१५. मलविसर्जन करताना एकेकाळी उकीडवे बसून केले जात असे.
उकीडवे ( हिंदी मे उकुडू बैठकर ) बसून मलविसर्जन केल्यामुळे मल सहजपणे बाहेर पडायला मदत होते. दोन्ही मांड्या पोटावर विशेषतः पोटाच्या खालच्या भागावर दाबल्या गेल्याने पक्वाशय, मलाशय अधिक कार्यरत होतात. पोटऱ्या दाबल्या जातात. त्यामुळे मलविसर्जनाची सर्वात आदर्श पद्धत म्हणजे उकीडवे बसण्याची आहे, असे संशोधन आंग्ल भाषेतील पाश्चात्य विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकामधे नमूद केलेले आहे.
भारतातील बहुतांशी खेड्यामध्ये जेवताना पण उकीडवे बसण्याची परंपरा होती.
आत्ता आपण मांडी घालून जेवायला बसतो, ही आपली सोय आपण बघितली. कारण वाढत गेलेल्या ढेरीमुळे उकीडवे बसणेच मुश्कील झाले आहे.
ज्या आसनामधे भोजन त्याच आसनामधे मल विसर्जन असा सर्व साधारणपणे दंडक दिसतो.
जसे, पाश्चात्य मंडळी टेबलखुर्चीवर जेवतात, त्याच खुर्चीत बसल्याप्रमाणे काटकोनासनामधे बसून मल विसर्जन करतात. तर भारतीय परंपरेमधे उकीडवे म्हणजे लघुकोनासनामधे बसून जेवतात आणि तसेच उकीडवे बसून मलविसर्जन केले जाते.
हल्ली गुडघ्यांची दुखणी वाढल्यामुळे लघुकोनात बसताच येईनासे झालेसे वाटल्यावर सुखासनाचा मार्ग म्हणून कमोड बरा वाटायला लागलाय. आणि खाली बसण्याची सवय विसरल्यामुळे आता खाली बसणे सुद्धा जीवावर येते.
उकीडवे म्हणजे काय हे पुढील पिढीला करून दाखवावे लागेल. ज्याला आंग्ल भाषेत स्क्वॅटींग पोझिशन म्हणतात. ही स्थिती खरंतर अतिशय आरामदायक असून मल संसर्गापासून शरीराला लांब ठेवले जाते. फतकल मारून कमोडच्या सीटवर बसणे म्हणजे मोस्ट अनहायजिनिक कंडीशन.
पाश्चात्य मंडळींना साधे मांडी घालून बसणे देखील जमत नव्हते. बसायचे माहितच नाही, तर मग उकीडवे कुठले बसणार ? म्हणून ते कमोडवर बसतात. पण आता चित्र पालटू लागले आहे. आता ते ध्यान करायला मांडी घालून बसू लागलेत. योगासने पण करू लागलेत. अभ्यास केल्याने बसण्याचे महत्व त्यांच्या लक्षात येतंय.
उकीडवे बसल्याने पाय पोटऱ्या पोट, मांड्या दाबले गेल्याने दोन नंबरला पण चांगले होते, म्हणून शाळेत एकेकाळी केल्या जाणाऱ्या शिक्षा प्रकारात उकीडवे बसून कोंबडा करायला बहुतेक शिक्षकांना आवडत होतं !
आता गेले ते दिवस उरल्या शिक्षकांच्या आठवणी. आणि आठवणीतले तेच शिक्षा करणारे शिक्षक !!!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply