हे आर्तपण मला वळणावळणावर भेटलंय. काही वर्षांपूर्वी ग्रेसची कॅसेट आणली होती. नंतर “निवडुंग ” ची भेट. पण त्याआधी सदर कॅसेट. तिथे एक आर्त काव्य भेटलं-
क्षितिज जसें दिसतें,
तशीं म्हणावीं गाणीं
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी.
गाय जशी हंबरते,
तसेंच व्याकुळ व्हावें
बुडतां बुडतां सांजप्रवाहीं;
अलगद् भरुनी यावे…
हे हंबरणे आर्त होते. उगाचच या माणसाला आपण “दुर्बोध” वगैरे लेबल लावले. दुःखसंवेदनेचा प्रचंड असा वाहता प्रवाह ग्रेसमुळे अनुभवला.
त्याच्या गाईचे हंबरणे मला भुसावळच्या लहानपणी घेऊन गेले. आमच्या इमारतीच्या पायऱ्यांवर दुपारी एक कुत्रा निवांत झोपला होता. श्वासाबरोबर त्याचे पोट मंद लयीत वरखाली होत होते. माझ्या एका गल्लीमित्राला खोडसाळपणा सुचला. मला त्याने आव्हान दिलं – ” मार एक दगड या कुत्र्याच्या पोटावर.”
मी ही मागचा पुढचा विचार न करता मारला दगड आणि आर्त किंचाळण्याची आणि माझी पहिली गाठ पडली.
त्यानंतर काही दिवसांनी माझा एक जवळचा नातेवाईक आमच्या घरी आला. तो दिवाळीचा सुमार होता. माझ्या वडिलांनी मला पिशवीभर फटाके आणून दिले आणि त्याच्या वडिलांनी नाही या जोरावर मी त्याला उगाचच काहीबाही हिणवलं. माझा तो उन्मत्त स्वर अजूनही विसरला जात नाहीए. जगण्याच्या काठावरून काळाचे इतके प्रवाह वाहत गेले की त्यांच्याबरोबरच्या आठवणींच्या दिव्यांची सयही राहिली नाही. पण अजूनही तो नातेवाईक समोर दिसला की ग्रेसच्या गाईचे हंबरणे आठवते आणि त्याचे त्यावेळचे केविलवाणे, आर्त डोळे आठवतात. लहानमोठया भावंडांसमोर त्याचा केलेला पाणउतारा अजूनही व्याकुळ करून जातो आणि माझ्याच नजरेत मी खुजा होत जातो.
माझा मुलगा लहान असताना टेरेसवर क्रिकेट खेळताना अनवधानाने मी टाकलेला चेंडू त्याच्या चेहेऱ्यावर आदळला आणि तो आपल्या आईकडे धावला -तिच्या कुशीत डोळे कोरडे करायला. तेही आमच्यातलं आजवरचं एकमेव आर्तपण !
गेली २५ वर्षे एकेक करून बरीच जवळची मंडळी ठरवून “गेलीत” आणि आर्त शब्द आता माझ्या शब्दकोशात येऊन स्थिरावलाय.
माऊलींच्या इतके माझे मन नभाकार नाही की त्यांत विश्वाचे आर्त प्रकाशमान होईल.
माझे आपले हे छोटे छोटे मळभाचे ढग- स्वतःचे वेळोवेळी भेटलेले आर्तपण साठवून ठेवणारे !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply