‘भारतीय संस्कृती’ असा शब्द उच्चारला की, काही जणांच्या नाकाला अगदी मिरच्या झोंबतात. भारतीय पद्धतीने समजावून सांगायचं म्हणजे कालबाह्य गोष्टी ऐकायच्या, जग चाललं चंद्रावर आणि हे बेणं सांगतंय धोतर नेसाया हवं. असे काहीसे नाराजीचे सूर दिसतात.
भारतीय संस्कृतीला विज्ञानाचे कधीच वावडे नाही. उलट जगाच्या सर्व संस्कृतींचा नुसता धावता आढावा घेतला तरी भारतीय संस्कृती विज्ञानाधिष्ठीत आहे, असे लक्षात येते. भारतीय संस्कृती या शब्दाऐवजी फक्त भारतीय संस्कृती असा शब्द वापरला तरी अतिशयोक्ती होणार नाही.
भारतीय संस्कृती ही केवळ मानवाच्या आध्यात्मिक आणि भौतिक उन्नती तसेच केवळ धर्मरक्षणासाठी नसून संपूर्ण उत्कर्षासाठी आहे. एकेकाळी या संस्कृतीने आपली वैज्ञानिक आणि वैचारीक छाप टाकून सर्व जगाला मोहीत केले होते.
ज्या काळात पोट भरण्यासाठी आहार लागतो, तो शिजवून खावा लागतो, त्यावर वेगवेगळे संस्कार करावे लागतात, त्यासाठी शेती करावी लागते, हे भारतीयांना माहीत होते, अशा काळात अन्य देशातील लोक पोट भरण्यासाठी मिळेल ते कच्चे मांस खात होते, आणि लूटमारी करीत होते. लज्जारक्षण करण्यासाठी कपडे घालायचे असतात, हे लक्षात येईपर्यंत झाडांच्या साली कमरेला गुंडाळून वावरत असण्याच्या काळात भारतात हातमागावर तलम वस्त्रे निर्माण केली जात होती. एवढे निर्मितीमूल्य भारतात निर्माण झालेले होते, याचा अभिमान आणि ज्ञान आपल्याला नक्की हवे.
झोपताना आपले प्रत्येकाचे अंथरुण वेगळे असावे, असे आमची आजी सांगायची. यात काय विज्ञान आहे ?
प्रत्येकाची वळकटी वेगळी करून द्यायची एक लांबट तरट त्यावर एक सतरंजी गोधडी आणि लाकडाचा भुसा भरलेली उशी. झोपताना आपली पथारी आपणच आणायची, पसरायची आणि सकाळी आपणच आवरायची. आपल्या अंगाचा, घामाचा, लाळेचा, संसर्ग फक्त आपल्या पुरता इतरांना त्याचा त्रास नाही. तसं दुसऱ्यांनी वापरलेलं अंथरुण पांघरुण आपण वापरताना सुद्धा धुतल्याशिवाय वापरत नाही.
आजीला कदाचित “व्हायरल इन्फेक्शन” हा शब्द माहीत नसेल, पण त्यामागचे कारण नक्कीच माहित होते.
भारतीय संस्कृतीने शिकवलेल्या अशा अनेक गोष्टी परंपरेनेच पुढे पुढे चालत आलेल्या आहेत. हे कोणत्या ग्रंथात लिहिलेले नाही किंवा शालेय अभ्यासक्रमात लिहिलेले नाही. पण यामागील विज्ञान शोधून आपणच पुढील पिढीला सांगायचे आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply