(माझी प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिचा हा ७१ वा जन्मदिन. तिच्या निधनानंतरच्या या प्रथम जन्मदिनीं, तिच्या स्मृतीला मी या अर्चनेनें अभिवादन करतो आहे.)
आरती प्राणप्रियेची
तिनें उधळली माझ्यासाठी अंजलि आयुष्याची ।।
अर्धांगी-मम, सुहास्यवदना
खुलवियलें नित अमुच्या सदना
तिच्यामुळे चिरहर्ष मिळे, ती साम्राज्ञी हृदयाची ।।
संगम बुद्धी आणि कलेचा
ठामपणा अन् चातुर्याचा,
स्मित-शिडकावा, मर्मिक-वच जिंकती मनें सर्वांची ।।
जरि असाद्य व्याधिनें ग्रासलें
तरि न तिचें मन मुळि डगमगलें
कसें साधलें संतुलन ? कशी भीती ना मरणाची ?
तप्त अश्रुधारा नित गळते
भग्न हृदय नित भरून येतें
देइ दिलासा, मूर्ति मनीं जी ज़पली मी सजणीची ।।
कशास पूजूं देवदेवता ,
मनमंदिरिं आराध्या असतां ?
एकच उरली आस अंतरी – नाम तिचें स्मरण्याची ।।
शिके तिजकडुन – ‘कसें ज़गावें
कसें यमा सामोरें जावें’ ,
उरलेले दिन क्षणक्षण राखिन आब उदाहरणाची ।।
– – –
आब : प्रतिष्ठा
– –
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik.
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply