पुण्यातल्या तरुण भारत या दैनिकामध्ये त्यावेळी मी काम करीत होतो. नेमकेपणानं सांगायचं तर २६ जून १९७५ रोजी रात्रपाळीचा उपसंपादक म्हणून माझं काम सुरू होतं. त्याआदल्या दिवशी पहाटे चारपर्यंत ऑफिसमध्येच होतो. इंदिरा गांधींनी काही विरोधी नेत्यांची धरपकड केल्याचं छोटं वृत्त त्यादिवशीच्या अंकात प्रसिद्धही केलं होतं; पण खरी सुरुवात झाली ती २६ जून रोजी. देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. अटकसत्र सुरू होतं. घटना अत्यंत वेगानं घडत होत्या. आता विचार केला तर वाटतं आणीबाणीचं गांभीर्य त्यावेळी तरी तेवढ्या प्रमाणात जाणवलेलं नव्हतं. लोकशाहीवर संकट, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा याबाबी कळत होत्या; पण त्याहीपेक्षा आपण पत्रकारितेत आहोत आणि या सर्वांचा थेट अनुभव घेत आहोत याचं थ्रील अधिक होतं. कामापेक्षाही गप्पा, चर्चा, प्रतिक्रिया अधिक येत होत्या. मी ज्या दैनिकात काम करीत होतो त्याच्या ध्येयधोरणाला पाठिंबा द्यावा किवा विरोध करावा. अशी मानसिकताही नव्हती. मात्र, देशातल्या या घडामोडीमुळं सार्वत्रिक अस्वस्थता मात्र होती. आणीबाणीचा पत्रकारितेवरचा थेट परिणाम म्हणून सेन्सॉरशिपचा विषय पुढे येत होता आणि आता बातम्या द्यायच्या काय, कशा अन् किती असे प्रश्न पुढे येत होते. त्यावेळी मी या क्षेत्रामध्ये इतका नवा होतो, की त्याच्या परिणामाची कल्पना करता येऊ नये. मला आठवतं त्यादिवशी एस. एस. सी.चा निकाल होता आणि आणीबाणीतल्या घटना-घडामोडी होत्या. जयप्रकाशांपासून अडवाणींपर्यंत अन् जॉर्ज फर्नांडिसांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अटकसत्र सुरू होतं. बातम्यांना कमतरता नव्हती. आणीबाणीचा निषेध म्हणून अग्रलेखाची जागा कोरी ठेवण्याचा निर्णय घेतला गेला होता. एकूण काम सुरू होतं. रात्री अकरा-साडेअकराची वेळ असावी, एक फोन आला की सेन्सॉरचं काम आजपासूनु सुरू होणार. रात्री बारानंतर त्यावेळचे पोलीस उपायुक्त वसंतराव पारसनीस आपल्या ताफ्यासह कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी सोलापूरसाठीचा अंक छापून तयार होता. तो अंक त्यांनी पाहिला अन् कोणत्या बातम्या द्यायला नकोत याच्या खुणा ते करू लागले. एक, दोन, तीन, पाच अशा विविध बातम्यांवर लाल रेघा उमटत होत्या. आपल्या अधिकार्यांना सूचना देऊन ते निघून गेले. रात्रीच्या वेळी माझ्या दोन ज्येष्ठ सहकार्यांशिवाय अन्य कोणी नव्हते. या बातम्या काढून टाका, असा आदेश अधिकार्यांनी दिला. या बातम्या काढून टाकणं अशक्य आहे, कारण त्या बातम्या काढल्या, तर तिथे कोणत्या बातम्या टाकणार, हा प्रश्न होता. त्यावेळी मोनो किवा लायनो कास्टिंग पद्धतीनं कंपोज तयार केला जायचा. या बातम्या एकमेकाजवळ एका पानात रचून त्याचा छाप एका जाडसर कागदावर घेतला जायचा अन् त्यानंतर मशीनवर बसविता येईल असा अर्धगोलाकार साचा तयार व्हायचा. फ्लाँग, स्टिरिओ अशी नावं त्याला होती. या बातम्या काढून टाकणं किती अवघड आहे हे सांगण्याचं काम माझ्यावर आलं. पोलीस अधिकार्याला यंत्रणा आणि वास्तव मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. त्या बातम्या काढल्या नाही तर अंक प्रसिद्ध होऊ देणार नाही अशी त्याची भूमिका होती. याचवेळी मला राऊटिग यंत्राची आठवण आली. मी म्हणालो, ‘‘जो अंकाचा, पानाचा साचा तयार झाला आहे. तेथून या बातम्या काढून टाकता येतील. एका अर्थाने पानात लिहिलेला मजकूर नको असेल तो खोडता येईल.’’ झाले, अधिकार्याला त्या बातम्या येऊ नयेत एवढेच हवे होते. त्याचे काम झाले होते. त्यानं माझ्या समवेत उभं राहून नको त्या बातम्या खोडायला सांगितल्या. राऊटिग मशीनमधला खोडकाम करणारा भाग त्या सयार्यावरची उमटणारी अक्षरं खोडत गेला आणि असं पान तयार झालं की जे प्रसिद्ध होणं सरकारला नको होतं. दुसर्या दिवशी विविध अंक प्रकाशित झाले ते तरुण भारतपेक्षा वेगळे नव्हते. त्यात एस. एस. सी.चा निकाला होता; पण दिल्लीतील वीज गायब हे वृत्त नव्हतं. सेन्सॉरशिपची चौकट होती; पण धरपकडीतलं नाट्य नव्हतं. २६ जून रोजी दिल्लीत किवा भारतात काय घडलं. याचं चित्रण पूर्णपणे पुसलं गेलं होतं. मात्र, अंकाचा तो चेहरा पाहून या रिकाम्या जागांवर काय, काय असू शकेल याचा अंदाज येत होता. आणीबाणीचा विरोध लोकांपर्यंत जाऊ नये असं शासनाला वाटत होतं अन् तो रिकाम्या जागातून अधिक तीव्रपणे व्यक्त होत होता. आणीबाणीच्या पहिल्या टप्प्यात सहभागी होतांना आपण वृत्तपत्राच्या इतिहासातल्या महत्त्वपूर्ण क्षणाचे साक्षीदार झालो याचा आनंद होता. आज जाणवतं, मौन हा केवळ रुकार असत नाही, तो नकारही असतो. निषेधही असतो अन् क्षोभही! त्यादिवशी सर्वच वृत्तपत्रे यार्या अर्थानं अभिव्यक्त झाली होती. काहीही न सांगता रिकामी असतानाही!
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply