पाश्चात्य विद्वानांनी लावलेल्या शोधाबद्दल पूर्ण आदर ठेवून ही लेखमाला लिहितोय. कृपया गैरसमज नसावेत. आणि जे शोध लावले जात आहेत, ते विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळेच. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, संगणकशास्त्रातील जे मौलिक संशोधन झाले आहे, त्याबद्दल वाद नाहीच आहे. पण ही प्रगती होण्यासाठी जे पायाचे ओबडधोबड दगड आहेत, त्यांना विसरून कसे चालेल ?
विमान आले, रेल्वे आली, बस आली, विद्यतीकरण झाले, मिक्सर आले, पीठाची चक्की आली म्हणून बैलगाडीच्या पहिल्या चाकाला विसरून चालेल का ? खलबत्ते टाकून चालेल का ? आज काळाच्या ओघात बैलगाडीची चाके थांबली, जात्याची घरघर थांबली, पण खलबत्ते आहेत तसेच आहेत. आयुर्वेदात अनेक औषधे खलबत्त्यामधे खलायला सांगितली आहेत. खलण्याची प्रक्रिया आणि पीठ करण्याची प्रक्रिया यात मूलभूत फरक आहेतच. ते रहाणारच. त्याचाच अभ्यास करायचा आहे. विद्वान मंडळी ते करीत आहेत.
गाॅडस पार्टीकल, नॅनो पार्टीकल्स ही आजची कल्पना आहे, पण त्यापूर्वीही अणु रेणु त्र्यसरेणु किंवा त्याहीपेक्षा अतिसूक्ष्म कण बनवण्याची प्रक्रिया अस्तित्वात होती. आणि मोठ्या अभिमानाने सांगेन की ती भारतीय संस्कृतीमधेच आहे.
कोपर्निकस, न्यूटन, हे देखील ऋषीच होते ! ते कोणत्या देशात जन्माला आले हे गौणच आहे.
भास्कराचार्य आणि जगदीशचंद्र बोस हे देखील ऋषीच ! !
अगदी आजचे अब्दुल कलाम आणि डाॅ. प.वि वर्तक, विजय भटकरजी हे देखील ऋषीच!!!
यांच्यासमोर नतमस्तकच व्हायला हवे, पण विज्ञानाच्या जोरावर स्वतःची तुंबडी भरणाऱ्या आधुनिक मल्टीनॅशनल बुवा यांच्यातील फरक आम्ही कधी ओळखणार?
जसे सर्व संत हे एकाच पातळीवर समष्टीचा विचार करीत असतात. तसे हे सर्व ऋषी स्वतःच्याच धुंदीत ज्ञानाच्या समुद्रावर अगदी उघडे होऊन पोहोत असतात. आमचीच क्षुद्र संकुचित दृष्टी आड येते.
आज पाश्चिमात्य भारतात येत आहेत, ते केवळ गोव्यात समुद्रकिनारी उघडे होऊन लोळायला नाही, ध्यान लावल्याने काय होते, जप केल्यावर काय होते, समंत्र सूर्यनमस्कार घ्यातल्याने काय होते, अग्निहोत्र केल्याने शेतीवर काय परिणाम होतो, सूर्य, चंद्र, गुरु मंगळ शनि आदि ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो, हे अभ्यासत आहेत. मंत्र म्हटल्याने मनात काय काय बदल होताहेत, ते शोधत आहेत, आणि आम्ही करंटे टूथपेस्ट दातावर रगड रगड रगडतोय पण साधे दातांचे पण रोग काही कमी होत नाहीत, आणि मोठमोठ्या रोगावर औषधे आयुष्यभर खावीच लागतील, असे सल्ले देतोय. ही विज्ञानाची प्रगती ??
कुठे चाललोय आपण ? कुठे चाल्लय आपलं आरोग्य ? अख्खी सुपारी दातानी फोडणाऱ्या त्या दाढा कुठे हरवल्या ? उसाचे कांडे फक्त दातानी सोलून खाणारे ते दात कुठे गेले ? देह जाळल्यावर सुद्धा बत्तीस दात शोधून काढावेत, असे दात दहाव्या बाराव्या वर्षीच झिजून, काळेकुट्ट होऊन घशात जाताहेत, याला वैज्ञानिक प्रगती म्हणायची काय ?
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती ठिकाणी अभारतीय पद्धतीने वागतो आणि आरोग्यापासून लांब जातोय ते आपण अभ्यासत आहोत. त्या अनुषंगानेच. आज दात अभ्यासूया.
केवळ भारतीय संस्कृती मधेच वर्णन केलेले दंतमंजन आज कालबाह्य ठरवले गेले.
पाश्चात्यांच्या टेक्नाॅलाॅजीचा वापर करून भारतात केवळ व्यापार वाढविण्यासाठी आणलेली टूथपेस्ट आम्ही बिनधास्त वापरायला लागलो. चकचकीत पॅकींग मधून आणून, आकर्षक जाहिराती दाखवून दाखवून, पद्धशीरपणे आमचे दंतमंजन आमच्या कपाटातून गायब झाले आणि “त्यांची” टूथपेस्ट आमच्या तोंडात आली.
पाश्चात्यांच्या वैचारीक गुलामीत राहिल्याने, स्वत्व विसरल्यानेच हे झाले असे आपणाला नाही वाटत ????
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply