मिळालेली आहेत. अनघाच्या दिवाळीअंकामुळे महाराष्ट्रातील लेखक, नवोदित गझलकार, कवी यांचा परिचय होत होता. विजय तेंडुलकरांच्या विलेपार्ले येथील निवासस्थानी तीन रविवारी त्यांचे दिवाळी अंकाबाबत मार्गदर्शन चालू होते. त्यावेळी डॉ. अरूण लिमये यांचा परिचय झाला होता. पहिल्या अंकात त्यांच्या कादंबरीतील काही मजकूर छापला होता. परंतु त्यानंतर मुंबईला आल्यावर डॉ. चा फोन यायचाच त्यांना गिरगावात भेटीला जात होतो त्यावेळी त्यांची ब्लडकॅन्सरची ट्रीटमेंट चालू होती. केवळ तेंडुलकरांशी माझी जवळीक असल्यामुळे ते मला भेटत गेले. परंतु काही दिवसातच ते त्या आजाराला बळी पडले. मी त्यांच्या नावाने दिवाळीअंकात कथा, कविता व गझल या वाङमय प्रकारांसाठी बक्षिसे लावलीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लेख, कथा, कविता, व गझल येत आणि त्यातून व्यक्तिगत संबंध तयार होऊ लागलेत. एकदा असेच एस. एम. जोशी यांच्याकडे लेख मागितला होता. त्यांनी लेख पाठविला परंतु त्याबरोबर संपादिका (माझी पत्नी) हिला पत्र लिहिले होते की, ‘लेख पाठवायला उशीर झाला. लेख पसंत पडल्यास छापावा.’ मला पत्नीला सांगावे लागले की, एस. एम. जोशी हे केवढ्या मोठ्या योग्यतेचे असूनही त्यांचे विचार किती विनयशील आहेत. महाराष्ट्रातील लेखक मला त्या गावी, शहरात आलात तर त्यांच्या घरी येण्याचा आग्रह धरत. असंच मला एका दिवशी सेक्रेटरी श्री. शरद काळे विचारू लागले की, ‘अरे, मंत्रालयात उशिरापर्यंत काम करीत असतोस मग हा उद्योग कधी करतोस?’ आणि यात तुला काही फायदा होतो का? त्यावेळी मी त्यांना माझे लेखक त्यांच्या घरी येण्याचा कसा आग्रह करतात ते सांगितलं. सुरेश भट मला एका दिवशी लता मंगेशकर यांच्या घरी घेऊन गेलेत. गप्पागोष्टीत मोठ्यांचा मोठेपणा दिसत होताच. परंतु शेवटी लता मंगेशकरांनी मला व्ही.टी. स्टेशनपर्यंत पोहोचवून येण्याविषयी हृदयनाथ मंगेशकरांना सांगितलं. तेव्हा मांत्र वाटलं मी प्रकाशनक्षेत्रात नसलो तर… हा प्रसंग श्री. शरद काळे सो.ना सांगितल्यावर त्यांना मी घेत असलेल्या श्रमाचा मोबदला मिळतोय याची खात्री पटली. वेगवेगळ्या लेखकांचे, कवींचे परिचय होत गेले व खऱ्या अर्थाने माझे भावविश्व साहित्यक्षेत्राशी निगडीत बनलं. मधु मंगेश कर्णिकांचा परिचय वाढत गेला. अरूण साधूंचा परिचय वाढला. डॉ. भारत कुमार यांचा परिचय झाला व या सर्वांशी घरगुती संबंध प्रस्थापित झालेत. डॉ. मोहिनी वर्दे, विश्वास पाटील, इसाक मुजावर, वसंत भालेकर, जोसेफ तुस्कानो, माधव गडकरी, अशोक चिटणीस, माधवी घारपुरे, अशोक राणे, अशोक जैन, डॉ. नेताजी पाटील, यशवंत देव, डॉ. विलास खोले, प्रा. पु.द.कोडोलीकर, प्रा. वि.शं. चौघुले अशा कितीतरी लेखकांची फळी अनघा प्रकाशनने उभारली. प्रकाशनाशी त्यांचे संबंध कधीही व्यावसायिक न राहता आपुलकीचे राहिलेले आहेत. आजही बेळगावमधून सुभाष सुंठणकर नियमितरित्या अनघा प्रकाशनसाठी पुस्तके पाठवित आहेत, तर बंगलोरहून अनिल गोकाक हे आय.ए.एस. अधिकारी त्यांचे वडील डॉ. व्ही. के. गोकाक, (ज्ञानपीठ प्राप्त) यांची इंग्रजी, कानडीतील पुस्तके अनुवाद करून मराठीत पाठवतात. तर हैद्राबादहून डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू मराठवाडा विद्यापीठ, डॉ. नीता पांढरीपांडे, डॉ. राजूरकर ही प्रगाढ विद्वान मंडळी आपली पुस्तके प्रकाशनासाठी पाठवतात. प्रकाशनाचा हा एवढा पसारा वाढवण्यात माझा मुलगा अमोल हा मेकॅनिकल इंजिनिअर व एम. बी. ए. असूनही या क्षेत्रात उतरल्यामुळे सावरता आला आहे.

मला वाचनाची प्रचंड आवड आहे. नोकरीच्या काळात लोकलच्या प्रवासात, त्यानंतर दौऱ्यावर गेल्यावर प्रवासात मी सतत वाचन करीत असे. उत्तमोत्तम पुस्तकेखरेदी करण्याचा माझा छंदच आहे. परंतु आता ही जमवलेली पुस्तके पुन्हा वाचण्यासाठी इच्छा असूनही वाचून होत नाहीत ही खंत आहे. इतर जबाबदाऱ्या, प्रकाशनाची पुस्तके तपासणे व वयपरत्वे आलेली दृष्टीमंदता ही त्याची कारणे आहेत.

प्रकाशनाच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या सुप्रसिद्ध लेखकांमुळे व कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या आग्रहामुळे जळगांव, धुळे, अहमदनगर, नाशिक व नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसाठी उत्तर महाराष्ट्र साहित्यसभेची २०१० मध्ये स्थापना केली. त्या संस्थेचा मी विश्वस्त म्हणून काम बघतो. आतापर्यंत ३ साहित्यसंमेलने आयोजित करता आली. प्रत्येक वेळी साहित्यिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.

या साहित्यिक चळवळी व्यतिरिक्त गेल्या ३ वर्षांपासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईत माझी ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केली. गेल्या ३ वर्षांत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात यश लाभत गेले आहे. पहिल्या वर्षापासून सुरेश भटांची गझल मला मिळत होती. काळाच्या ओघात ते सुहृद झालेत. त्यांना मुंबई, पुण्याच्या काही लेखकांचा खूप राग होता. त्यासाठी ते त्यांच्या ‘जीवना तू तसा मी असा’ या आत्मचरित्रात त्यांचा हिशेब चुकता करण्याच्या विचारात होते. परंतु मी त्यांना सांगितले, प्रकाशिका माझी पत्नी आहे. काही कोर्ट कचेरी झाल्यास तिला त्रास होईल. मी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर आपण ते पुस्तक प्रकाशित करू. परंतु ते माझे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यांनी ३/ ४ लेख लिहिलेत आणि त्यांना इंद्राच्या दरबारात गझल म्हणण्यासाठी बुलावा आला. त्यांना जावेच लागले.

अशीच गोष्ट विजय तेंडुलकरांच्या बाबतीत झाली. आमच्या मधून मधून होणाऱ्या भेटीत मी त्यांना पुस्तकाची मागणी करीत नव्हतो. मी त्यांना म्हणत असे की, त्यांचे आत्मकथन मला प्रकाशित करावयाचे आहे ते प्रत्येकवेळी म्हणायचे, ‘मी आत्मकथन लिहिण्याची अजून वेळ आलेली नाही.’ इथेही असेच घडले. प्रथम त्यांचा एकुलता एक मुलगा अचानक गेला, त्यानंतर त्यांची लाडकी मुलगी प्रिया दुर्धर आजाराला बळी पडली. हे कमी म्हणून की काय त्यांच्या पत्नीचा आजार बळावला. माणसानं दु:ख सोसावं म्हणजे तरी किती! तेंडुलकरांनी पत्नीच्या निधनानंतरही आपली मनस्थिती ढळू दिली नाही. त्यांच्या या दुःखाच्या डोंगरातून आत्मकथन बाहेर काढणे कठीणच होते. माझा हा प्रकल्प देखील होऊ शकला नाही.

माझ्या साहित्यिक चळवळीत माझ्या पाठीशी भक्कम उभी राहणारी ही दोन्ही दिग्गज माणसे अशी मला पोरका करून गेली, कारण या दोघांच्या आत्मकथनाच्या प्रकाशनातून मला मिळणारा आनंद हा स्वर्ग प्राप्तीचा ठरणारा होता. माझ्या मनात हे शल्य मात्र कायम अश्वत्थामी दुःखासारखं घर करून राहिलं आहे.

आता न ती स्वप्ने तुझी
तुजलाच तू विसरून जा…
हे ही खरंच आहे की,
स्वप्ने सुगंधी आसमंतात विरली
सिल अश्वत्थामी उरात आता उरली… 

मुरलीधर नाले

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..