अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .
आर्यावर्तातील कामरूप प्रदेशातील जतिंगा गावातील अवघड पहाडावर दोघेही मुद्दाम आले होते .
पहाड खूप जुना होता .
आजूबाजूला खोल दरी होती .
वारा वहात होता , तरीही सर्वत्र पडलेल्या मृत विहंगांची दुर्गंधी पसरली होती .
सारं अनाकलनीय , अविश्वसनीय , अतर्क्य असंच होतं .
गेल्या अनेक संवत्सरापासून हे घडत होतं .
प्रत्येक संवत्सरात विशिष्ट कालावधीत अनेक प्रदेशातील विहंग या पहाडावर यायचे . उंच झेप घ्यायचे आणि ठराविक उंचीवर गेल्यावर चोच भूमीच्या दिशेने वळवून पहाडावर अत्यंत वेगानं येऊन आदळायचे . प्राणत्याग करायचे .
सहस्रच्या संख्येनं . एकामागोमाग एक .
हे सगळं अनाकलनीय आणि अतर्क्य होतं .
वर्षानुवर्ष चालत आलेलं होतं .
अनेकांनी विहांगाना थांबवण्याचा यत्न केला . त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला . पण उलट्या घड्यावर पाणी पडावं , तसं होत होतं .
अजन्म्याला हे कळलं तेव्हापासून तो सुध्दा समजून घेण्याचा प्रयत्न करत होता .
एकदा तर त्यानं आदळणाऱ्या विहंगाला अलगद पकडलं .
त्यानं खूप धडपड केली सुटायची .
पण अजन्म्याची पकड घट्ट होती .
त्यानं विचारलं ;
” हे काय चाललंय तुम्हा सर्वांचं ? सर्वजण प्राणत्याग का करत आहात . हा पहाड धोकादायक आहे , हे कळत का नाही तुम्हाला ? वर्षानुवर्ष , पिढ्यानपिढ्या याच पहाडावर आत्मघात का करावासा वाटतो ? असं काय आहे यात की तुम्हाला आत्मघात करण्यापासून कुणी परावृत्त करत करत नाही ? पूर्वी कामरूपातील जतींगामधल्या या पहाडावर तुम्ही स्वेच्छेने प्राणत्याग करत होता . आता तर संपूर्ण आर्यावर्तच पहाड झाला आहे . काय झालंय तुम्हाला ? ”
” भगवंता , तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहीत आहेत . तरीही सांगतो . या पहाडाच आकर्षण कसं कुणास ठाऊक पण आहे . आमच्या पूर्वजांची एक धारणा होती की या पहाडावर प्राणत्याग केला की स्वातंत्र्य मिळतं . खरं की खोटं माहीत नाही , पण ही धारणा होती . हा पहाड आमची रोजची भूक भागवेल असं सांगितलं जात होतं . सर्वांना विनामूल्य घरटी , आमच्या पिलांना जे जे गरजेचं आहे ते विनामूल्य देण्याची योजना , प्रकाशाची विनामूल्य व्यवस्था , आकाशात उडण्यासाठी पंखात विनामूल्य बळ असं बरंच काही पहाड देईल असं वाटत राहतं . असंख्य वर्षे गेली , पण यातलं काही मिळालं नाही . तरीही पहाडाच आकर्षण आहे . आमच्या अनेक पिढ्यांनी प्राण त्यागून या पहाडाला बळ पुरवलं आहे . या पहाडावर उपकार केले आहेत , ते त्याने विसरू नयेत म्हणून आम्ही प्राणत्याग करतो .”
विहंग अजन्म्याच्या हातातून निसटून आकाशात झेपावला आणि तितक्याच वेगाने येऊन प्राणत्याग केला .
— अजन्म्याला सगळं आठवलं .
त्यानं सुदाम्याला सगळं सांगितलं .
” मित्रा कृष्णा , पहाड गेली अनेक संवत्सरं खोटं बोलतोय , विहंगांच्या रक्तानं पुष्ट होतोय , हे विहंग मान्य करत नाही , हे खरं आहे , पण त्यांना वाचवायला अन्य कुणी सुजलाम् सुफलाम् पहाड निर्माण का होत नाही ? ”
सुदामा विचारता झाला आणि अचानक अजन्म्याचे डोळे चमकले .
इतक्या वर्षांनी एक गोष्ट त्याच्या ध्यानी आली . त्यानं सुदाम्याचा हात हाती घेतला .
” मत्प्रिय सुदाम्या , आज तू माझे डोळे उघडले आहेस . आत्ता माझ्या लक्षात येत आहे की गेली अकरा संवत्सरे प्राणत्याग करणाऱ्या विहांगांची संख्या खूप कमी कमी होत चालली आहे . याचाच अर्थ दुसरा चांगला , सर्वोत्तम पहाड निर्माण झाला आहे . चल , आज आपण त्याचेच दर्शन घेऊ .”
अजन्मा उठला आणि सुदाम्याचा हात हाती घेऊन पहाड उतरू लागला .
पूर्व दिशेला उगवणारा दिनमणी आज त्याला नवाच वाटू लागला होता …
( काल्पनिक )
— डॉ श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
Leave a Reply