अंगणात उतरल्या चांदण्याच्या गावास आता मी परका
काळजात झिरपल्या डोहाच्याही थेंबास आता मी परका
बेसुमार साऱ्या स्वप्नांना शब्दात जखडती माझ्या राती
फुलणाऱ्या कळ्यांच्या काट्याच्या दिशानाही आता मी परका
श्वासातच माझ्या शोधीत फिरतो कुठल्या नक्षत्राचे गाणे
मनातले गाणे गाणाऱ्या शिवारातल्या वाऱ्यास आता मी परका
स्वप्नांना साऱ्या बांधून मी शब्दाची रचितो अवघी कवने
बोरुत गिरवल्या गुरुजींच्या वचनास आता मी परका
दोन श्वासामधल्या माझ्या अंतऱ्याचे मग उगाच सलणे
मातीच्या गावाकडल्या तुटल्या नाळेस आता मी परका
देव मला जरी कधी भेटला असेल माझे एकच मागणे
दे चिमणीच्या दातांना फिरुनी ज्यांना आता मी परका
— रजनीकान्त