पहाटेचं मंगल वातावरण. पूर्व क्षितीजावर प्रभेची कोवळी किरणं पसरू लागलेली. डोंगरदऱ्यांत पसरलेल्या वृक्षराजींवरील पानांमध्ये चिवचिवाट सुरू झालेली. त्यांच्या चिवचिवाटानं वातावरणात मंगल ध्वनी पसरत होते. त्यांच्या लहरी थेट अंतर्मनाला साद घालणाऱ्या. हवेच्या मंद लहरींवर पाण्यांत तरंग उठावे आणि पुढे जाऊन ते पाण्यातच विलीन व्हावे तसे मनात निर्माण होणाऱ्या विचारांच्या अनेकानेक लहरी या मंगलप्रभेच्या भारलेल्या वातावरणात समाधीवस्थेकडे जाऊन स्थिरावत होत्या. मन शांत आणि प्रसन्नतेच्या लहरींवर स्वार होऊन वेगळ्याच पण हव्याहव्याशा अनुभूतीकडे झेपावत होतं. मन जसं झेपावू लागलं तस-तसं ते अधिक शांत होऊ लागलं. मंगल होऊ लागलं, पवित्र होऊ लागलं, समाधिस्त होऊ लागलं. इतक्या वेळात पूर्व क्षितीजावर तेजोनिधीचं आगमन झालेलं होतं. तेजोनिधीच्या कोवळ्या किरणांनी निजलेल्या वृक्षवेलींना हळूवारपणे स्पर्श करून चराचरातील चैतन्यत्वाचा आभास करून दिला. मग त्या वृक्षवेलींनी देखील थोडसं अग झिडकारून स्वत:मधील चैतन्यत्वाची जाणीव करून दिली.
सृष्टीचा हा चैतन्य सोहळा सुरू असतानाही मन मात्र आतमध्ये कुठेतरी उतरत चाललं होतं. खोल खोल जात असताना अनेक आभास आणि अनुभव त्याला येऊ लागले होते. मध्येच कुठल्यातरी आकृत्या त्याच्या समोर साकारत होत्या. मध्येच मनपटलावर काही तरी तयार व्हायचे आणि पुढच्या क्षणी विलीन देखील व्हायचे. ते कशातून निर्माण व्हायचे आणि कशात विलीन व्हायचे हे मात्र सांगता येत नव्हतं. कुठेतरी अंतरात आकृतीचा जन्म होत होता. मधुनच संगीताची नादमधुरता कानी येऊ लागलेली. समाधीवस्थेकडे जात असतानाच ‘मी कोण’ ही जाणीव तिव्र झाली अन क्षणार्धात मन ‘मी’च्या शोधार्थ जाऊ लागलं. थोडसच चालून झालं असेल म्हणा. पुन्हा प्रश्न निर्माण झाला चराचरातील चैतन्य तत्व कोणती. माझ्यातील चैतन्य तत्व कोणतं. मग उत्तर आलं पंचतत्व. पृथ्वी, हवा, पाणी, तेज, अग्नी ही तत्व मिळून आपण सारे निर्माण झालो. तयार झालेला. प्रत्येकामध्ये ही पंचतत्व आहेतच आणि राहणार आहेतच ती काही केल्या नष्ट होत नाहीत. आपले अस्तित्व संपलं तरी पंचतत्वांची अस्तित्व कायम राहतात. कोणत्या ना कोणत्या रुपात ती राहतातच. या क्षणी आपण मानव असू तर पुढच्या क्षणी वृक्ष असू, कधी वृक्ष असू तर पुढच्या क्षणी पक्षी असू, कधी आकाश, तर कधी पाणी, कधी हवा असू तर कधी अग्नि असू… आपण नष्ट होणार नाहीय. आपण कायम राहणार आहे. ‘मी’ आहे असे न म्हणता ‘आपण’ आहोतच असे म्हणणे म्हणजे पंचतत्वाला समजून घेणं.
पंचतत्व. अग्नि, वायू, पाणी, पृथ्वी, तेज ही तत्व मिळून पंचतत्व तयार होतं. मानवी शरीर देखील याच तत्वांनी बनलेलं. शरीर याच पंचतत्वाच विलीन होऊन जातं. शरीर विलीन होतं म्हणजे ते कोणत्या ना कोणत्या रुपात पुन्हा मागे उरतं. कशात तरी समावून जातं. काही तरी बनून जातं. याचाच अर्थ असाच ना की आपण सारे एकमेकांपासुन तयार झालेलो आहोत. हे वृक्ष, वेली, फुलं, पशु-पक्षी, प्राणी, आकाश, प्रकाश ही सारी आपल्यापासून तयार झालेली, त्यांच्या पासुन आपण तयार झालेलो. आपल्यांतील काही अंश त्यांनी स्वीकारला, त्यांच्यातील काही अंश आपण स्वीकारला. दोघांनी एकमेकांना स्वीकारलं आणि पूर्णत्व प्राप्त झालं. मी पण मागे पडुन गेलं, आपण सारे एक झालो. आपण सारे एक झालो.
— दिनेश दीक्षित
Leave a Reply