आश्रम कशाला म्हणावे आणि मंदिर कशाला म्हणावे?
आर्यवर्तापासून आश्रम स्थितीची निर्मिती झालेली दिसून येते. तसेच मंदिर हा प्रकारही होताच. मग आश्रम आणि मंदिर यामध्ये फरक तो कोणता?
मंदिर = मन + इंदिर या दोन शब्दांचा भाषेनुसार होणारा संधी म्हणजेच मंदिर हा शब्द होय.
याचा अर्थ काय? तर ज्या ठिकाणी किंवा स्थानात गेल्यावर मानवाचे मन, अधिक मानवाची दहा इंद्रिये (इंदिर) शांत, स्थिर होतात व एकाग्र होतात ते ठिकाण होय. हे मन आणि आपली दश इंद्रिये स्थिर होण्यासाठी जेथे भक्ती भावाने आपली इष्ट देव / देवतांची मन:पूर्वक पूजा केली जाते, असे ते ठिकाण किंवा स्थान म्हणजे मंदिर होय. येथे असणा-या देव / देवता ह्या मूर्तीच्या स्वरूपात असतात, मग त्य मूर्ती पाषाणातील असोत किंवा संगमरवरी असोत, पितळेच्या असोत किंवा चांदीच्या असोत. परंतु त्या मुर्तीच असतात. त्यामुळे तेथे जरी भगवंत भेटत असला, तरी तो स्थूल स्वरूपी नसून, मूर्तीच्या रुपात असतो. म्हणून तो बोलू शकत नाही, कांही सांगू शकत नाहत. अशा त्या मूर्तींची देखभाल करण्यासाठी पुजारी असतो, जो केवळ मानव व देव-देवतान्मधील मध्यस्थ असतो. ज्ञानदानाच्या कार्यापेक्षा, त्याचे कार्य हे मध्यस्थाचे अधिक असते, पूजे-अर्चेचे अधिक असते. तसेच मंदिरामध्ये पूजा-अर्चा करण्याचा काळ, मानवाने मंदिरात जाण्याची वेळ इत्यादी ठराविकच असते. तेथे दर्शनासाठी, पूजा-अर्चनेसाठी मानव जात असतो, परंतू तो राहण्यासाठी मात्र तेथे कधीच जात नाही व राहतही नाही.
या उलट आश्रम म्हटला म्हणजे तेथे गुरुजन हे प्रत्यक्ष मानवी स्थितीने स्थित असतात. आश्रम हा पर्णकुटीच्या स्वरूपात, इमारतीच्या स्वरूपात असलेला दिसून येतो. याचाच अर्थ तेथे गुरुजनांचा मानवी स्थितीने वावर असलेला आढळून येतो. तेथे गुरुजनांच्या इष्ट देव / देवता असू शकतात, परंतू त्याचबरोबर तेथे
उपलब्धता असते ती गुरुजनांची, त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या शिष्यगणांची, त्यांच्या अनुयायांची. तेथे, तेथील गुरुजन देव-देवतांबद्दल, त्यांच्याप्रत जाण्याच्या मार्गाबद्दल आपणास उपदेश करीत असतात, माहिती देत असतात, उपाय सांगत असतात, त्याबद्दलचे निरुपण करीत असतात. त्याचबरोबर महत्वाचे असे कार्य म्हणजे ज्ञानदान, हे ही करीत असतात. शिक्षाभ्यासाबरोबर भगवन्ताप्रत कसे जावे याचे मार्गदर्शन हे येथील गुरुजनांचे कार्य हे खरोखरीच अतिशय महत्वाचे असे वंदनीय कार्य असते.
पूर्वी आश्रम हा विशेष करून त्या त्या गुरुजनांचे निवासस्थान असावयाचे. ते गुरुगृह असावयाचे. त्यामुळे आर्यवर्तामध्ये किंवा त्यानंतरच्या काळातही विध्यार्थीवर्ग शिक्षणासाठी, इतर विद्याभ्यासासाठी गुरुगृही जावयाचे. त्यावेळी शाळा नव्हत्या, विद्यामंदिरे नव्हती, तर गुरुगृह हेच सर्वस्वांचे विद्यामंदिर, शाळा असावयाचे. फक्त शाळा किंवा विद्यामंदिरच नसून, ते सर्वांग परिपूर्ण असे स्थान असावयाचे. तेथूनच ख-या अर्थाने मानवाच्या जीवनाची सुरुवात व्हावयाची. तेथेच त्याच्या शिक्षणाचा श्रीगणेशा व्हावयाचा, एखाद्या विषयात पारंगतता यावयाची आणि ते शिक्षणाचे दिवस संपताच, एक तप पूर्ण व्हावयाचे. या गुरुकुल स्थितीत जो कालावधी घालविला जावयाचा, त्याला ब्रह्मचर्याश्रम या नावाने ओळखले जावयाचे.
अर्थातच शिष्य हा साधारणपणे १२ वर्षांचा आपला जीवनकाल तेथे आपल्या गुरुजनान्सोबत, त्यांच्या कुटुंबियांसमवेत, इतर शिष्यगणान्सोबत, व्यतीत करावयाचा. तद् नंतर तो जीवनातील ब-याच गोष्ठी गुरुजनांकडून शिकल्यावर पुन्हा आपल्या मात्या पित्यांच्या घरी गृहस्थाश्रमासाठी रवाना व्हावयाचा.
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply