आपुलकी म्हणजे आत्मीयता , ओढ ,जवळीकता , प्रेम , आस्था की जी सर्व नात्यामध्ये असते. आणि या आपुलकीचे महत्व हे श्वासा इतकेच लाघवी आणि शाश्वत असून महत्वाचे असते.
आपुलकी , प्रेम ही विलक्षण सात्विक शांतीसुखदा आहे. तिथे मनःशांती आहे. विश्वास आहे. एक अनामिक , शाश्वत, आत्मिक अनाकलनिय अशी परस्पर ओढ आहे. की जी माणसाला निरपेक्ष जगवीत असते…हे एक सुंदर सत्य आहे. एक सुंदर मनस्पर्शी निर्मळ भावना आहे की ती आपल्या आत्म्याला सदैव स्पर्श करीत असते आणि ती आपुलकी भावनिक ऋणानुबंधी संवेदना सर्व नात्यामध्ये दिसून येते. तिथे निरागस , निस्वार्थी , निर्मळ प्रेम जाणवते. आणि अशा प्रेमामध्ये केवळ शब्दांपेक्षा भावनां अधिक श्रेष्ठ बलवान असते.
आपुलकीची माणसे जीवनात भेटणे हे महदभाग्य म्हणावे लागेल आणि ते लाभणे म्हणजे केवळ संचिती प्रारब्धयोग असतो
ही आस्था ,आपुलकी एकतर्फी असून चालत नाही तर ती दोन्ही बाजुंनी असणे अत्यन्त गरजेचे असते अन्यथा समोरून दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्या आपुलकीच्या भावनेकडे दुर्लक्ष झाले किंवा नकारात्मक जाणीव झाली तर त्यातून दुःख , मानसिक वेदना पदरात पडते. व्यक्ती आणि त्यामधील आपुलकी ,परस्पर प्रेमभावनां यांच्यात भावनिक प्रेमबंध आहे विलक्षण मानसिक ओढ आहे अदृष्य असे नाते आहे. सहवासातून आपले कुटुंब , नातेवाईक , शेजारीपाजारी , मित्रमैत्रिणी यांच्याबद्दल अगदी सहज नकळत ही आपुलकी निर्माण होते आणि या आपुलकीच्या नात्यातूनच परस्पर प्रेम , आस्था , ओढ मनात रुजते आणि त्यातून आपलेपणाची सुखद भावना अंतराला स्पर्श करते.
मग आपुलकीची भावना निर्माण झाल्यावर समाजात आपण एकत्र येतो आणि परस्पर प्रेमास्थेची भावनां जन्म घेते आणि भावनांचे निर्मळ प्रेमबंध अधिक घट्ट होत जातात आणि स्नेहार्दपुर्ण असे सुंदर नाते मनामनात निर्माण होते.
वैयक्तिक पातळीवर एखाद्याबद्दल आपुलकी व्यक्त करण्यासाठी आपलयाला त्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचावे लागते . त्याच्या सुखसंवेदना , त्याच्या आवडी निवडी , त्याच्या समस्या किंवा त्याच्या जीवनाबद्दलच्या भावनिक प्रतिक्रिया , अपेक्षा या आपलयाला जाणून घ्याव्या लागतात. त्यानंतरच आपल्या सकारात्मक निरीक्षणातून आपण त्या व्यक्तीबद्दल आपली आपुलकीची भावना प्रगल्भतेने व्यक्त करू शकतो.. आणि मग हे आपुलकीचे निर्मोही , निर्मळ नाते निर्माण होते.
आपुलकी , आस्था ही प्रेमस्नेह भावनां आहे. ती आपण नेहमीच सकारात्मक , विधायक , निष्काम भावनेने व्यक्त केली पाहिजे . ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला सहानुभूती , प्रेम आहे त्या व्यक्तीला आपल्याकडून या आपुलकीच्या भावनेचा जेंव्हा सकारात्मक , विश्वासपूर्ण असा प्रामाणिक अनुभव येईल तेंव्हा ती व्यक्ती तुमच्या या स्नेहार्द भावनेचा सुखानंदे स्वीकारच करेल आणि तुमच्यात एक विलक्षण ओढ असलेले निर्मळ नाते निर्माण होईल आणि भावनिक प्रेमसंबंध जोपासले जातील.
आपुलकीच्या आत्मीयतेतून परस्पर प्रेमळ सहवास , प्रेमळ प्रतिसाद , त्यासोबत सर्व काळात सदैव सुरक्षतेची भावना मनात जपली गेली पाहिजे. जीवन जगताना जेंव्हा आपुलकीची साथसंगत , सोबत असते तेंव्हा एक निश्चिन्तता असते. यासाठी परस्पर प्रेमसंबंध किंवा नात्यात निर्मलता असणे महत्त्वाचे असते. त्यातून अपेक्षित सुखशांती लाभते हा दृष्टांत आहे.
स्नेहार्द भावनां ही आपुलकीतील निर्मळ ,निरोगी नातेसंबंधाचा एक महत्वाचा भाग असतो. आणि त्याला अनेक कंगोरे आहेत आणि अनेक प्रकारे व्यक्त केला जावू शकतो.. मातृपितृत्व , वात्सल्य , प्रेमसंबंध , वैवाहिक संबंध याचे वर्णन अनेक शब्दात करता येईल . पण यातील वास्तवता प्रत्येक मन जाणते. या सर्वाठाई प्रेमभाव ,आपुलकी , परस्पर ओढ , आत्मीयता जाणवते.
हिंदू संस्कृती मध्ये आणि पाश्चात्य संस्कृती या मध्ये अशा भावनां व्यक्त करण्यामध्ये विविधता आहे. त्याबद्दल लिहिणे किंवा व्यक्त व्हावे लागेल . तो खूप मोठा विषय आहे त्याबद्दल पुन्हा स्वतंत्र लिहिता येईल.
आपुलकी स्नेह भावनां ही परस्पर प्रेमाची एक सुंदर भावनिक कोमलता आहे. जिथे सहृदयता प्रत्ययास येते. आणि मानवी जीवनात सहृदयतेला खूप महत्व असून ती सहृदयी आपुलकी म्हणजे सात्विक मनःशांतीचा महासागर आहे. मानसिक सुखाचा शाश्वत आधार आहे. आपुलकी व्यक्त करणे हे परस्पर नातेसंबंध दृढ ( मजबूत ) करण्यासाठी आणि एखाद्या व्यक्तीला त्यांचे किती मूल्य आणि कौतुकास्था आहे हे दर्शविण्यासाठी महत्वाचे आहे. त्या व्यक्तीच्या सर्वात नाजूक भावनिक अपेक्षा ज्या आहेत त्यांचा अत्यन्त आत्मीयतेने ,जवळीकतेने विचार करणे क्रमप्राप्त आहे , गरजेचे आहे. त्या अपेक्षित भावनांचा आदर करणे खूप महत्वाचे आहे तसेच भावनिक आणि मानसिक सुरक्षितताही तितकीच महत्वाची आहे .
कारण आपुलकी या शब्दातील निर्लेप प्रेमभावना मनाला स्पर्शून गेली पाहिजे. प्रत्येकाला जीवनामध्ये कर्तव्य करीत असताना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते ही आजची कलियुगी वास्तवता आपण कुणीच नाकारू शकत नाही. पण सर्वांती कुठल्याही नात्यामध्ये प्रेमाची नितांत गरज असते , निःस्वार्थी साथसंगतही प्रत्येकाला अपेक्षित असते. आपुलकी , प्रेम , सांत्वनी शब्द , मायेचा निरपेक्ष स्पर्श प्रत्येकाला अपेक्षित असतो.
आपुलकी ही अंतर्मनातून जन्माला आलेली भावनां भाग्यानेच लाभते हेही वास्तव आहे. तेंव्हा अशा स्नेहार्द आपुलकीच्या सहवासाचा आपण आदर करावा आणि प्रत्येकाच्या मनात आपल्या बद्दल आपुलकी निर्माण होईल असे आपले नैतिक सदवर्तन असावे. त्यामुळे मनःशांती लाभते.
इती लेखन सीमा
– वि.ग.सातपुते.( साहित्यिक )
संस्थापक अध्यक्ष:-
महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे
( पुणे ,मुंबई , ठाणे , मराठवाडा ) महाराष्ट्र )
Leave a Reply