नवीन लेखन...

आरसा (कथा)

सलून मधला प्रसंग आहे …..मी सलून मध्ये बसलो असताना बहुधा तिथेच आजूबाजूला राहणारा एक ५-७ वर्षांचा लहान मुलगा आत शिरला … मागोमाग त्याची आई आली आणि सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला आणि आपल्या मुलाला आळीपाळीने सूचना देऊ लागली .. .. “अहो , याचे केस कापून झाले न की त्याला फक्त बाजूच्या बिल्डींग च्या गेट पर्यंत सोडा … तिथून तो येईल आत मध्ये .. मग काही प्रोब्लेम नाही …. आणि तू नीट बस रे … मस्ती करू नको …. काकाचं ऐक … थांब पैसे पण देऊन ठेवते .. हे घ्या .. तुम्ही जरा तेवढं गेट पर्यंत नक्की सोडा हं प्लीज !!!!!” …. असं म्हणून पैसे वगैरे देऊन आणि जाता जाता काळजीपोटी पुन्हा त्याच सूचना देऊन ती आई निघून गेली …. हे सगळं चालू असताना मला समोरच्या “आरशात” त्या लहानग्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव दिसत होते ….. अल्लड , आनंदी … न कसली चिंता ना काळजी ….. “बालपणीचा काळ सुखाचा” ह्या वाक्याचं तो मुलगा प्रात्यक्षिकच देत होता ….. तो आरसा काही काळ मलाही माझ्या बालपणात घेऊन गेला … तेव्हाचे दिवस आठवले … खूप गंमत वाटली आणि “हसू” ही आलं….. थोड्याच वेळात माझं आटपलं आणि मी निघालो …….

काही महिने गेले …. अशाच एका सकाळी मी त्याच सलून मध्ये त्याच ठिकाणी बसलो होतो …. आज एक आजोबा आत शिरले …. बारीक अंगकाठी असलेले … वयोपरत्वे थोडे थकलेले वाटत होते …. बऱ्यापैकी अस्ताव्यस्त वाढलेली राठ दाढी … जुनासा शर्ट आणि गुडघ्यापर्यंत pant .. ( ते बहुतेक त्यांचे सलूनमध्ये जाण्याचे ठरलेले कपडे असावेत ) …. सोबत आजी सुद्धा होत्या …. आजी त्या सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला सांगू लागल्या …. “अरे राजा.. यांची दाढी कर आणि जरा यांना फक्त रस्ता क्रॉस करून दे रे ..!!! ( यावरून ते आजी आजोबा सलूनसमोरच्या कुठल्याश्या बिल्डींग मध्ये राहत होते हे लक्षात आलं ) …. “ मग पुढे येतील ते ” …. नंतर आजोबांना उद्देशून … “अहो पैसे द्याल का नीट नंतर , खिशात ठेवा …. नको नाहीतर ….देऊनच जाते मी !!! “ …. पुन्हा त्या माणसाला …. “किती रे … ४० कि ५० … हे घे …. ते क्रॉस करून दे बर का पण …. थोडा पाऊस पण पडून गेलाय ना आत्ताच “…. असं म्हणून निघता निघता दरवाजातून बाहेर पडताना पुन्हा एकदा आजोबांना म्हणाल्या …..” अहो मी येते … तो देईल तुम्हाला क्रॉस करून मग मात्र सावकाश या “ …… हा सगळा घटनाक्रम मला त्याच आरशात दिसत होता .. .. नंबर असल्याने आजोबा बाजूच्या खुर्चीत बसले … …. हा सगळा संवाद सुरु असताना त्या आजींची काळजी आणि अगतिक आजोबांकडे बघून नकळत माझे डोळे थोडे पाणावले …. आणि तेवढ्यात माझं मन त्या काही महिन्यांपूर्वीच्या आई मुलाच्या प्रसंगाकडे मला घेऊन गेलं …. या दोन प्रसंगांची थोडीशी तुलना होऊ लागली ….

आता समोरच्या आरशात दिसणारे …थरथरत्या हातात पेपर धरून वाचणारे ते आजोबा आणि माझ्या मनाच्या आरशात तो काही महिन्यांपूर्वीचा स्वच्छंदी , निरागस मुलगा …. चहूबाजूंनी वेगवेगळे विचार आदळू लागले …. अगदी खरं सांगायचं तर मला वाईट वाटावं किंवा दया यावी असं त्या आजी आजोबांनी काहीच केलं नव्हतं …… ते एकमेकांना अगदी सांभाळून घेत होते …. ज्या काळजीने आणि पोटतिडकीने आधीच्या प्रसंगातली “आई आपल्या मुलाला” सूचना करत होती अगदी तसंच इथे एक “पत्नी आपल्या पतीला” सांगत होती … मग असं का ?? ….. मला त्यांच्या जागी माझे हयात नसलेले आजी आजोबा दिसत होते का ??? ….नाहीतर मग मी त्यांच्या ठिकाणी भविष्यातल्या मला पाहत होतो का ?? ….. छे छे …. वार्धक्याचे वेध लागण्याचं काही माझं वय नाही …….. पण पहिल्या प्रसंगात माझं मन जर नकळतपणे ३०-३५ वर्ष मागे …बालपणात गेलं होतं … तसं यावेळेस ते ३०-३५ वर्ष पुढे गेलं होतं का ?? … आणि असेल तर मग त्यात गैर काय ??? ….. असे अनेक विचार माझ्या मनात येऊन गेले ….दोन्ही अतिशय एकसारखे प्रसंग असून एका वेळेस हसू तर दुसऱ्या बाबतीत आसू ?????…त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कदाचित त्यांना काही अडचणी असतील किंवा नसतील ही…. पण एक त्रयस्थ म्हणून या प्रसंगात मला वाईट का वाटावं ?? ……
असे सगळे वैचारिक खेळ खेळून झाल्यावर एक लक्षात आलं की एरव्ही आपण कितीही म्हणालो की “म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असतं” … वगैरे वगैरे …तरीही आपल्या समाजात , वागण्या-बोलण्यात .. “बालपणाला एक “सकारात्मकतेची झालर” असते आणि म्हातारपणाला “नकारात्मकतेची किनार” असतेच असते” …

कदाचित आपल्या दैनंदिन जीवनात आपण आजूबाजूला जे पाहतो , आपल्याला जे अनुभव येतात त्यावरून आपण वयस्कर मंडळीना “बिचारे” ठरवून मोकळे होतो … वयाच्या ८०-९० व्या वर्षी सुद्धा काही व्यक्ती तरुणांना लाजवतील इतक्या उत्साहात काम करतात , वावरतात अशीही काही उदाहरण आपल्या आजूबाजूला असतात पण त्याचं प्रमाण तुलनेने कमी आहे … त्यामुळे “लहानपण देगा देवा सगळेच म्हणतात पण म्हातारपण देगा देवा कोणीच म्हणत नाही . “….

हे ही खरं आहे की बऱ्याचश्या वयस्कर मंडळीना अनेक अडचणी असतात .. कधी शारीरिक , कौटुंबिक, आर्थिक , मानसिक आणि अनेक … पण आपणही त्यांच्या या अपरिहार्य असलेल्या नकारात्मकतेत भर घालून त्यांच्या अडचणी वाढवण्यापेक्षा त्यांना आपल्याकडच्या सकारात्मकतेची जोड दिली तर कदाचित त्यांचे आयुष्य सुसह्य होण्यास काही अंशी मदत होईल हे नक्की ….

एव्हाना समोरच्या आणि मनाच्या … दोन्ही आरशांवरचं विचारांचं बाष्प उडून गेलं होतं …. आता आरशात पाहिलं तर इतका वेळ “अगतिक” वाटणारे ते आजोबा मला प्रसन्न आणि इतरांसारखेच , आपल्या नंबराची वाट बघत पेपर वाचणारे … असे दिसू लागले ….. “आरसा तोच होता पण आता प्रतिबिंब स्पष्ट झालं होतं “ …. मी उठलो आणि आजवर कधीही न भेटलेल्या / पाहिलेल्या त्या आजोबांना जागा करून दिली … खुर्चीवरही आणि मनातही ….

© क्षितिज दाते.
ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 79 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..