नवीन लेखन...

आपण आणि आपले जगणे

या सृष्टीच्या व्युत्पत्तीपासून विश्वाच्या निर्मितीचे गूढ उलगडताना मानवाचे स्वत:च्या लौकिक..परमार्थिक प्रगतीसोबत या अवकाशगंगेतील तमाम घटकांचे अस्तित्व उजळून टाकण्यासाठी सातत्याने संशोधन चालू आहे. आदिम काळापासून माणसाचे स्वत:च्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी मार्ग शोधणे चालू होते. आणि जसजसे ते मार्ग सापडत गेले तसतसे माणसाच्या जगण्याला नवनवीन कंगोरे प्राप्त होत गेले. आता त्याचे केवळ अन्न..वस्त्र..निवारा या सीमित फलप्राप्तीत समाधान होईनासे झाले..तसेच माणूस म्हणून त्याच्याजवळ असणाऱ्या माणसाच्या ओळखीचा आत्मा त्याला नवीन दिशांच्या शोधाला घेवून जाऊ लागला..यातूनच माणसाच्या मनाच्या आणि त्याच्या खुशालीच्या चोरकप्प्यातल्या गुप्तधनाचा मागोवा घ्यायची सुरुवात झाली.यासाठी आदिमानवापासून आजपर्यंत त्या त्या काळात ..त्या त्या वर्तमानाला साजेश्या ..त्या त्या गरजांच्या पूर्ततेसाठी अश्वमेधाचे अश्व दिग्विजयासाठी बाहेर पडल्याचे आपणाला आढळतील.या मोहिमेचे सूत्रधार त्या त्या काळातील सरंजामशाही करीत आली आहे.त्या मोहिमेच्या यशासाठी या सूत्रधारांनी अनेक मोहऱ्यांचा खुलेआम.. मनसोक्त आणि शास्त्रोक्त आधारावर वापर करून घेतला..सध्याही घेत आहेत.आतापर्यंत प्रत्येक्त संवत्सरात माणसाच्या दोनच जाती प्राधान्याने आढळून येतात..शोषण करणारा आणि शोषित.प्रत्येक पिढीत हा शोषित वर्ग जिवंत राहावा म्हणून मोठ्या हुशारीने त्यांच्या संवर्धनाच्या आणि उद्धाराच्या सुरस प्रथांना जन्म देण्यात आला.आणि त्यास नैतिक अधिष्ठान प्राप्त व्हावे म्हणून मानदंडाच्या पोथ्या_पुराणांचे लिखाण झाले.आणि हे लिखाण थेट ईश्वराच्या मुखातील प्रसाद असल्याचे ठसवून शोषितांना त्यांच्या पदरात पडत असणाऱ्या करंट्या भाग्यास शुचिर्भूत करण्यात आले..येत आहे.

या सगळ्या कुटील समाजव्यवस्थेस चिरंजीवित्व मिळावे म्हणून नवीन व्याख्या नि त्यांचे अर्थ जन्माला घालण्यात आले.वास्तविक परमेश्वराने निर्मिलेल्या सृष्टीस कसलाच भेदभाव ..कसलीच नावाची लेबले आणि नामांकन असण्याचा सवालच उद्भभवत नाही.माणसाकडून इथल्या प्रत्येक घटकाला पुन्हा ओळखू यावे म्हणून विशिष्ट नावे दिली गेली आणि ते तसे सोपे व्हावे म्हणून त्या सगळ्यांना विशेषनामे देण्यात आली.सगळ्या घटकांना त्यांच्याजवळ असणाऱ्या वेगवेगळ्या वैशिष्ठांचे नामांकन करून वर्गवारी करण्यात आले.सृष्टीतील घटकांसोबत माणसांचीही वर्गवारी करण्यात आली.

आता माणूस म्हटले कि त्याच्याजवळ असणाऱ्या नैसर्गिक गोष्टीना खरे तर एका समान धाग्यात गुंफायला हवे होते.पण तसे न होता त्यांच्यातील नैसर्गिक गुण_अवगुण यांची सुद्धा वर्गवारी करून विषमतेची बीजे पेरण्यात आली.आता या गुण आणि अवगुणांनासुद्धा कुठल्या रांगेत कुणी उभे राहायचे ते ठरवायचे ..एका मक्तेदारी लाभलेल्या ठराविक वर्गाने.हा वर्ग प्रत्येक इतिहासाच्या पानावर शास्त्यांच्या भाटगिरीत रमलेला पाहायला मिळतो..या वर्गाने आपले बस्तान बसविण्यासाठी सगळ्या शास्त्र वचनात सोयीच्या पळवाटा ठेवल्या आहेत.प्रत्येक बदलत्या शतकात त्यांची वरगामी नवे बदलत गेली असली तरी मूळ आत्मा
ठराविक मार्तंडाचाच राहिला आहे.मानवी स्थित्यंतरात फक्त त्यांच्या बाह्यरूपात फरक पडला आहे इतकच..परमेश्वराने निर्मिलेल्या सृष्टीत सारं काही योजनाबद्ध असणार हे आपण कबूल करायला तयार होत नाही.प्रत्यक्ष त्याच्या कारभारात हस्तक्षेप करून आपण त्यालाही वेठीस धरण्यास मागेपुढे पहिले नाही..आणि पहात नाही.त्यालाही धर्म..जाती_पातीच्या शृंखलामध्ये बांधून त्यांच्यातही माणसाप्रमाणे स्पृश्य_अस्पृश्य भेदाभेद करून ठेवली आहे.जसे या ईश्वरनिर्मित सृष्टीत कुठलाही घटक मग तो प्राणी असू दे,पक्षी असू दे,वनस्पती असू दे वा इतर निर्जीव गह्तक असू दे..त्यांच्यात उच्च_नीच असा फरक करता येत नाही.प्रत्येक घटक थेट ईश्वराचा अंश असल्याने त्यांच्यात तसा तो करणे म्हणजे थेट ईश्वराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासारखे आहे.पण आपण भस्मासुराचे वंशज बनून त्यातही कमी पडत नाही.प्रत्येक घटक त्यात माणूसही आला हा आपल्याजागी अजोड..अतुल..अगाध ..अपार..अनंत आहे.आपण माणसांनी काही मुठभर लोकांच्या स्वार्थासाठी सगळ्या लोकांना पवित्र..अपवित्र, सुंदर…कुरूप, गोड…कडू, आवडता… नावडता, पुण्य…पाप, नीती…अनीती, सदाचार….दुराचार, सज्जन..दुर्जन, आप्त..परका, सोवळा..पारोसा अशा मानदंडाच्या मोजपट्ट्या लावून बाटवून टाकले आहे.

तसं पाहिलं तर ईश्वराने इतक्या खुबीने हा सगळा डाव मांडला आहे कि प्रत्येक घटना ..घटक यांच्यातील संबंध आणि व्यवहार एकमेकावर अवलंबित ठेवले आहेत..मग तो लहान घटक असो वा मोठा ..या सगळ्यांच्यात काही न काही अपूर्णता ठेवली आहे.प्रत्येकाजवळ असणारी खासियत निव्वळ unique आहे.पण तिचा पदर इतर घटकांशी बांधला असल्याने इतराशिवाय ती खासियात मूर्त रूप घेऊ शकत नाही.ढिम्म काळोख असल्याशिवाय चौदहवीका चांद काळवंडून जाईल ..जमिनीत खोलवर मुळे गेल्यावरच झाडा ला आकाशाला वेसन घालता येते..ग्रीष्माच्या उन्हाळ्यातच चालल्यावर सावलीची महती कळते..एक श्वास सोडल्याशिवाय दुसरा श्वास घेता येत नाही..भरभक्कम पूल बांधताना मोठ्या शिळांची मजबुती प्रकट होण्यासाठी बारीक वाळू_रेतींना हाताशी घ्यावेच लागते..असे प्रत्येक व्यवहार विधात्याने गुंतागुंतीचे केले आहेत.श्रीमंतांची श्रीमंती गरिबीच्या अस्तित्वावाचून उभीच राहू शकत नाही..पण आपलं काय होतं आपण आपल्या वागण्याला..व्यवहाराला आपल्याला साजेच्या संज्ञा देऊन खोटे मोठेपण जपत असतो..त्याला आतल्या आत माहित असते कि हा दिमाख सगळा खोटा आहे..पण त्याच्यावर झालेल्या संस्कारामुळे तो त्याला गोड मानून आपला अहंभाव जपण्याचे चोख काम करीत असतो.आपल्या निर्भेळ जगण्यासाठी आपळ्या आयुष्यातील मैला कुणीतरी दुसरा वहात असतो याची आपण दखल घेत नाही..केवळ ईश्वराने त्यांच्या माथी ते काम टाकल्यामुळेच आपण रोजचा मोकळा श्वास घेऊ शकतो याबद्दल न आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मोठेपणा दाखवितो न त्याबद्दल ईश्वराप्रती लीन होत नाही..आपण आपल्या मस्तीत जगत असतो..नि आपली सावली आपल्या प्रतिमेहून मोठ्ठी दिसण्याचा बालहट्ट करून त्यासाठी कजागपणे आकडतांडव करीत राहतो..

या सगळ्या प्रवासात आपले हितसंबंध जपण्यासाठी नवनवीन शब्दकोश तयार करून त्याच्या आगळ्या वेगळ्या व्याख्या केल्या जातात..त्या व्याख्या लवचिक असतात..वर फिरेल तश्या त्यांच्या अर्थाचे शिडे बदलत असते..भावार्थ ..मतितार्थ ..सार्थ सारे सारे बदलत असतात..त्याहुकुम आपल्याला मान झुकवावी लागते..आणि आपण त्यासाठी पुरते संमोहित झालेलो असल्याने गुमान दिसेल त्या..दाखवतील त्या दगडावर डोके ठेऊन मोकळे होऊन स्वत:च्या जगण्याचा मोक्ष शोधत असतो..आणि जास्तीत जास्त माझ्या पदरात कसा पडेल यासाठी माणुसकीचे ..नैसर्गिक न्यायाचे साऱ्या आचारसंहिता बासनात गुंडाळून ठेवतो..अशा प्रकारे नागविले जाणाऱ्याना जर संकोच वाटत नसेल तर पुढचा सगळा मामला पटकथा लिह्ल्याबरोबर निर्विरोध पार पडतो..

इथल्या जगण्याच्या शब्दांना सुख_दु:खाच्या सुरावटीची सुरेल..सुरेख किनार देऊन माणसांच्या आयुष्याच्या कविता सादर होत असतात..आता माणूस म्हटला कि त्याच्यामध्ये देश..धर्म..प्रांत..गाव..वंश..रंग या सगळ्या निकषावर ज्याची त्याची सुख_दु:खे बेतली जावयास नकोत.सुख आणि दु:ख यांना खरतर कुठलच परिमाण असतात कामा नये..सुख म्हणजे सुख आणि दु:ख म्हणजे दु:ख ..परंतु आपल्या समाजव्यवस्थेत परंपरा अशी आहे कि त्यांना सुद्धा गरीब_श्रीमंतीच्या कॅनव्हास वर तपासले जाते नि त्यांचे मानांकन ठरविले जाते.या सुख_दु:खाना मग मागच्या फळीवर बसवून त्याच्या नावाने आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन हे पहिल्या रांगेत होत असते..
अशाप्रकारे मूळ गाभा भरकटला जावून वरवरच्या दिखाऊपणाला राजमान्यता ..लोकमान्यता मिळाली असल्याने माणूस आयुष्यभर अतृप्त राहतो..आणि जेव्हा संध्याछाया खुणावू लागतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो..आपण जगण्यासाठी आणि ते लोकांच्या पुढ्यात मांडण्यासाठी ज्या ज्या कसरती केल्या त्या साऱ्या फेर धरून आपल्या भोवती नाचू लागतात ..पश्चातापाचीही वेळ निघून गेली असल्याने आपल्याहाती काहीही उरत नाही..फक्त पराभूत चेहरा आणि उध्वस्त आत्मा आपल्या सोबतीला रहातो..

ज्या ईश्वराने मोठ्या विश्वासाने आपल्याला हा मनुष्य जन्म देऊन पाठविले त्याच्याकडे परत जाताना चेहरा लपवावा वाटतो..आयुष्यभर आपल्या आयुष्यातील उणीवा शोधताना आपण आपला अमुल्य वेळ नाहक खर्ची टाकत आहोत याचे आपल्याला भान नसते..ईश्वराने भरभरून दिलेल्या पसायदानाचा उपभोग न घेता आपण आपले करंटेपण इतरांच्या अंगणातील दिवे मोजण्यात घालवीत असतो..हे सगळे आपण का करतो ..तर आपण आपले आयुष्य तथाकथित प्रेषितांच्या मोजपट्ट्यानि मोजून आपली उंची जोखत असतो..आपणाला आयुष्याला सकारात्मक दृष्टीकोन नेहमी हवा असा आदेश असल्याने आपण आयुष्यात होकारा इतकच नकारानांही स्थान आहे हे लक्षात घेत नाही..आपण आपल्यातील ईश्वरी अंशाला एकदा का मनापासून स्वीकारले कि पुन्हा पुन्हा त्याचे स्मरण करावे लागणार नाही..नि आपण त्या ईश्वरी अंशाचे पाईक असल्याने आपण आपल्या जवळ असणाऱ्या छोट्या कवचकुंडलाप्रती स्वत:ला अभागी समजून शरमिंदे वाटणार नाही..बस इतकेच जमले कि आपल्या आयुष्याच्या साफल्याबद्दल आपल्या मनात सांशकता येणार नाही..आणि ज्या खेळाचा शेवट गोडच आहे याची खात्री असल्यावर मधल्या आदल्या डावात पदरी येणाऱ्या पराभवाचे शल्य आपल्या ओसरीवरही क्षणभर विसावा मागणार नाही.
जगण्यातला आनंद हे आपल्या आयुष्याच्या वाटचालीचे निरुपण असले पाहिजे..आणि त्यासाठी आयुष्यात अवलंबिलेले मार्ग ..निखळ हवेत..केवळ आनंदाचे उद्दिष्ट्य अनैसर्गिक डावपेच आखून कधीच सिद्ध होणार नाहीत याची जाणीव सदैव आपल्या श्वासाशी निगडीत ठेवण्याची दक्षता आपण घ्यायला हवी.

आपण आतापर्यंत केलेल्या वाटचालीबद्दल समाधानी असायला हवे. आपल्या आयुष्यावर आपले नितांत प्रेम असायला हवे..एकदा का आपण आपल्यावर प्रेम करायला शिकलो कि मग आपण आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपण काय करू शकतो याला कुठलीच सीमा बंधन होऊ शकत नाही .आणि आपल्या प्रिय व्यक्तीला कमीपणा येईल असे वर्तनही आपल्या हातून कदापिही होणार नाही याबद्दल आपण विशेष जागरुकता दाखवू.आपल्या आयुष्यातील कमाई ..कमाई म्हणून जी काही आपल्याला अप्रूप वाटते ती नक्की काय असते याबद्दल आपण कधीच विचार करीत नाही..त्यामुळे आपण आपले आपले म्हणून आयुष्य कधीच जगत नाही..आपण आपली सुख_दु:खे नेहमी समोरच्या माणसाच्या सुख_दु:खाशी जोडीत असतो.वास्तविक सुख_दु:खे अशी हवीत कि त्याला जोड नकोच.आपले कुठं संपले नि समोरच्याचे कुठे सुरु झाले याचा ठाव कुणालाच लागता कामा नये.आपल्या आयुष्याची कमाई अशी असायला हवी..कि कधीही ..अकस्मात आपल्याला statue म्हणण्यात आलं तरी आपल्याला तिथपर्यंतच्या कमाईबद्दल समाधान ..तृप्ती वाटून संपणाऱ्या डावाबद्दल आसक्ती उरता कामा नये.

— रजनीकान्त

Avatar
About रजनीकान्त महादेव शेंबडे 11 Articles
रजनीकान्त महादेव शेंबडे..वास्तव्य कराड…अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून महावितरण इस्लाम्पूर विभागीय कार्यालयात कार्यरत.. लेखन कविता…ललित…स्फुट ..
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..