आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची
जाण सदैव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं अनंतात समावतो
परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला आत्मा असे सोडीत ।।७।।
देह सोडूनी भुवरी आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां मिलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन प्रभू मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें सार असते जिवनाचे ।।९।।
जिवंतपणीच तुम्हीं प्रभूमय होत असे
आनंदी नितांत क्षण खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply