राष्ट्रकूल स्पर्धेच्या तयारीतूनच भारताच्या प्रतिष्ठेला धक्क्यावर धक्के बसू लागल्याने क्रीडा क्षेत्रात भारताची प्रचंड घसरण होवून बसलीय हे कटू सत्य पचविणं आता भाग पडलं आहे. भारताचं क्रीडा कौशल्य जागतिक पातळीवर चमकावं म्हणून काय-काय प्रयत्न करावे लागतात याची प्रत्येक क्रीडा जाणकाराला जाण आहे परंतु याहीपेक्षा भयंकर अन् गंभीर गोष्ट म्हणजे या प्रयत्नांना शह म्हणून की काय एखाद्या गुणी खेळाडूला आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकायला त्याला कोण-कोणत्या दिव्यातून जावे लागते हे त्याही पेक्षा महाभयंकर आहे. यासाठी आम्ही नजिकच्याच काळातील भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूंनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा कोणीही विसरले नसतील. एखाद्या कर्करोगाप्रमाणे लागलेली ही बेईज्जतीची लागण भारतीयांना शरमेने माना खाली घालायला लावणारी बाब आहे मग त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणार्या टायगर वूडस्, डेव्हिड बेकहैम, अथवा पाकिस्तानच्या क्रीकेटपटूंनी ओढवून घेतलेल्या स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणावर उजळपणे टिकात्मक बोलण्याची संधी भारत मावून बसला आहे या विविध प्रकारचे ‘कांड’ करणार्या पश्चिमात्य खेळाडूंना नावे ठेवण्याची देखील भारताला संधी उरली नाही. आताच्या राष्ट्रकूल खेळांच्या तयारीवरुन चाललेल्या घोटाळ्यांनी तर त्यावर शिक्कामोर्तबच करुन टाकले आहे. गेल्या दशकात आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धा भरविण्याची जी चढाओड इतर राष्ट्रांमध्ये बघायला मिळाली त्यावरुन तरी भारताच्या राष्ट्रकूल स्पर्धांचे आयोजक म्हणजे किस खेत की मूली? असेच झाले आहे. सेउल ऑलिम्पिकचे दिमाखदार आयोजन, त्यानंतर वर्ल्डकप फूटबॉल स्पर्धांचा अनोखा थरार, एवढच कशाला जागतिक अॅथलिट स्पर्धांचे यशस्वी आयोजक बघितले तर भारतातल्या या राष्ट्रकूल स्पर्धांची तयारी म्हणजे नु्स्ता अंध:कार आहे असे म्हणायला खुप वाव आहे. भारताच्या राष्ट्रकूल स्पर्धांचे आयोजक स्पर्धा यशस्वी होतील अशा कितीही ‘बाता’ मारत असले तरी त्यांनी जी तयारी पूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘छी’ ‘थू’ करुन घेतली ती भारताची इज्जत चव्हाट्यावर आणायला पूरेशी ठरली आता स्पर्धाचे आयोजन करावेच लागणार असल्याने त्या यशस्वीपणे पार पडतील अशी बाजू प्रत्येकजण सावरु लागला आहे पण यामुळे भारताच्या क्रीडाविभागाचे जे वस्त्रहरण झाले आहे ते झाकता येणार नाही. भारतात लोकसंख्येच्या तुलनेत क्रीडा क्षेत्रावर करावयाचा खर्च व गुणवंत खेळाडूंना पुढे आणण्याची मानसिकता ही इतर देशांच्या तुलनेत नाही म्हणायला कमकुवतच आहे. चीन सारखा बलाढ्य देश लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असून देखील ऑलिम्पिक व आशियाई खेळात पहिल्या पाचात आपले स्थान अबाधित ठेवून आहे पण भारताची मात्र आज तागायताचा इतिहास बघितला तर नुसती ‘गोची’ झाली आहे. नोकरशाही, भरमसाठ मिळणार्या निधीचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती, नियोजनाचा अभाव अन् आपसातील मतभेदांच्या चव्हाट्यावर आणण्याची सवय या सर्व गोष्टी भारताच्या क्रीडा क्षेत्रातल्या अधोगतीला कारणीभूत आहेत.
राष्ट्रकूल स्पर्धांचा आयोजकात उपरोक्त सर्व बाबी लागू झाल्या आहेत व म्हणूनच त्याचे वाईट परिणाम देखील समोर येत आहेत. या वाईट परिणामांमुळेच की काय दर्जेदार खेळाडूंनी राष्ट्रकूलमधन माघार घेतली आहे. एवढच कशाला खुद्द भारतातल्या स्टार खेळाडूंनी देखील नाराजी प्रदर्शित केली आहे. संताप आणि चीड आणणारी बाब म्हणजे सरकार मात्र गचाळ आयोजन करणार्यांना पाठीशी घालण्याचे काम करुन क्रीडाप्रेमींच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार करीत आहे आणि खेळांच्या आयोजकातील गचाळपणा, भ्रष्टाचार आणि इतर बाबींवर पांघरुण घालणार्या सुरेश कलमाडींनी कितीही अभिमानाचा आव आणला तरी राष्ट्रकूलचा कोसळलेला पूल, क्रीडांगणाचे कोसळलेले छत या गोष्टींनी त्यांच्या अकार्यक्षमतेवरील भ्रष्ट प्रवृत्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी ता ‘लाजश्र’ सोडल्यामुळे त्यांना सल्ले देवूनही फायदा नाही क्रीडा रसिकांना मात्र नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे एवढे मात्र नक्की! कलमाडींना कोणती शिक्षा द्यायची हे मात्र ‘काळ’ सांगणार आहे तोपर्यंत क्रीडा प्रेमींनो धीर धरा….!
राष्ट्रकूल स्पर्धेच्या तयारीतूनच भारताच्या प्रतिष्ठेला धक्क्यावर धक्के बसू लागल्याने क्रीडा क्षेत्रात भारताची प्रचंड घसरण होवून बसलीय हे कटू सत्य पचविणं आता भाग पडलं आहे.
— अतुल तांदळीकर
Leave a Reply