चला !
सुप्रभात !
आज जाग तर आली.
जाग आली की जागं केलं गेलं ???
म्हणून तर एवढा आनंद झाला.
तब्बल आठ दहा तास मी माझ्यामधे एकरूप झालो होतो. जगाचा मला विसर पडला होता. पुनः या मायेच्या दुनियेत मला आणल्याबद्दल झालेला आनंद मी रोज व्यक्त करतोय.
नाहीतर झोप आणि मृत्यु यात तसा काही फरकच नसतो. झोप म्हणजे काही काळापुरती आलेली मृत्युचीच अनुभूती असते.
माझा न राहिलो मी….
अशी अवस्था जन्मापासून जन्मभर अनुभवत असतो. पण या मागील रहस्य मात्र मृत्युपर्यंत उलगडत नाही.
हे सर्व शरीर, मन, आत्मा, इंद्रीय व्यापार, संसार, प्रपंच, परमार्थ हे सर्व कशासाठी? असे चिंतन करताना जाणवते की, आपण या सृष्टीकर्त्यांच्या हातातील एक बाहुले आहोत.
जसं रंगमंचावर एकेका कलाकाराचा प्रवेश होत असतो, त्याचा संवाद संपला की तो दुसऱ्या बाजूने रंगमंचावरून मागे जातो. पुनः तिस ऱ्या बाजूने पुनः प्रवेश घेतो. समोर काही पात्रे नाचत असतात. त्यांच्या बरोबर काही वेळ काही संवाद करायचे आणि पुनः निघून जायचे असते.
मीच का जायचे, मीच का परत यायचे, अशा प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत, मिळणार देखील नाहीत. यालाच जीवन ऐसे नाव.
ही सर्व सूत्र फिरवणारा एक कोणीतरी आहे. कारण कोणतेही कार्य, कर्त्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, असे आजचे विज्ञानदेखील सांगते. या शक्तीला आपण देव असे म्हणतो.
नेहेमी देवाला शरण जावे.
चाले हे शरीर कोणाची ही शक्ती
कोण बोलवितो हरिवीण ?
प्रार्थनेमधे विलक्षण शक्ती असते. एका व्यक्तीने केलेली प्रार्थना आणि सर्वांनी मिळून केलेली प्रार्थना यात फरक असतोच.
यालाच व्यष्टी आणि समष्टी म्हणतात.
एखादा दगड ढकलायचा असेल, आणि तो एकट्याने ढकलून जात नसेल तर आपण दुसऱ्याची मदत घेत असतो. घ्यावी. त्यात कमी पणा कसला. उलट एकट्याने असे अवघड काम करताना त्रासच जास्त होतो. म्हणून मदतीला कोणालातरी घ्यावे. आता मदतच घ्यायची असेल तर सशक्ताचीच घ्यावी.
धकाधकीचा मामला,
कैसा घडे अशक्ताला, असे समर्थ सुद्धा सांगत आहेत.
मग जीवन जगण्यासाठी मदत कोणाकडे मागावी ?
त्या सर्वश्रेष्ठ शक्तीमंत ईश्वराकडेच ना ! त्याच्याशिवाय दुसरा कुणीच तेवढ्या क्षमतेचा नाही. मग शरण त्यालाच जावे आणि त्याचे व्हावे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply