६७. आहारामधे फळांचा वापर करावा. आहारानंतर फळ नको किंवा आहाराऐवजी फलाहार करावा. आज जेवणानंतर फळे खायची प्रथा पडली आहे. फळे पचायला जड असतात. जे पदार्थ पचायला जड ते अग्नि प्रखर असतानाच म्हणजे भूक कमी होण्याअगोदरच संपवावे.
फळाविषयी सविस्तर माहिती यापूर्वी झाली आहे.
६८. गोड पदार्थानी आहाराची सुरवात करावी, आज आंबट तिखट सूप प्यायले जाते. जे अॅपेटायझर म्हणून वापरले जाते. वास्तविक भूक लागल्यावरच जेवायचे असते. कृत्रिम पेय घेऊन भूक निर्माण करून जेवणे हे पण जरा शास्त्र सोडूनच होते. याने पित्त वाढते.
६९. आहाराचा शेवट तुरट पदार्थानी व्हावा म्हणून जेवणानंतर विडा खावा.
पण आज जेवणानंतर स्वीट डिश खायची प्रथा पडली आहे. ही भारतीय नाही. एवढे लक्षात ठेवावे.
७०. पहिला घास तुपाचा असावा, पण आज अमृतासमान असलेल्या तुपाला ताटातून, कोलेस्टेरॉलच्या फुकटच्या भीतीपोटी चक्क ढकलून दिले आहे. आणि त्याची जागा विपरीत गुणाच्या विकतच्या औषधांनी घेतली आहे. चांगले आरोग्य कसे मिळणार ?
७१. आहाराची सुरवात करण्यापूर्वी अन्नब्रह्माला नमस्कार करण्याची पद्धत भारतीयच होती.
७२. अन्नाला स्पर्श करण्यापूर्वी हातपाय नीट धुवून कपडे पालटून यावे, असाही एक दंडक होता. तोही भारतीयच !
७३. भोजनाला सुरवात करण्याअगोदर घरातल्या प्राण्यांना घास देण्याची पद्धत होती. चिमणी कावळ्याना देखील एक घास वाढला जायचा. ही परंपरापण भारतीयच !
७४. पान वाढण्याची एक आदर्श पद्धत भारतात विशेषतः महाराष्ट्रात दिसते. कोणत्या चवीचा पदार्थ कुठे वाढावा, हे ठरलेले असते. एकाच उजव्या हाताने जेवायचे हे पण ठरलेले असते.
७५. कोणत्या चवीचा पदार्थ किती प्रमाणात खावा हे वाढण्याच्या प्रमाणावर ठरलेले होते. लोणचे एक फोड, कोशिंबीर दोन चमचे, दही एक चमचा, चिमूटभर मीठ इ.इ. आणि हे सर्व पदार्थ पानाच्या डाव्या बाजूलाच.! वजनी प्रमाणात मोजून घेऊन, आणि पानात एखादा पदार्थ कुठेही घेऊन, कसंही, दोन्ही हातानी खायची पद्धत काय भारतीय आहे ?
काय आदर्श होते, आणि आपण काय करीत आहोत याचे भान (आणि ज्ञानपण ) आम्ही विसरलो आणि भोजनामधला भारतीय भाग, भोगात भागवला.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply