नवीन लेखन...

आसमान से आया ‘फरिश्ता’

प्रत्येक माणसाची जीवनात इच्छा एक असते आणि होतं दुसरंच! शक्ती सामंता यांना व्हायचं होतं हिरो, मात्र प्रत्यक्षात ते झाले यशस्वी चित्रपटांचे निर्माते आणि दिग्दर्शक!
१३ जानेवारी १९२६ साली बंगालमधील एका खेड्यात शक्तीचा जन्म झाला. आपल्या काकाजवळ डेहराडूनला राहून त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं. १९४४ साली कलकत्ता विद्यापीठातून त्यानं पदवी प्राप्त केली. सिनेमाचं आकर्षण तर लहानपणापासून होतच. हिरो होण्यासाठी त्यानं मुंबई गाठली.
मुंबईत प्रयत्न करुनही हिरो न होऊ शकल्यामुळे शेवटी दापोली येथे शिक्षकाची नोकरी पत्करली. चार वर्षांनंतर मायानगरीने शक्तीला पुन्हा मुंबईत खेचून आणलं. सहायक दिग्दर्शक म्हणून शक्तीने कामाला सुरुवात केली.
पाच सहा चित्रपटांसाठी सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर ५४ साली ‘बहु’ हा पहिला चित्रपट शक्तीने स्वतः दिग्दर्शित केला. पुढील तीन वर्षांत मुंबई टाॅकीजचे तीन चित्रपट दिग्दर्शित केले.
१९५६ साली शक्तीच्या कारला अपघात झाला व त्याला हाॅस्पिटलमध्ये काही महिन्यांसाठी पडून रहावे लागले. हाॅस्पिटलमध्ये बेडवर पडून असतानाच ‘हावडा ब्रिज’च्या पटकथेने डोक्यात आकार घेतला. शक्तीला नायिका म्हणून मधुबालाला घेण्याची इच्छा होती, मात्र तिचे २ लाख रुपये मानधन देणे अशक्य होते. अशावेळी अशोक कुमारने मध्यस्थी केली व मधुबाला चित्रपटाची कथा ऐकून सव्वा लाखात काम करायला तयार झाली.
‘हावडा ब्रिज’ कथा, दिग्दर्शन, संगीत, गाण्यांमुळे तुफान यशस्वी झाला.‌ शक्ती सामंताच्या पुढील यशोगाथेची ही तर सुरुवात होती.
‘इन्सान जाग उठा’, ‘जाली नोट’, ‘सिंगापूर’, ‘नाॅटी बाॅय’, ‘चायना टाऊन’ नंतर हाॅलीवूडच्या ‘कम सप्टेंबर’वर आधारित ‘कश्मीर की कली’ ने उत्तम व्यवसाय केला. ओ. पी. नय्यरच्या सुमधुर गीतांनी रसिकांना वेड लावले. या चित्रपटाच्या शुटींगसाठी शम्मी कपूर व शर्मिला टागोरसह काश्मीरला पोहोचल्यावर संपूर्ण युनिटला तीन आठवडे पावसामुळे बाहेरही पडता आले नाही. पाऊस उघडल्यावर पंचवीस दिवसांत निसर्गाने जे काश्मीर दाखवलं आहे, ते आपण आजही हा चित्रपट पाहून पुन्हा पुन्हा अनुभवू शकतो..
‘सावन की घटा’ चित्रपटानंतर शक्ती सामंतांनी ‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ हा चित्रपट केला. शम्मी कपूर व शर्मिला टागोर या लकी जोडीचा हा दुसरा चित्रपट! पॅरिस, स्विट्झर्लंडमधील रोमॅंटिक, बहारदार गाण्यांमुळे चित्रपट सुपरहिट ठरला. ‘आसमान से..’ ह्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या आदल्या दिवशी शम्मी, शक्तीला म्हणाला, ‘उद्या शुटींगला जर हेलिकॉप्टर असतं तर बरं झालं असतं’ शक्ती सामंतांनी दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली व गाण्याची सुरुवातच हेलिकॉप्टरमधून शम्मी उतरतोय, अशी झाली..
‘आराधना’ चित्रपटाच्या निमित्ताने शक्तीला सुपरस्टार राजेश खन्ना भेटला. यामधील गाणीही गाजली. त्यानंतर ‘कटी पतंग’ची निर्मिती केली. आशा पारेखचा जन्म जणू या चित्रपटातील ‘माधवी’च्या भूमिकेसाठीच झाला असावा, इतकं सुंदर काम तिनं केलं आहे.
आशा पारेखला शक्ती सामंतांनी पुन्हा एकदा साईन केलं शम्मी बरोबर ‘पगला कहीं का’साठी. हा चित्रपट फारसा चालला नाही. गाणी मात्र उत्तम होती.
शम्मी कपूरचं वय वाढताना त्यानं नायक म्हणून केलेला शेवटचा चित्रपट होता ‘जाने अंजाने’. लिना चंदावरकर सोबतची यातील गाणी सुमधुर होती.
‘अमर प्रेम’ चित्रपटाने राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांना यशाच्या शिखरावर नेले. त्यातील ‘पुष्पा, आय हेट टिअर्स’ हा संवाद फार प्रसिद्ध झाला होता.
‘अनुराग’ चित्रपटातून मौसमी चटर्जीने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अंध मुलीच्या भूमिकेनं तिचं सर्वत्र कौतुक झालं. यातही राजेश खन्ना छोट्या भूमिकेत दिसला होता.
राजेश खन्ना व झीनत अमानला घेऊन केलेला रहस्यमय ‘अजनबी’ चित्रपट, कथा आणि गाण्यांमुळे यशस्वी झाला.
‘अमानुष’ हा चित्रपट उत्तमकुमार, शर्मिला टागोर व उत्पल दत्तने अजरामर केला. तो बंगाली भाषेतही डब केला. ‘अनुरोध’ हा चित्रपट राजेश खन्ना व सिंपल कपाडियाला घेऊन केला. त्यातील गाणी उत्तम होती.
‘मेहबूबा’मध्ये पुनर्जन्माची कथा होती. राजेश खन्ना व हेमा मालिनीच्या अभिनयाने हा चित्रपट अविस्मरणीय ठरला. या चित्रपटानंतर शक्ती सामंत यांनी ‘आनंदाश्रम’, अमिताभ बच्चनला घेऊन ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘बरसात की एक रात’ची निर्मिती केली, मात्र अमिताभ बच्चनमुळे फारसे यश लाभले नाही.
राजेश खन्ना व जयाप्रदासोबत ‘आवाज’ ची निर्मिती केली. चित्रपटाने उत्तम व्यवसाय केला. मिथुन चक्रवर्तीला शक्ती सामंतांनी काही चित्रपटात संधी दिली. हळूहळू शक्तीदा थकत चालले होते.
‘अलग अलग’, ‘दुश्मन’ व १९९३च्या ‘गीतांजली’ चित्रपटानंतर त्यांनी स्वल्पविराम घेतला. २००२ साली बंगाली भाषेत त्यांनी ‘देवदास’ची निर्मिती केली. हा चित्रपट अयशस्वी ठरला. पुढील सोळा वर्षे ते पडद्यापासून दूर राहिले. शक्ती सामंतांनी ‘आराधना डबिंग स्टुडिओ’ सुरु करुन चित्रपटांशी जोडलेलं नातं अबाधित ठेवलं.
शक्ती सामंत यांना वार्धक्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने डाॅक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले. दोनच महिन्यांनंतर पुन्हा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
कुणाचा जन्म कशासाठी? हे देव स्वर्गातच ठरवतो. शक्तीला हिरो व्हायचं होतं..झाले निर्माते, दिग्दर्शक! हिरो म्हणून काही मोजकेच चित्रपट करण्याऐवजी त्यांनी दिलेले मनोरंजनाचे अप्रतिम नजराणे वर्षानुवर्षे आपल्याला आनंद देत रहाणार आहेत…
खरंच, देवानं त्यांना आपल्या मनोरंजनासाठीच पृथ्वीवर पाठवलं असावं.. ‘आसमान से आया फरिश्ता’
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१२-४-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

1 Comment on आसमान से आया ‘फरिश्ता’

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..