MENU
नवीन लेखन...

आणखीन एक

दुपारची वेळ, डोळ्याला डोळा नुकताच लागला होता. नको त्या वेळेस घणघण्याची फोन ची सवय. सवयीप्रमाणे तो घणघणलाच. कुस बदलून घेतला. ओळखीचा नंबर नव्हता. माझ्या सारख्या छोटया पडद्यावरच्या अभिनेत्याला सुद्धा असे unknown number घेणे आवडत नसते, ego issue म्हटले तरी चालेल. पण गेले कित्येक दिवस घरात बसून कंटाळलोच होतो. विचार केला, जरा वेळ चांगला जाईल आणि फोन घेतला.

“हॅलो, अजय कसा आहेस रे? ” फोन उचलता क्षणीच समोरुन कोणा एका स्त्रिचा घणघणीत आवाज कानावर आदळला. क्षणभर चक्रावलो. अजय अशी एकेरी आवाजात हाक मारणाऱ्या दोनच स्त्रिचा माझ्या आयुष्यात उरल्या होत्या. एक ताई आणि दुसरी वहिनी. आता हि तिसरी कोण? मला प्रश्नच पडला. तरीही उत्तर तर द्यावे लागणार होतो, म्हणून बोललो,

“मी चांगला आहे. तुम्ही कोण बोलताय? ”

“Oh, thank God. तू खूप आजारी असल्याचे मला कळाले होते पण फोन करु का नको अशा द्विधा मनस्थितीत होते. दवाखान्यातून घरी आलास ना? ”

“हो, हो, घरी आहे आणि मजेत आहे. राग मानू नका पण मला कळेल कां आपण कोण बोलताय ते? ”

“घर ते घर बघ अजय दवाखाना काय, कितीही सुखसोयींनी उपलब्ध असला तरी शेवटी तो दवाखानाच. आता चांगली विश्रांती घे. स्वतःची काळजी घे. डॉक्टरांचा सल्ला ऐक. सर्वात महत्वाचे म्हणजे ती दारु, त्या पाटर्या आता बंदच कर बाबा.’

ह्या तिच्या शेवटच्या वाक्याने तर मी बसल्या जागी उडालोच. अजून स्वत:ला सावरतोय नाही तो पर्यंत पुढचा प्रश्न,

“घरी सदा आहे नां? त्या स्वयंपाक वाल्या कला मावशी येतायत ना? तुझा ड्रायव्हर सुट्टीवर गला होता तो आला कां नाही? तसे काय म्हणा तुझ्या घरुन कोणी ना कोणी येत असतातच म्हणा तसा तू एकटा नसतोसच.

“अहो मी एकटा नसतो. तो issue नाहीच आहे. पण माझ्याबदल इतकी माहिती असणारी तू कोण बोलते आहेस हे मला समजेल कां? ” नकळत मी एकेरीवर आलो.

“Sorry, really sorry. बोलण्याच्या नादात मी कोण हे सांगायचे. राहून गेले. तू ओळख पाहू, तुला काही आठवतंय कां? लहानपाणी तुला अज्या, टज्या म्हणून चिडवणारी, शेजारी राहणारी कोणी मुलगी? ”

“Oh yes… yes… पुष्पा… शेंबडी अग तुला कोण विसरणार? माझी सगळी डिटेल माहिती आहे हं तुझ्याकडे.”

“ओ, एकतर आता मी शेंबडी नाही. ऑफिसात मला पुष्पा मॅडम म्हणतात. मी. मीस पुष्पा पेठे. दुसरी गोष्ट मला हवी असलेली माहिती मी मिळवते आणि तुझी वहिनी माझी शाळेतील मैत्रीण आहे.

“Ok पुष्पा मॅडम. अजून तुम्ही पेठेच कां? कोणी मिळालेला दिसत नाही. आणि माझ्या माहितीमध्ये interest तुझा पाहून बरं वाटतय बघ.

“हं बोलू ह्यावर कधीतरी अजय, आत्ता साहेब केबिन मध्ये बोलवतायत. But you take care हं. दारु पिऊ नकोस…” इतके सगळे पटापट बोलून तिने फोन ठेऊन दिला. मी पण गालातल्या गालात हसलो आणि फोन ठेवून दिला.

मी आणि पुष्पा जवळ-जवळ बरोबरीचेच. माझ्यापेक्षा काही महिन्यांनी ती लहान असेल. शेजार-शेजार च्या घरांत आमच लहानपण गेलं. ते पेठे आम्ही साठे. बरीच वर्षे आम्ही शेजारी होतो. घर जरी शेजार-शेजारची होती, तरी एका घरांत पोळ्या झाल्या तर दुसऱ्या घरांत भाजी शिजत असे अशी आठवण आई आणि ताई सांगायच्या. त्या काळची माझी आठवण म्हणजे जुने लहानपणी फोटो.

सदा म्हणजे माझा caretaker. त्याला हांक मारली. कपाटातून जुना अगदी जर्जरीत झालेला आल्बम काढायला सांगितला. बाबांच्या इस्टेटीमधून मी हट्टाने उचलून आणलेली हि एकमेव वस्तू… जुने संग्रहित फोटो… सदाने त्यावरची धूळ कापडाने झटकली आणि माझ्या बाजूला आणून ठेवला. मी त्याची पान चाळायला सुरुवात केली. ते काळे पांढरे फोटो पाहून तर हसूच आलं. पहिलाच फोटो अस्मादिकांचा. फारच खूष झालो. तसा त्या फोटोत अवधा तीन चार वर्षांचा असेन. अबब… केवढे प्रचंड केस होते माझ्या डोक्यावर पाहतच राहिलो.

समोरच्या आरशात स्वत:ला निरखून पाहिलं… नकळत मी माझ्या केसविहीन गुळगुळीत डोक्यावरुन हात फिरविला… चपापलो… लगेचच स्वतःला सावरुन फोटोतल्या माझ्या भरपूर केस असलेल्या डोक्यावरुन हात फिरविला… त्या खुशीतच आनंद मानला व एकामागून एक पुढील फोटो पाहायला सुरुवात केली. एका फोटो मध्ये मी आणि पुष्पा आपआपल्या आईच्या कडेवर बसलेलो होतो. एका फोटोत तर ती आणि मी बाबांच्या स्कुटरवर पुढे उभे… अगदीच रडके, शेंबडे… बापरे… पुन्हा एकदा आरशात पाहिलं. हं, आजारी दिसत होतो हे खरे, पण रडका वगैरे नक्कीच दिसत नव्हतो. आम्ही दोघे जवळ-जवळ सहा सात वर्षाचे होई पर्यंत जमशेदपूरला एकमेकांचे शेजारी होतो. त्यानंतर तिच्या बाबांनी नोकरी बदलली आणि ते कुठेतरी दुर्ग भिर्लइ त्या भागात रहायला गेले. माझी पेठे कुटुंबीयांची आठवण इथपर्यंतच राहिली. आमच्या घरांत मात्र पेठे हा विषय सदैव असायचा.

पुढे दिवस गेले. वर्षे गेली. मी मोठा झालो. पुण्याला इंजिनियरींग कॉलेजच्या हॉस्टेल मध्ये राहायला गेलो. पुष्पाला सुद्धा पुण्याला फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन मिळाली आणि ती कुठल्यातरी त्यांच्या नातेवाईंकासोबत रहात असते हे मला आईने सांगितले होते पण ते माझ्या डोक्यातून पूर्णपणे निघून गले होते. एके दिवशी अचानक ती माझ्या समोर येऊन उभी राहिली. तिनेच मला स्वतःची ओळख करुन दिली. तिच्या आईने तिला माझी सगळी माहिती दिली होती. त्यामुळे ती मला शोधत आली होती. त्या वेळेस आमचे थोडेसे संभाषण झाले होते. नंतर तिने तीन-चार वेळा मला भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक वेळेस माझ्यासोबत सीमा असायची. हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने मला भेटणे टाळले.

परंतु माझ्या घरी मात्र सीमा आणि माझ्या मैत्रीची संपूर्ण माहिती पोहचलेली होती. सीमा, श्रीमंत घरची एकुलती एक अत्यंत मॉडर्न मुलगी आहे तिचे वडील पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. श्रीमंतीमुळे तिचे शौक ही श्रीमंती आहेत, तिची आई प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्या नाट्यकलाकार म्हणून खूप प्रसिद्ध होत्या. त्यांचा गूढ मृत्यु झाला होता वगैरे वगैरे अगदी अथ पासून इति पर्यंत संपूर्ण माहिती.

घरी कळाल्यानंतर, सीमाचे सतत माझ्या सोबत असणे आईबाबांना फारसे आवडले नव्हते. मी अतिशय हुशार मुलगा होतो. माझे अभ्यासातून लक्ष उडून जाईल ही त्यांची पहिली काळजी होती. दुसरे म्हणजे आमचे घर मध्यमवर्गीय आणि बाळबोध वळणाचे. संध्याकाळी देवाचा दिवा लावून उदबत्तीच्या मंद, पवित्र सुगंधामध्ये आणि दिव्याच्या वातीच्या शांत उजेडात देवासमोर बसून शुभंकरोती, परवच्या म्हणणारी आम्ही मंडळी. असल्या आमच्या घरांत संध्याकाळी परक्या मुलांसोबत, उग्र अत्तराच्या वासामध्ये, लाईटच्या मंद मादक उजेडात हार्ड ड्रिंक्स घेणारी सीमा हे तर न जुळणारे गणित होते. मला हे सगळे समजत होते. पण ऐन तारुण्यात घरातून मोकाट सुटलेला मी मुलगा होतो. बाहेरच्या रंगीबेरंगी जगाशी झालेली ताजी ताजी ओळख होती त्याची भुरळ पडली आणि ह्या आकर्षक “बॉबकट” असलेल्या, शर्ट पॅन्ट घालून मुलांच्या बरोबरीने उभी राहून गप्पा मारणाऱ्या, हलकंस हार्ड ड्रिंक घेणाऱ्या सीमाकडे आकर्षला गेलो. कॉलेजांत नाटकात आम्ही बरोबरीने अभिनय करत होतो. प्रॅक्टिस निमित्ताने दिवसातला बराच वेळ ओकामेकां सोबत असायचो. ती दिसायला सुंदर होती. तिचा अभिनय उत्कृष्ट होता. तिच्याकडे अनेक प्लस पॉईंट होते. माझा एकच प्लस पॉईंन्ट होता, मी हुशार होतो. अशा अनेक कारणांमुळे आमची घनिष्ट मैत्री जमली होती. पुढे त्या मैत्रीला ‘प्रेमप्रकरण’ अस गोंडस वळण मिळालं.

शिक्षण पूर्ण झाले. मला चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. एव्हाना आमचं प्रेमप्रकरण तिच्या वडिलांपर्यंत पोहचल होत. ते लवकर लग्न करा अशी घाई करु लागले. माझे आईबाबा ह्या लग्नाला “हो” म्हणणे शक्यच नव्हते. शेवटी आईबाबांच्या मनाविरूद्ध जाऊन, त्यांना काहिही न सांगता मी आणि सीमाने कोर्टात जाऊन विवाह केला. त्या संध्याकाळी तिच्या बाबांनी त्यांच्या क्लब मध्ये दणक्यात पार्टी दिली. भरपूर मंडळी आमंत्रित केलेली होती. फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून निघाला होता. दारु आणि खाण्यापिण्याची रेलचेल होती. भरपूर रोषणाई असलेल्या हॉलच्या एका कोपऱ्यात वाद्यवृंद मंद मंद वाजत होता. आणि मी मी मात्र त्या माणसांच्या मेळाव्यात सीमा शेजारी उसने हसू तोंडावर आणून एकटाच उभा होतो. सभोवताली फिरणारी माझी नजर आई बाबा, ताई भाऊजी, दादा वहिनी आणि घरातील बच्चे कंपनीला शोधत फिरत होती. त्या क्षणी आपण चुकलो. अक्षम्य गुन्हा केला. ह्याची खोलवर जाणीव झाली. त्या रात्रीला दुसऱ्या दिवशीच्या सकाळची आतुरतेने वाट पहात होतो. सकाळी घरी जाण्याची तीव्र ईच्छा होत होती…..

पण कुठल्या तोंडाने जाणार होतो? माझी मलाच लाज वाटत होती. मला रहावले नाही. दादाला फोन केला आणि सगळे सांगितले. तो एकही शब्द बोलला नही. त्याने फोन ठेवून दिला. काही वेळ मी ही स्तब्ध उभा राहिला होतो…. पण पुढची वाटचाळ तर चालू ठेवायलाच पाहिजे होती.

सर्वसाधारण घरातला मी आणि श्रीमंत व अतिसुधारलेल्या घरातील सीमा अशा आमच्या जोडीच्या संसाराला सुरुवात झाली होती. नव्याचे नऊ दिवस तसे सुरुवातीचे काही महिने सगळे सुरळीत चालू होते. माझी नोकरी, तिचे शॉपींग, संध्याकाळी कुठल्यातरी हॉटेलात डिनर असे दिवस जात होते. हळूहळू ती कंटाळली. मला पण संध्याकाळी घरी आल्यावर घरचे जेवण मिळावे अशी ईच्छा होऊ लागली. ओक दिवशी तिने, आपली नाटकात काम करण्याची ईच्छा बोलून दाखविली नाटकात काम करणे ही तिची आवड होती ती ओका अभिनेत्रीची मुलगी होती. अभिनय हा तिच्या रक्तात होता. तिने स्वत:ला पुन्हा रंगमंचावर अजमायला सुरुवात केली. तिची ती आवड आणि उत्कृष्ट अभिनय पाहून तिच्या वडीलांनी नाटक कंपन्यांना फायनान्स करायला सुरुवात केली.

मग काय विचारता? पुढे येणाऱ्या प्रत्येक नविन नाटकात मूख्य भूमिका सीमाकडेच. बघता बघता वर्तमान पत्रातील जाहीरतींमध्ये, भिंतीवरील जाहीरीतीवर, विजेच्या खाबांवरच्या पोस्टरवर जिकडे-तिकडे फक्त सीमा-सीमा आणि सीमा. सुरुवातीला काही नाटकात मी तिच्याबरोबर तिच्यासोबत राहण्यासाठी कामे केली. पण मला ते फार काही आवडले नाही. तिची मात्र घोडदौड चालू होती. रंगमंचावरुन तिचे सिनेसृष्टितही पदार्पण झाले होते. त्यामुळे पाण्यासारखा पैसा वाहू लागला होता.

खरे तर माझीही नोकरी काही कमी नव्हती. लठ्ठ पगाराची नोकरी होती. पंरतू तिच्या दृष्टिने ती आता ठीक-ठीक राहिली होती. तिला माझ्या पगारातील पैशाची गरज राहिली नव्हती. दोन-तीन वर्षे तिने अभिनय करत संसार सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण वाढत्या प्रसिद्धिमध्ये पाण्यासारख्या वाहणाऱ्या पैशासोबत ती वाहत गेली. संसाराचा बांध कधीच तुटून गेला होता. तो तिच्या लक्षातही आला नव्हता बांधातून जोरात बाहणाऱ्या पाण्याला मी हतबलीत होऊन पहात होतो. तरीही मी सतत तिच्यासोबत रहाण्यासाठी नोकरी करताना रात्रीचे नाटकाचे प्रयोग स्विकारु लागलो. तसा मी कलाकार तर होतोच पण माझ्या रक्तात अभिनय नव्हता त्यामुळे ही कसरत एखाद वर्षभरच करण्यात मी यशस्वी झालो. माझ्या सारख्या मध्यमवर्गीयाला सीमा, तिची ती नाटक, तिचा तो मित्रवर्ग, रात्रीचे घराबाहेर राहणे, दारुच्या पाटर्या, सिगारेटच्या धूरांची वलय हे सर्व वातावरण झेपण्यापलिकडच होत. त्या वातावरणात मी दडपला गेलो. हळू हळू आमच्या मध्ये बऱ्यापैकी भांडण होऊ लागली. ह्या भांडणांना कंटाळून तिने स्वतःसाठी एक फ्लॅट विकत घेतला. रात्री उशीर झाला किंवा दोन पेग जास्त झाले की ती त्या flat मध्ये राहू लागली. आमचा संसार आणि मी दोनही तिच्या पाायतली बेडी झाली होती.

नेमके ह्याच काळात तिचे वडील गले तिच्यावर असलेले उरलेसुरले बंधन ही संपुष्टात आले होते तिच्या दु:खात सहभागी होण्यासाठी दारू आणि तिचा मित्रवर्ग भरपूर होता माझी गरज उरलीच नव्हती. तसाही म्हणा, मी नावापुरताच नवरा होतो.

अचानक, मी आयुष्यातल्या एका विचित्र वळणावर येऊन उभा राहिलो होतो. त्या वळणावरील काटेरी झुडपांचे काटे मला अतिशय वेदना देऊ लागले, डोक्यावरच रखरखणार उन मी सोसू शकत नव्हतो. दूरवर कुठेही आश्रयाला सुद्धा एखाद्या झाडाची सावलीही दृष्टिस पडत नव्हती. माझ्यासाठी हे सगळेच असह्य होत चालले होते. ओका विचित्र कोंडीत मी ओकटाच….. ओकटाच… सापडलो होते अशात दारुच व्यसन कस आणि कधी लागल ते मला कळालच नाही…

ओके दिवशी दारुच्या नशेत असतानाच, अर्धवट भरलेली काचेची दारूची बाटली माझ्या हातातून निसटली व जोरात जमिनीवर आदळली. तिच्या भयंकर कल्ल अशा आवाजाने घराच्या खिडक्यां खिळखिळ आवाज करत हादरल्या…… गुदमरून टाकणारा तो विचित्र वास माझ्या नाकात गेला. नकळत उलटीचा जोरदार हमका आला आणि भडाभडा ओकलो ……. मी घाबरलो…… त्या घाणीत पडून घाण आणी काचा शरीराला लागतील अशी भिती वाटली…. तोल सांभाळण्यासाठी भिंतीचा आधार घेतला……. भिंतीशिवाय आधार देणारे दूसरे कोणी घरात नव्हतेच….. मी आणि मी…. फक्त मी… मी ओकटाच… कसेतरी स्वतःचे शरीर बाजूला असलेल्या सोफ्यावर झोकून दिले आणि त्या घाणीतच झोपून गेलो.

दूसऱ्या दिवशी सकाळी बेलच्या कर्कश आवाजाने जागा झालो. समोरच्या घडयाळात आठ वाजलेले दिसले. नजर खाली जमिनीवर पडली. माझी मलाच लाज वाटली. लाजेने खाली बघतच मी दार उघडले. राजू सकाळच झाडू पोचा आणि इ. काम करायला आला होता. आश्चर्यचकीत होऊन क्षणभर त्याने माझ्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्याला डोळा देण्याची माझे धाडस नव्हते. त्याने मुकाटयाने घाण साफ करायला सुरुवात केली. मी शांतपाणे सोफ्यात बसून पहात होतो. तो काचा गोळा करत होता. त्या काचांच्या आवाजात मला माझ्या आईच्या हळू हळू रडण्याच्या आवाजाचा भास झाला. माझी ही अवस्था पाहून ती दुसरे काय करेल? रडेलच नां? मला वाटल ती मला बोलावती आहे. त्या क्षणी तिच्याजवळ जाऊन तिच्या मांडीत डोक ठेवून धाय मोकलून रडावे असे वाटू लागले… पण… पण मी कसा जाणार होतो?

मी तर तिचा बाबांचा कोणाचाच विचार न करता, त्यांना काहीही न सांगता घर सोडून आला होतो. बराच वेळ विचार केला. ताडकन उठलो आणि बाथरुम मध्ये गेलो अंगाचा घाणेरडा वास गरम गरम पाण्याने स्वच्छ धुवून टाकला. बाथरुमच्या बाहेर आलो. राजू माझी वाट पहात बाथरुमच्या बाहेर उभाच होता. म्हणाला, “दादा मी दिवाळीसाठी घरी जातोय. आठवडाभर येणार नाही. घरी आईबाबा आणि बहिण, भाऊ सगळे आहेत. दिवाळीनंतर येईन.” असे सांगून माझ्या उत्तराची वाट ही न पहाता तो निघून गेला. मी स्वतःशीच हसलो. घरी जाण्यासाठी सुट्टी घेताना माझ्या उत्तराची अपेक्षाही न करता निघून जाणाऱ्या राजूच्या वागण्याने माझ्या मध्ये नाविन उर्जा संचारली. ऑफीसात पोहचलो, सुट्टीचा अर्ज केला आणि थेट निघून कोल्हापूरला जाणारी बस गाठली. मी इंजिनियर झालो त्याच वर्षी बाबा रीटायर्ड झाले होते आणि आमच्या जून्या घरी कोल्हापूरला येउन स्थायिक झाले होते. दादा त्या पूर्वीच कोल्हापूरात पोहचला होता तो कॉलेजात प्रोफेसर होता आणि वहीनी शाळेत प्रिन्सीपॉल होती. ताईच सासर- तिथूनच जवळ ८० कि.मी. वर होत ती तीकडेच रहात असते. खरे तर मी पण शिक्षण पूर्ण करुन कोल्हापूरात रहाव अशी बाबांची ईच्छा होती. पाण माझ्या नशिबाने मला पुण्यात आणून सोडलं होत.

बस कोल्हापूरात पोहचली तेव्हा संध्याकाळ होऊ लागली होती. तिनिसांजेला वहिनी तुळशीजवळ दिवा लावत होती आणि माझी रिक्षा दारात जाऊन थांबली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

तिने दादाला हांक मारली. क्षणभर मी घाबरलो. मला घरात घेतील की नाही अशी भिती मनाला स्पर्शन गेली. वहिनीचा आवाज ऐकून सगळेजण घराबाहरे आले. मला पाहून त्यांच्या आनंदाला पार राहिला नव्हता. आई पुढे आली तशी मी तिला जवळ घेतली आणि तिच्या आनंदाश्रुत न्हाऊन निघालो. सगळ्यांच्या पाया पडत सगळ्यांसोबत घरात गेलो. आईला तर काय करु काय नको असे झाले होते.

“एकटाच आलास कां रे? सीमा नाही आली कां? ” आईने विचारले.

मी उत्तर देणे टाळले. माझे वागणे बाबांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी विषाय बदलला. रात्री सगळ्यांच्या सोबत मांडी घालून बसून जेवलो. वरण-भातावर यथेच्छ ताव मारला. थोडयाफार गप्पा झाल्या आणि सगळे झोपायला गेले. मी पुण्यात येऊन निशाचर झालो होतो. मला झोप येत नव्हती. शेवटी बाहेर अंगणांत जावून बसलो. जवळ-जवळ चार-पांच वर्षानंतर असा ओकटाच, हातात दारुचा ग्लास घेतल्याशिवाय निरभ्र आकाशाखाली, मोकळी हवा अंगावर घेत निवांत बसलो होतो. वाऱ्याची प्रत्येक झुळूक आयुष्यात केलेल्या ओक -अंक चुकीची आठवण ताजी करुन जात होती. आपल्याच विचारात मग्न मी शांत होतो. तितक्यात पाठीवर बाबांचा हाथ पडला. उठून उभा राहिलो, नकळत बाबांना घट्ट मिठी मारुन ओक्याबोक्शी रडत राहिले. बाबा मात्र शांत होते. मी शांत झाल्यावर बाबा म्हणाले, “अजय स्वतःला ओकटा कधी समजू नकोस. ह्या घराची दार तुझ्यासांठी सदैव उघडी आहेत. तुझी आई नेहमीच तुम्हा दोघांची वाट बघत असते. मला कळतय, “हे घर, सीमासाठी खूप लहान आहे ती आली तर आनंदच आहे, पण निदान तू तरी ये जा.

“हो बाबा, हो बाबा म्हणत मी पुन्हा बाबांच्या खांद्यावर डोके ठेवून माझे डोळे पुसले बाबांच्या त्या बोलण्याने खूप धीर आला होता. ह्या नंतर मात्र मी वारंवार घरी जा- ये करु लागलो. दारुला हातात धरली नाही. दारु सोडताना त्रास होत होता पण बहुतेक सुट्टया कोल्हापूरात घरीच असायचो. त्यामुळे ती सवय सुटली होती.

एव्हाना मी, आणि सीमा दोन दिशेला दोघे निघून गेलो होतो. तिने अभिनयामध्ये खूप यश मिळविलेल होत. ती खूपच प्रसिद्ध झाली होती. माझ्या आयुष्याला हरवलेला जुना रस्ता पुन्हा गवसला होता. बरेच वेळा मी कोल्हापुरातच असायचो. आईबाबा किंवा घरचे कोणीच मला माझ्या आयुष्यासंबधी एकही प्रश्न विचारत नव्हते. त्यामुळे मी नव्याने जीवन जगू लागलो होतो. केव्हातरी सीमासोबतचे नात तोडून टाकण्याची तीव्र ईच्छा होत असे. पण संस्कारी घरातून मोठा झालेल्या. मला “घटस्फोट” हा शब्द तितकासा पटत नव्हता.
शिवाय इतक्या वर्षांमध्ये मी माझ्या आणि ती तिच्या life style मध्ये adjust झालेलेच होतो. कागदोपत्री असलेले नात रोजच्या जीवनात कुठेही अडचण होत नव्हते. त्यामुळे “घटस्फोट” हा शब्द मी डोक्यातून काढून टाकलेला होता. झाला इतका नशिबाच खेळ स्विकारून मी पुढे चालण्यास सुरुवात केली होती.

दोन वर्षे सगळे सुरळीत चालले होते. पुणे-नोकरी – कोल्हापूर असे चक्र व्यवस्थित set झाले. अक दिवशी आई आजारी पडली. तिचा ताप जाईचना. हळूहळू ती अशक्त होऊ लागली. ताई, वहिनी तिला डॉ. कडे घेऊन जात होत्या. डॉ. नी पुढची तपास चक्र पूर्ण केली आणि आईला कॅन्सर झाल्याचे निदान केले. त्या रात्री आम्ही सगळेच खूप अस्वस्थ झालो होतो. नशिबाने नविन डाव समोर मांडला होता. फक्त ह्या वेळेस मी ओकटा नव्हतो इतकेच. बाबा तर रिटायर्ड झालेले होते. दादा घर चालवत होता त्याला ओकट्याला इतका मोठा खर्च झेपाणारा नव्हता. माझी परिस्थिती चांगली होती. न बोलता आईच्या ह्या वाईट मुलाने तो खर्च उचलला. तसे पाहिले तर आईच्या दुखण्यात आम्ही प्रत्येकानेच आपली जवाबदारी समजून काम वाटून घेतल्यासारखी काम करायला सुरुवात केली होती. मी आठवडाभर पुण्यात असायचो शुक्रवारी रात्री मात्र आईजवळ. सोमवारी सकाळी परत पुणे हा माझा उपक्रम झाला होता. ते तीन दिवस मात्र मी दादाला पूर्ण सुट्टी देत होतो. मला आठवतयं त्या प्रमाणे मी कोल्हापूरला असताना अकदा पेठे काका आणि काकू आईजवळ दोन दिवस येऊन राहिले होते. त्यावेळेस ह्या पुष्पाचा ओझरता विषय निघाला होता.

दुखण्यामध्ये आईला सीमाला भेटण्याची खूप ईच्छा होती. केवळ आणि केवळ आईसाठी मी सीमाला तसा फोन केला आणि “अकदा तरी ये” अशी कळवळीची विनंती केली. “प्रयत्न करते वेळ मिळाला की येते.” असे छानसे उत्तर तिने दिले परंतू तिला काही वेळ मिळाला नाही. काही महिन्यानंतर आई हे जग सोडून गेली. आमच्या त्या दिवसात तरी निव्वळ माणुसकी म्हणून तरी तिने भेटायला याव अशी माझी अपेक्षा होती परंतू तसे काही घडल नाही. एव्हाना ती प्रसिद्ध सिने अभिनेत्री झाली होती. काही ठिकाणी राजकारणात ही तिच्या नावांचा उल्लेख होऊ लागला होता. अफाट पैसा तिने कमावला होता. त्या पैशामुळे मित्रावळ ही तिच्याजवळ खूप जमा झालेली होती. ती खूप पिऊ लागल्याचेही ऐकीवात आले होते. ह्या सगळ्यातून तिला वेळ मिळणार नाही हे मला माहित असूनही तिच्याकडून काही अपेक्षा करणे ही माझी चूकच होती.

आई पाठोपाठ सहा महिन्यात बाबा पण अचानकच गेले… आणि ये रे माझ्या मागल्या… तसा मी पुन्हा ओकटा झालो. आयुष्याने पुन्हा कलाटणी घेतली. अकटेपणा मी सहन करु शकलो नाही. व्यसन खूप वाईट असत हे माहिती असूनही मी पुन्हा व्यसनी झालो. संध्याकाळी कामावरुन आलो की नित्यनियमाने दोन पेग घेऊ लागलो. दादाने घरी बोलावले तरी कोल्हापूरला जाणे टाळू लागलो. रोज सकाळी उठलो की ठरवायचो आज नाही ध्यायची, पण नाही… स्वत:ला थांबवू शकत नव्हतो…

ओका रात्री असाच थोडासा नशेत असताना सीमाच्या सेक्रेटरीचा फोन आला, “सर सीमा मॅडमने गळफास लावून आत्महत्या केली आहे.” क्षणार्धात सगळी नशा उतरली माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. अत्यंत अस्वस्थ झालो. तसा तिचा आणि माझा कित्येक वर्षात तोंडदेखला देखील संबंध राहिलेला नव्हता. द्विधा मनस्थितीत हॉलच्या सोफ्यात येवून बसलो होतो काय करावे? तिच्या घरी जाऊ की नको? शेवटी विचार केला की मी घटस्फोट तर घेतलेला नाही. कागदोपत्री तर मी तिचा नवरा होतो. न रहावून तिच्या घरी पोहचलो, भरपूर गर्दीमध्ये दूरवर मी एकटाच उभा होतो. स भरपूर महत्वाकांक्षी आणि जिद्दी स्वभावाची सीमा आत्महत्या करते हे माझ मन मानायला तयार नव्हत. कोणाला विचारावे ह्या विचाराने पुढे सरकलो तोच खिशातला फोन वाजला. दादा बोलू लागला, “अजय तिथे अजिबात जाऊ नकोस. ह्या प्रकरणापासून दूर रहा. कुठल्याही भानगडीत अडकू नकोस.

“हो दादा नक्की मी दूर राहीन. पण मी already तिच्या इथे पोहचलो आहे आणि गर्दीत दूरवर उभा आहे.” इतके म्हणून मी फोन ठेवून दिला आणि कोणाला तरी विचारुया हा मनातला विचार दूरवर फेकून दिला.

माझ्या पाठीला पाठ लावून तिची काही मित्रावळ उभी होती. त्यातल्या काहींना मी ओळखत होतो सुदैवाने त्यांनी मला ओळखले नव्हते. ते आपआपसात बोलत होते त्यावरुन सीमाची कोणा ओका रईस राजकरण्यासोबत गेली काही वर्षापासून मैत्री होती. त्याने तिला राजकारणात सन्मानीय स्थान मिळवून देण्याची लालूच दाखविली होती. तिच्यासोबत प्रेमाचे नाटक ही चालू ठेवून तिचा पैसा लुटुन घेतला होता आणि तिचे शरीर ओरबडून घेतले होते. ती कंगाल झाली होती. विद्रूप झाली होती. हे जसे तिच्या लक्षात आले तसे तिने त्याच्याकडे तिचे पैसे परत मागायला सुरुवात केली होती. आत्महत्येच्या आधल्या रात्री “तिचे आणि त्या” माणसाचे खूप मोठे भांडण झाले होते म्हणे. तो माणूस पहाटेसच तिच्या घरुन गेला होता असेही लोक म्हणत होती आणि दूपारी ही अशी पंख्याला लटकलेली मिळाली होती. त्यामूळे तिची आत्महत्या ही संशयास्पदच होती. मुख्य म्हणजे त्या रईस राजकारणी माणसाच्या नावाचा उल्लेख मात्र कोणी करायला धजत नव्हते. हा सगळा प्रकार ऐकून आणि पाहून जिवाला अतीव वेदना होत होत्या. परमेश्वराने तिला सगळे भरपूर दिले होते. पैसा रुप कला कुटूंब, कसलीही उणीव त्याने ठेवली नव्हती परंतू अतिमहत्वाकांक्षी सीमाने स्वतःच्या हाताने स्वत: सगळे घालवले होते. इतकेच नाहीतर भरपूर मित्रांचा आणि नातेवाईकांना गोतावळा असलेल्या सीमाला अग्नि देण्यासाठीही कोणी पुढे येईना. तिला बेवारशी म्हणून कुठलातरी तिथला कर्मचारी अग्नि देईल हे माझ्याकडून पहावले गले नाही. शेवटी मी पुढे गेलो. फक्त एका कागदोपत्री नवऱ्याचे नाते असलेल्या मी, केवळ माणुसकीच्या नात्याने माझ्या बेईमान पत्नीचा अंतिमविधी उरकून घरी परतलो होतो.

घरी पोहचलो तर ताई आणी भाऊजी घरी पोहचलेल होते. काही वेळानंतर दादा आणि वहीनीही येऊन घडकले. माझी अवस्था पाहून दोन दिवस माझ्यासोबत राहून ताई, भाऊजी आणि वहिनी घरी परतले. घरी मुल ओकटीच होती. दादा मात्र आठवडाभर माझ्या सोबत राहिला व पुन्हा मला घरी घेवून गेला. मी दोन महिन्याची “Sick leave” घेतली होती. घरी दादा – वहिनीनी मला ओकटयाला अजिबात सोडले नाही. मला आईबाबांची उणीव अजिबात भासून दिली नव्हती मी पुढे आणखीन दोन महिने सुट्टी वाढवली आणि जवळ जवळ चार महिने त्यांच्याजवळ राहिलो होतो.

ह्या काळात पुन्हा ओकदा स्वतःला दारूमधून सोडवून घेतले. कारण दारूच्या आहारी गेलेल्या सीमाची झालेली दयनीय परिस्थितीचे उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होते. दारू सोडली खरी, पण तो पर्यंत दारूने माझे करायचे ते नुकसान करुन ठेवले होते. माझी लिव्हर काहीशा प्रमाणात दुर्बळ झाली. पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे झाले होते. काही महिन्यातच नोकरी सोडून दिली. रंगभूमीवरील काही कलाकारांसोबत मैत्री होती. विरंगुळा म्हणून त्यांच्या ओळखीने दूरदर्शनच्या मालिकांमध्ये छोटया-मोठया भूमिका स्विकारायला सुरुवात केली. माझे पथ्यपाणी सांभाळण्यासाठी दादा-वहिनी ताई आळीपाळीने माझ्याजवळ येवून राहू लागले. सदा तर असायचाच. स्वयंपाकवाल्या मावशींना वहिनीने सगळे शिकवून ठेवले होते. मी स्वत:ला खूप सावरले होते. दिवसातून २-३ तास शूटिंग करुन घरी येत होतो. थोडासा विरंगुळा ही होत असे. नशिबाने पुन्हा नवीन वळण घेतले. माझ्या भूमिका रसिकांना आवडत गेल्या आणि लवकरच माझी अभिनेता म्हणून नविन ओळख जगासमोर आली. कामाचा व्याप वाढू लागला पथ्यपाण्याकडे थोडे दूर्लक्ष होऊ लागले. अशक्त होऊ लागलो. आणि अलिकडेच नेमकी काविळ झाली. तब्येत खूपच खालावली होती दारू पिणे पूर्णपणे सोडून दिले होते. तरीही लोक मला बहुतेक दारुडाच समजत असावेत म्हणूनच त्या शेंबडया पुष्पाने, “दारु पिऊ नकोस” असा जोरात दम भरला असावा. पुष्पाच्या बोलण्याचा विचार करत होतो.

बाजूच्या भिंतीवर असलेल्या आई-बाबांच्या फोटोकडे पाहून गालातल्या गालात हसलो. आईची खूप आठवण आली. सीमासोबत मी लग्न करु नये असे तिने मला सोंगण्याचा खूप प्रयत्न केला होता. “अजय ती मोठया घरातली मुलगी आहे. तिच्यापासून थोडा दूरच रहा. तिला आपल घर, कदाचित उद्या, तु सुद्धा तिच्यापेक्षा लहान, गरीब वाटू लागशील. ह्या वयात चारचौघात व्यसन करणाऱ्या मुली संसार करु शकत नाहीत. त्यांच्याबरोबर आयुष्य निघत नाही. आपल्या सारख्या परिस्थितीमध्ये, संस्कारात वाढलेल्या तुला आवडणाऱ्या कुठल्याही मुलीसोबत तू लग्न कर. मी आणि बाबा तुझ्यामध्ये अजिबात येणार नाही. पण हा नाकापेक्षा मोठा मोती आपल्या नाकाला घेऊन गळून पडेल रे.” ती कळवळीने सांगायची पण नाही. मी नाही औकले. हसण्यावरी नेले आणि स्वतःच्या आयुष्याच हसू करून घेतले, धुळधाण करुन घेतली आणि ज्या वयात पत्नी-मुलांसोबत असणे गरजेचे असते त्या वयात ओकटा पडलो आहे. त्याची खोलवर जाणीव झाली. नकळत डोळे भरुन आले.

दावारची बेल वाजली. दूधवाल्याची वेळ होती. सदाने दार उघडले. “दादा दूधवाला नाही आला, ताई आणि भाऊजी आले आहेत.” ऐकून मी खूष झालो. आज तरी ओकटा राहणारी नाही ह्याचा आनंद झाला. पाठोपाठ दादा-वहिनी मूले सगळीजण आली माझ्या आनंदाला पार नव्हता राहिला. त्यांच्या पाठोपाठ पुष्पा ….. हातात ओक छोटीशी बॅग घेऊन…. तिच्या बॅगेचा पट्टा तिच्या चपलेत अडकला. ती अडखळली. वहिनीने तिला हात देऊन घरात आणले…. मी पहातच राहिलो. दादाने हसून मान हलविली…. पुष्पा केवढी वेगळी दिसायला लागली होती क्षणभर नकळत माझी नजर तिच्यावर स्थिरावली.

“अजय, ही पुष्पा आता शेंबडी नाही राहिली हं.” ताई म्हणाली.

“खरच ग बाई केवढी बदलली आहे. म्हणूनच पहातोय.”

‘आता पहातच रहा हं भाऊजी” असे म्हणून वहिनी हसली. मी दादाकडे पाहू लागलो. पुष्पा मात्र लाजली….. आणखीत एक….. नविन वळण.

-सौ. वैजयंती गुप्ते
गांधीनगर – गुजरात

1 Comment on आणखीन एक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..