नवीन लेखन...

आपली ती श्रद्धा आणि दुसऱ्यांचा तो दिखावा

पंचवीस वर्षापूर्वी आमच्या शेतावर एका चाळी वजा घरात फक्त चार खोल्या होत्या त्यापैकी एकात आमच्या बैलांचा गोठा होता, एका खोलीत सागाचे न कापलेले ओंडके आणि शेतीची अवजारे होती. तिसऱ्या खोलीत आमचा मोठा काका राहायचा आणि चौथ्या खोलीत होता गणपतीचा कारखाना. त्यावेळेला आमच्या शेतावर मोजकीच चार पाच घरं होती.

खरं म्हणजे त्या खोलीत आत गणपतीचा कारखाना होता म्हणण्यापेक्षा गणपतीचा मूर्तिकार तिथे गणपतीच्या सुबक आणि आकर्षक मूर्ती घडवायचा. त्याच्याकडे मूर्ती बनवायचे साचे किंवा मोल्ड होते ते आठवत नाही पण मूर्तीचे बरेचशे भाग जसे की सोंड, हात, मुकुट वगैरे तो स्वतः हाताने बनवायचा हे पाहिल्याचे स्पष्ट आठवते. त्यावेळेस आमच्या खोलीत फक्त शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवल्या जात होत्या. आकर्षक रंगसंगती आणि डोळ्यांची आखणी यामुळे आमच्या खोलीतील मुर्तीकाराने बनवलेल्या सगळ्याच लहान मोठ्या मूर्ती सजीव वाटायच्या. आमच्या आजूबाजूच्या आठ गावातील बरेचसे लोक आमच्या खोलीत असणाऱ्या मूर्तीकाराकडून मूर्ती नेत असत. पंचवीस वर्षांपूर्वी एका कुटुंबात एकच गणपती मांडला जात असे. त्यावेळेस गावात बऱ्याच कुटुंबात तीन चार किंवा इव्हन पाच सहा भाऊ असले तरी एकाच घरात एकत्र व गुण्यागोविंदाने राहत असत. घरांची रचना पण तशीच असायची मध्ये एक मोठा हॉल आणि त्याच्या सभोवती प्रत्येकाला खोल्या.

गावात तेव्हा मोजक्याच घरांमध्ये गणपती असायचे दीड दिवसाचे दहा पंधरा, पाच दिवसाचे तीस ते पस्तीस आणि दहा दिवसाचे दहा पंधरा गणपती. एकवीस दिवसांचे एखादं दुसरे.

पंचवीस वर्षांपूर्वी भाद्रपद महिन्यात जेवढे गणपतीचे घरोघरी असायचे त्याच्यापेक्षा जास्त गणपती हल्ली माघ महिन्यात असतात. भाद्रपद महिन्यात तर हल्ली गावात शेकडो गणपती मांडले जात आहेत. आमच्या खोलीत जो मूर्तिकार गणपती बनवायचा त्याची कला आणि वारसा त्याच्या स्वतःच्याच वारसांना सांभाळता आला नाही. शाडूच्या मूर्ती बनवणारा हा कलाकार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती यायला लागल्यापासून अधोगतीला जाऊ लागला होता. पी ओ पी च्या रेडिमेड मूर्ती आणून त्यांना रंगरंगोटी करणे त्याला जमेनासे झाले शेवटी तो एक निपुण कलाकार होता असं दुसऱ्यांच्या मूर्तीवर रंग फासून कमिशनच्या कमाईवर काम करणं त्याला पटलं नाही.

पंचवीस वर्षांपूर्वी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती सत्तर रुपयांपासून ते जास्तीत जास्त दोनशे रुपयांना विकल्या जात असत, आज तेवढ्याच आकारमानाच्या प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती तीन हजारापासून पाच हजारांपर्यंत आणि शाडू किंवा इको फ्रेंडली मूर्ती पाच हजाराहून जास्त किमतीत विकल्या जात आहेत. मूर्तीवर काचेचे मणी, बेंटेक्स चे दागदागिने काय आणि आता तर ईव्हन खर खुर रेशमी कापड सुध्दा मूर्तीवर लावले जात आहे.

मूर्ती लहान असो की मोठी असो महाग असो की स्वस्त असो घेणारा प्रत्येक जण श्रध्देने ती मूर्ती घरात स्थापन करतो. भक्तिभावाने आणि आत्मीयतेने कुटुंबासोबत गणपतीची आराधना आणि पूजा अर्चा करतो.

पूर्वी गावात गणपती कमी असल्याने प्रत्येकाच्या घरी जाऊन दर्शन घेतले जात असे. हल्ली सगळ्यांच्याच घरी गणपती असल्याने कोणी कोणाकडे व कधी जायचे अशी अवस्था होऊन जाते. त्यामुळे हल्ली प्रत्येकाकडून व्हॉटस् अप आणि फेसबुक वर गुड मॉर्निंग किंवा गुड नाईट जस केले जाते तसे घरगुती गणेश दर्शन सुध्दा ऑनलाईन केले जात आहे. आपल्या घरातल्या गणपतीचा फोटो मग तो आरती करताना, नैवद्य दाखवताना, हार घालताना जेवण वाढताना आणि नैवेद्याचे मोदक खाताना सगळ सेल्फी किंवा फोटो काढून अपलोड केले जाते. आपण आपला गणेशोत्सव अपलोड करायचा आणि दुसऱ्यांनी अपलोड केलेला बघायचा. कोणाकडे गणपती बघायला आमदार येतात तर कोणाकडे खासदार येतात अशी लोकं घरी आली की घरात आलेल्या गणपतीपेक्षा अशा लोकांच्या येण्याने जास्त आनंद आणि कोण कौतुक झालेले असतं. गावातले पुढारी आणि नेते यांच्या घरी गणेशोत्सव सुरू आहे की राजकीय खेळ सुरू आहे असे वाटावे अशी परिस्थिती असते. काही लोकं नेहमीप्रमाणे गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वतःच्या पक्षाची,पक्ष नेतृत्वाची आणि स्वतः ची फोटो सह स्वतः च बॅनरवर झळकून लाल करत असतात. पूर्वी कागद आणि पताका लावून दिवस रात्र जागून डेकोरेशन केले जायचे आता रेडिमेड मखर आणायचा आणि उभा करायचा. पर्यावरण रक्षण, इको फ्रेंडली, घरगुती, सार्वजनिक , नवसाला पावणारा आणि नवसाचा , अमुक एक गावचा राजा, इच्छापूर्ती अशा कितीतरी शब्दांमध्ये गणपती सह उत्सवसुध्दा हरवत चालला आहे. सुशिक्षित, अशिक्षित गोर गरीब आणि श्रीमंत सगळेच एकाच देवाची लेकरे आणि ह्या सगळ्या लेकरांचा देव पण एकच तरीपण त्याच्यात राजा, नवसाला पावणारा, एक फुटी आणि पंचवीस फुटी असा भेदभाव का आणि कशासाठी. सेल्फी काढणाऱ्या गणपतीची मूर्ती पाहिल्यानंतर गणपती सुध्दा काळानुरूप देवपण विसरला आहे की काय असं वाटायला लागले आहे.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E. (mech) DIM
कोन, भिवंडी, ठाणे

#Ganeshotsav
#गणेशोत्सव

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..