टूथपेस्टमधे असलेल्या विषारी पदार्थांबद्दल मागील टीपांमधे सविस्तर लिहून झालेले आहे. त्यामुळे एवढेच लक्षात ठेवूया की, टूथपेस्टची टेक्नाॅलाॅजी भारतीय नाही. अभारतीय आहे.
एक काळ असा होता, की पाश्चात्यांना पोट कसे भरावे याची चिंता होती. संस्कृती, संस्कार हे शब्द त्यांच्या खिजगणतीतही नव्हते. लज्जारक्षण कसे करावे, हे त्यांना माहित नव्हते. अर्थात अजून तरी कुठे कळले आहे म्हणा ! लज्जारक्षण करण्यासाठी चांगले कपडे घालायचे असतात, हा उद्देश नाहीच आहे. शरीर आणखी आकर्षक कसे दिसेल यासाठीच आज ते कपडे घालतात. त्यातूनच रॅम्पवाॅक कॅट वाॅक, फॅशनशो आणि स्त्री शरीराचा बाजार इ. प्रकार पुढे येत गेले.
साधे मीठ कसे बनवतात, हे पण त्यांना माहिती नसावे ? या पार्श्वभूमीवर आपले पूर्वज किती बुद्धीमान होते, कोणत्याही भौतिक साधनांचा वापर न करता, अनेक क्षेत्रांत जे मूलभूत संशोधन त्यांनी करून ठेवले, त्याला तोड नाही.
आणि आज जाहिरातीत स्वतःच्या अकलेचे तारे तोडताना दाखवतात, “तुमच्या मीठात म्हणे आयोडीन न वापरणारे तुमचे पूर्वज कमी अकलेचे होते. !!”
वारे वा !
नालंदा तक्षशीला येथील गुरुकुलांचा अभ्यास केला की, लक्षात येते, की मेरा भारत महान था, महान है और महान रहेगा ।
आकर्षक जाहीरात तंत्र आणि खोट्या गोष्टींचा वारेमाप भडिमार केला गेला आणि सत्य विसरायला भाग पाडले.
आम्हाला आमचा खरा इतिहास कधी शिकवलाच गेला नाही. जो शिकवला जातोय, तो इतका अर्धवट आणि पोटार्थी आहे, की त्यातून ज्ञान मिळण्यापेक्षा बुद्धीभेदच अधिक होतोय. हे कळतंय पण वळत नाही, अशी अवस्था झाली आहे. यालाच म्हणतात, वैचारीक गुलामगिरी आणि बौद्धिक दीवाळखोरी !
पण तरीसुद्धा लोक आपल्या दोन किंवा एका पोराला देखील काॅन्व्हेंटमधे अॅडमिशन मिळाल्याचं काय कौतुक करतात !
आणि इथूनच ब्रेनड्रेनला ( बुद्धी पलायनवादाला ) सुरवात होते. मग वाटू लागते, उगाच कशाला धोपट मार्ग सोडावा ? आपण आपले मळलेल्या वाटेने जात रहावे. पण ही मळलेली वाट आधी माणसांच्या चालण्यामुळे तयार झाली आहे की गुरंढोरं जाऊन तयार झाली आहे, याचाही विचार नाही.
मग वाटू लागते, उगाचच कशाला त्यांना दुखवून वाद ओढवून घ्या, आपण बरे आपले काम बरे ! आम्हा काय त्याचे चंद्र सूर्य प्रकाशतात, ही वृत्ती निर्माण होऊ लागली, अधिक सेल्फीश बनू लागलो. त्यात शाब्दीक अहिंसावाद देखील बोकाळला आणि स्वत्व आपण हरवत चाललो. ते विचारमूल्य देशाच्या पातळीतून देहाच्या पातळीपर्यंत खाली आले.
ही वस्तुस्थिती आहे.
हा वाद जुनं आणि नवं असा नाहीच आहे. मोठ्या आणि मोकळ्या मनानं अहंकार सोडून या गोष्टींचा विचार करावा.
आता हेच पहाना,
एकेकाळी आपण भारतीय मंडळी दात घासण्यासाठी एकतर दंतमंजन किंवा नैसर्गिक दातवण किंवा दातून वापरत होतो. ते टाकून टूथपेस्टच्या मागे लागलो. आणि नको त्या गटारातील पडलेल्या भंगार प्लॅस्टीक पासून बनवलेले ब्रश सकाळी सकाळीच, स्वतःचे तोंड घासण्यासाठी तोंडात घालायला लागलो आणि स्वतःला “माॅडर्न” समजायला लागलो. त्याचवेळी पाश्चात्य देशातील माॅलमधे कडूनिंबाची काडी आकर्षक पॅकींगमधे काही शेकडो रूपयात विक्रीसाठी उपलब्ध झाली.
आता काय करावे ?
म्हणजे स्वतःच्या घरात नवऱ्याची राधिका बायको असताना, त्या सनयाच्या मागे लागल्यासारखं झालं ना !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply