५६. केसाना तेल लावल्याशिवाय, वेणी घातल्याशिवाय घराबाहेर पाऊल पडत नसे. केस कापणे तर फार लांब राहिले. केसांना हात लावला तरी हात धुवायला सांगितले जाई. आणि आजकाल कातरवेळी कात्री घेऊन कराकरा केस कापायला काळीज करपत कसे काय नाही ?
जेवताना जेवणात केस सापडणे म्हणजे जेवणाऱ्या व्यक्तीचा अपमान समजला जाई. एवढे निशिद्ध समजले गेलेले केस सौंदर्य स्पर्धांमुळे जरा जोरातच फडफडायला लागले. केस जेवणात पडू नये म्हणून डोक्यावर टोपी घातलेली दाखवली की झाले.
केस बांधून, छान वेणी घालून पोरगी आली म्हणजे ती बावळट झाली. असा गैरसमज कधी झाला आम्हाला कळलेच नाही.
५७. डोक्यावरचं कुंकु गेलं, टिकली तर टिकली म्हणणारी टिकलीही गेली.
याची कारणं काहीही असोत, पण ही वस्तुस्थिती आहे की, एक अस्सल भारतीय परंपरा लुप्त होत जातेय. मुख्यत्वे करून हळद, चंदन, रक्तचंदन, अष्टगंध, पिंजर यांनी मस्तक सजवले जात होते. हळद अंगाला लावली तरी ती त्वचेतून शोषली जाते. आणि कॅन्सर प्रतिबंधक, रक्तशुद्धी करणारी, त्वचेचे सौंदर्य वाढवणारी, प्रतिकारशक्ती वाढवणारी, हे गुण दिसायला सुरुवात होते. हे आता पाश्चात्य वैद्यकाने पण मान्य केलंय.
या हळदीला पूर्ण अंगाला लावण्यासाठी लग्नसमारंभातील एक पूर्ण दिवस ठेवलाय, या हळदीपासूनच कुंकु बनवले जाते, असे हळदीकुंकु माथ्याला लावले की “बुरसटलेल्या विचारांची” हा शिक्का का माथी मारला जातो, हे कळतच नाही.
ज्योतिबाच्या नावानं का हुईना, चांगभलं म्हणत हळदीचाच भंडारा उधळला जातो. या परंपरांमागील विज्ञान शोधण्याऐवजी आमची बुद्धी ” ही अंधश्रद्धा आहे’ असे म्हणण्यात भ्रष्ट झाली आहे.
पाश्चात्यांनी दुधात हळद घालून घेतली की ती टर्मरीक लाटे ही फायुस्टार डीश बनते, आणि भारतीय आजीने दुधात हळद घालून दिली की “एक कालबाह्य परंपरा” हे लेबल लावायला मोकळे!
यालाच राजीवभाई पाश्चात्य विचारांची गुलामगिरी म्हणतात.
शंखातील पाणी कितीवेळ शंखात राहिलं की त्यात कॅल्शियम उतरतं, उतरतं की नाही, हा विज्ञानाचा भाग झाला, पण शंखोदक तीर्थ म्हणून पिण्यामागील भारतीय दृष्टी विज्ञानानेच सिद्ध होते असे नाही.
गोमूत्र शिंपडले की शुद्धी होते, यामागील विज्ञान आणि श्रद्धा या गोष्टी वेगळ्या आहेत. शिकण्यासाठी दृष्टी बदलावी लागते.
तुळस ऑक्सीजन देते, हे विशेष ज्ञान आज विज्ञान सांगते, हे भारतीय परंपरेला कदाचित माहिती नसेल, पण शेवट मरताना नाका तोंडाकडे (ऑक्सीजन देणाऱ्या) तुळसीचेच पान का नेले जाते, याचे उत्तर मात्र पाश्चात्य विज्ञानाकडे नाही. इथे भारतीयत्व, भारतीय परंपरा विचार करायला भाग पाडतात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply