लहानपणी जोशी वाड्यात दिवाळीच्या सुट्टीत मातीचा किल्ला करताना, मातीच्या चित्रांमध्ये टाळ आणि वीणा घेतलेल्या तुकारामांची छोटी मूर्ती होती. त्या दिवाळीनंतर बरेच वर्षं ती घरातील देव्हाऱ्यात विराजमान होती.
एकदा आमची आजी गावाहून आलेली असताना तिने देवपूजा करताना तिने पाणी भरलेल्या ताम्हणात ती धुवायला घेतली. मातीची असल्याने ती मूर्ती पाण्यात विरघळू लागली लागलीच तिने बाहेर काढल्याने, तुकाराम महाराज शाबूत राहिले
शाळेत असताना देहू-आळंदीला आमची सहल गेली होती. तेव्हा पहिल्यांदा ज्ञानोबा-तुकारामांचं दर्शन घडलं. काही वर्षांनंतर आमच्या गावाहून आजीसह दहा बारा वारकरी मंडळी आली होती. त्यांना घेऊन मी दोन दिवस देहू-आळंदी केले. त्यांच्या समवेत पिठलं भाकरीचं जेवण केलं. रात्री वाळवंटातील कीर्तनाचा सोहळा अनुभवला.
दहावीनंतर एकदा आजी गावाहून आलेली होती. तिने देहू आळंदी दर्शनाची इच्छा व्यक्त केली. आमच्या एका मित्राची रिक्षा होती, त्या राम घरतला बोलावून घेतले व आम्ही तिघांनी देहू आळंदी रिक्षाने केले. आजीला समाधान लाभले.
माझी भाची शैला, तिचे लग्न आळंदीला झाले. तेव्हा मी फोटोंचे काम केले. नंतर विनायक ओक, नरेंद्र लिमण या मित्रांच्या आळंदीतील लग्नाचे फोटो काढायला मी हजेरी लावलेली होती.
जाहिरातींच्या व्यवसायात, मुखपृष्ठ करुन घेण्यासाठी आमच्याकडे रायरीकर नावाचा, एक मित्र येत असे. त्याची सासुरवाडी सातारची, त्यामुळे तो आमच्याशी जास्तच आपुलकीने वागत असे. त्याला एक विठ्ठल रखुमाईच्या चित्राचं मुखपृष्ठ करुन घ्यायचं होतं. त्याने कामाची सुरुवात करताना आधी एक लेटरींग करायला सांगितले. त्यानंतर विठ्ठल रखुमाईचं चित्र काढायला सांगितले. मग त्या दोन्हीं गोष्टींचा पुस्तकाच्या आकारात लेआऊट करायला सांगितला. असं करत करत शेवटी मुखपृष्ठ तयार झालं त्यानं पहिल्यांदाच मुखपृष्ठ करायचं आहे, असं स्पष्ट सांगितलं असतं तर कमी दिवसांत, ते काम पूर्ण झालं असतं एखाद्याची काम करुन घेण्याची अशीही ‘स्टाईल’ असू शकते.
संकाये नावाचे धोतर, कोट, फेट्यातील एक गृहस्थ तुकारामांचं चित्र काढून घेण्यासाठी सुधीर खाडिलकरांनी पाठविल्यावर आमच्याकडे आले. ते आळंदीला मठात रहायचे. त्यांचे विचार विद्रोही होते. त्यासाठी त्यांना आळंदीतील माणसांशी संघर्ष करावा लागला. ऑफिसवर आल्यानंतर त्यांच्याशी भरपूर गप्पा होत असत.
याच सुप्रीम ब्लॉक मेकर्सच्या सुधीर खाडिलकर, यांच्याकडून असेच एकदा डॉ. जालनापूरकर नावाचे गृहस्थ आले. साधारणपणे साठी गाठलेले, उंचेपूरे, सुदृढ शरीरयष्टीचे, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे डॉक्टर बोलू लागले, ‘मला बाळकृष्णाचं चित्र काढून हवं आहे.’ त्यांनी एक चित्राचं कात्रण सोबत आणलेलं होतं. तसं त्यांना रेखाचित्र करुन दिल्यावर, ते जाम खूष झाले.
त्यानंतर ते छोट्या मोठ्या चित्रांच्या कामासाठी येऊ लागले. त्यांचा चेहरा जरी रागीट असला तरी स्वभावाने ते फार प्रेमळ होते. त्यांचा भगवत गीतेवर अभ्यास होता. त्या विषयावरील छोट्या पुस्तकांसाठी त्यांना चित्रं हवी असत. ते रहायला राजेंद्र नगरमध्ये होते. त्यांच्या बंगल्याचं नाव होतं ‘विठाई’. ते मूळचे पंढरपूरचे. त्यांना तीन मुली. घरी गेल्यावर आमच्या गप्पा होत असत. त्यांना आयुर्वेदिक औषधांची माहिती होती. कधी घरातील कोणी आजारी असलं की, ते औषध-गोळ्या द्यायचे.
आमच्या साडेसातीच्या कसोटीच्या काळात त्यांनी आम्हाला धीर दिला. त्याकाळात कामं फार कमी असायची. डाॅक्टरांनी स्वतःहून आम्हाला चेक लिहून दिला व कामाचं नंतर पाहू, असं म्हणाले. त्यांनी आम्हाला एकदा पंढरपूरला या असे निमंत्रण दिले होते. मात्र ते काही जमलं नाही. काही वर्षांनंतर आम्ही जेव्हा त्यांच्या बंगल्यावर गेलो, तिथे ते नव्हते. एका केटरिंग करणाऱ्याला तो बंगला वापरायला दिलेला होता. चौकशी करुनही त्यांच्याबद्दल काही समजले नाही.
संस्कृती प्रकाशनची मुखपृष्ठं करताना, काही धार्मिक पुस्तकांचीही मुखपृष्ठं केली. त्यामध्ये दिंडी, जगाच्या कल्याणा, संत तुकाराम, इ. पुस्तकं होती. राजगुरूनगरच्या ह.भ.प. ज्ञानेश्वर थोरात सरांनी एका ज्ञानेश्वरीवरील पुस्तकाचं मुखपृष्ठ माझ्याकडून करुन घेतलं. पृथ्वीराज प्रकाशनच्या म. भा. चव्हाण सरांनी भगवत गीतेवरील पुस्तकाचं मुखपृष्ठ करवून घेतलं अशाप्रकारे माझ्या अंतःकरणातील विठ्ठल, वेगवेगळ्या रूपात कागदावर साकारला गेला.
आम्ही विठ्ठल कागदावर साकारला, तर काहींनी तो पडद्यावर साकारला ‘पंढरीची वारी’ हा मराठी चित्रपट रमाकांत कवठेकर या चित्रकाराने ‘अनंत अडचणी’ पार करुन पडद्यावर साकारला. दरवर्षी आषाढी एकादशीला हा चित्रपट टीव्हीवरुन दाखवला जात असे.
पंढरपूरला निघालेल्या पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी मी लहानपणापासून लक्ष्मीरोडला जात असे. त्या गर्दीत पालखीचं ओझरतं जरी दर्शन झालं तरी मनाला समाधान वाटत असे. अशाच एका पालखीच्या गर्दीत दर्शन घेताना, माझ्या आईचं मंगळसूत्र हरवलं होतं त्याची चुटपुट वर्षभर तिला लागली होती.
बावीस वर्षांपूर्वीच्या पालखी सोहळ्यात दादा कोंडके यांच्या स्मरणार्थ कामाक्षी प्राॅडक्शनतर्फे चित्रपट कलाकारांच्या हस्ते, लक्ष्मी रोडवर वारकऱ्यांना राजगिरा लाडू वाटण्यात आले होते.
गेले दोन वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे पालखी दर्शनाला सर्वच जण मुकलेले आहेत. पांडुरंगकृपेने कोरोनाचा नायनाट होऊन, पुढच्या वर्षी पालखी सोहळा पहाता येईल, अशी आशा आजच्या आषाढी एकादशीला करुयात.
जय जय रामकृष्ण हरी.
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२०-७-२१.
Leave a Reply