नवीन लेखन...

आरती…. मोठी आरती वगैरे

जेमतेम दहा-एक वर्षापूर्वीचा काळ. गणपती-नवरात्रीचे दिवस आणि आरती हे एक सॉलिड समीकरण होतं. पूर्वीच्या चाळ संस्कृतीत आरती म्हणजे एक मोठा इव्हेंट असायचा. त्यातही मोठी आरती म्हणजे कमालच. मोठी आरती म्हणजे विसर्जनाच्या आधल्या रात्री केलेली आरती. काही ठिकाणी तर ही मोठी आरती तब्बल तासभरच काय तर त्याहीपेक्षा जास्त वेळ चालायची. बहुतांश चाळींमध्ये दिवसभर सगळ्यांचे दरवाजे उघडेच असायचे. गणपती-नवरात्रीच्या दिवसात तर ते रात्री उशीरापर्यंत उघडे असायचे. संध्याकाळचे सात वाजले की आरतीसाठी तयारी सुरु व्हायची. एका घरातली आरती आटोपली की सगळी फैय्यर दुसर्‍या घरात जायची, तिथून तिसर्‍या मग चवथ्या… सगळ्या घरांमध्ये संपूर्ण टिम जाउन आरतीमध्ये सहभागी होत असे.

त्यावेळी आरत्यासुद्धा साग्रसंगीत होत. अगदी टाळ-मृदुंग-तबला आणि इतरही वाद्यांसहित. त्यामुळे एक प्रसन्न वातावरण बनत असे.

भावपूर्णपणे व आर्ततेने देवाची केलेली स्तुती म्हणजे आरती. समर्थ रामदासस्वामींनी “सुखकर्ता दुख:हर्ता” यासह अनेक आरत्या लिहिल्या आहेत. मात्र इतर बर्‍याच आरत्या कुणी लिहिल्या, कुणी त्यांना चाली लावल्या हे काही नक्की माहित नाही. पिढ्यान् पिढ्या त्या आपल्या तोंडावर आहेत. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम यांसारख्या संतश्रेष्ठांनीही आरत्या रचल्या आहेत. वामन पंडितांच्या काळातल्या शेख महंमद या मुसलमानानेही आरत्या रचल्या आहेत.

आरती हा जेवढा धार्मिक भाग आहे, तेवढा तो संस्कृतीचाही भाग आहे. पूर्वी संध्याकाळच्या वेळी दिवेलागणी होताना “शुभंकरोती…. ” वगैरेचे सूर कानी पडायचे. आता मात्र संध्याकाळी सासु-सुनेच्या मालिकांची शिर्शकगीतेच घरोघरी ऐकू येतात. दुसरी-तिसरीतल्या मुलांना सिनेमातली गाणी पाठ असतात. मात्र आरत्या पाठ असणे दूर… आज मुलांना वाचून आरत्या म्हणण्याचासुद्धा कंटाळा येतो.

मुलांना कॉन्व्हेंट, इंग्रजी माध्यम, आंतरराष्ट्रीय शाळेत खुशाल पाठवा, पण त्यांना आरत्याही पाठ असू द्या. आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेताना आपली संस्कृती बदललीच पाहिजे असं नाही.

काही आरत्यांची खास अशी वैशिष्ट्ये आहेत. “आरती सप्रेम” हि सर्वात मोठी आरती. बराच काळ चालणारी.

अनेकदा काही विशिष्ट अक्षरांवर भर देउन आरत्या म्हटल्या जातात. त्यातून कधीकधी विनोद निर्मितीही होते. “निढळावरी करSSSSS” यातला “र” जितका ताणता येईल तितका ताणला जातो. त्यात स्पर्धा असायची. तिच गोष्ट “भक्त संकटी नानाssss” मधल्या चढलेल्या आवाजाची.

“मातला रावण सर्वा उपद्रव केला” म्हणताना घरातील सुदृढ-बलदंडांकडे मिश्कील कटाक्ष टाकला जायचा. दत्ताच्या आरतीतली “पराही परतली तेथे कैचा हा हेत” ही ओळ गडबड करायची आणि कोण बरोबर म्हणतेय आणि कोण नुसते पुटपुटतं हे बघायला मजा यायची.

सगळ्यात गंमत म्हणजे आरत्यांच्या वेगवेगळ्या चाली आणि ठिकठिकाणी वापरले जाणारे वेगवेगळे शब्द. कोणी “…. जयदेवी जयदेवी महिषासूरमर्दिनी” म्हणत असे तर कोणी “…. जयदेवी जयदेवी जय महिषासूरमर्दिनी” ! त्या एका “जय” मुळे आरतीच्या गाडीचे डबे पार पुढेमागे होत.

या आरतीपर्वातला कळस असे आणि आजही असतो तो म्हणजे “मंत्रपुष्पांजली”मध्ये. तिथल्या काही संस्कृत शब्दांवर गाड्यांचे डबेच्या डबे घसरतात. कोणीतरी संस्कृत पंडित उच्च स्वरात मंत्रपुष्पांजली म्हणायला सुरुवात करतो. मंडळी स्वरात स्वर मिसळतात.

“ ॐ यज्ञेन…. ” इथून सुरु झालेली गाडी “साम्राज्यं भौज्यं…..” पर्यंत बर्‍यापैकी येते आणि हलकेच “समंतपर्यायी….” इथे घसरायला सुरुवात करते आणि ”स्यात्सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति……..तदप्येषः श्लोको ऽभिगीतो | मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे |” इथे येईपर्यंत अनेक डबे पार घसरलेले असतात. अनेकांना घाम फुटतो, अनेकजण नुसते एकमेकांकडे बघून पुटपुटत असतात. काहीजण नुसते उभे असतात. पुढच्या शेवटच्या ओळीकडे आल्यावर पुन्हा सगळे स्वर एकत्र होतात आणि डबे जागच्या जागी येतात. “..सभासद इति” इथे सर्वजण सुस्कारा टाकतात.

असे हे आरतीपुराण. त्याची मजा आता सर्वार्थाने घेता येत नाही हे सारखं टोचतं.

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..