५५. तेल गेलं तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं. अशी एक म्हण आपल्याकडे होती. केसांना तेल लावायचं नाही, अंगाला अभ्यंग करायचं नाही, डोळ्यात काजळ घालायचे नाही, नाकात तेल सोडायचे नाही, कानात तेल ओतायचे नाही, आणि पोटासाठी तेल प्यायचे नाही. नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ या ज्ञानेंद्रियांचे संरक्षण करणारी मुख्य भारतीय यंत्रणा ताब्यात घेऊन, आरोग्यामधे घुसखोरी सुरू झाली. या मुख्य संरक्षण यंत्रणेवरच अंतर्गत हल्ला झाल्यामुळे ही ज्ञान देणारी, बाहेरील ज्ञान आतपर्यंत पोचवणारी इंद्रिय व्यवस्था बदलू लागली.
बंद करा बंद करा तेल तूप खाणे बंद करा !! या चुकीच्या सल्ल्यापोटी तेल तुपामुळे होणारे हातापायातील स्नायु, शिरा, कंडरा, वाहिन्या, सांधे इ. चे पोषणही थांबत गेले, आणि आतून कर्म करणारी इंद्रिय व्यवस्था डबघाईला आली. हात पाय, गुद, जननेंद्रिय आणि जीभ ही कर्मेंद्रिये असून नसल्यासारखी झाली. कर्म ज्या वंगणाच्या सहाय्याने करायचे आहे, तेच पोषण थांबल्यामुळे कर्म इंद्रियांनी कर्म करायचे तरी कसे ?
या सर्वांमुळे मन असंतुलीत होत गेले. जे जिथे हवे ते त्यावेळी तिथे नसेल तर दुसरे काय होणार ना ?
झालं.
ज्ञानेंद्रियांचे कर्मेंद्रियांचे आणि त्यांना जोडणाऱ्या मनाचे कार्य मुळापासूनच कमी होत गेले. परिणामी संपूर्ण शरीराची प्रतिकार क्षमताच संपुष्टात आली आणि कृत्रिमरीत्या आयुष्यभर जीवनरक्षके घेण्याची वेळ आली.
जसं भारताचा एक काळ असा होता, एका घरात कमीत कमी दहा बारा जण रहात होते. पण कुटुंब नियोजित करताना ते गरजेपेक्षा खूपच लहान होत गेले. दोन आणि तीन पुरे पेक्षाही एकच बस्स. असा नारा सुरू झाला. आणि दैव देते आणि कर्म नेते म्हणतात तसे झाले, आता ते एकसुद्धा काहीजणांच्या पदरी येईनासे झाले. सुने सुने हे मधुबन सारे सारखं सगळं घर भरलेलं असून पुढच्या पिढीला वारसच मिळेनासा झाला. संपूर्ण कुटुंब व्यवस्थाच बदलून गेली. समाजधारणाच बदलून गेली. आपल्या डोळ्यासमोर हा बदल आपण अनुभवतो आहोत. पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे हे होत आहे. असे म्हटले तर काही चुक ठरेल का ?
तसं, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मन यांच्या वैचारीक पोषणमूल्यांच्या अभावामुळे शरीररुपी घरातील हे सदस्य देखील कुपोषित होऊ लागले. किडलेल्या बियाण्यातून मधून उत्तम पिकाची अपेक्षा कशी ठेवणार ?
जे आपलं नव्हतं ते हट्टानं आपलं म्हणण्याची जणु स्पर्धाच लागल्या सारखं सगळं सगळंच बदलून गेलंय.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply