नवीन लेखन...

आत्मस्वरांच्या हाका !

खूप वर्षांपूर्वी निखिल वागळे यांनी स्व. लतादीदी यांची घेतलेली मुलाखत बघत असताना दीदींनी एक आठवण सांगितली होती. त्या आणि त्यांचे कुटुंबीय वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला जात असत. एकदा दीदींनी स्वातंत्र्यवीरांकडे मागणी केली – “मला तुमच्या क्रांतिकारी, देशभक्तीच्या मार्गाने जायचे आहे. मला परवानगी द्यावी.” तेव्हा सावरकर म्हणाले होते- “तुझा जन्म गायनासाठी झालेला आहे. ते काम तू चांगल्या प्रकारे पार पाडीत आहेस. कशाला आमच्या मार्गाचा विचार करतेस? तुझे गायन सुरु ठेव.”

असाच संदर्भ “थ्री इडीयट्स” या चित्रपटात आलेला आहे. यामध्ये अमीरखान असे म्हणतात – ” जर सचिन तेंडुलकरांच्या वडिलांना असं वाटलं असतं की सचिनने गावे आणि लता मंगेशकरांच्या वडिलांनी लता दीदीला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला असता तर? ” साहजिकच ही दोन्ही हिमालयाएवढी व्यक्तिमत्वे आताच्या उंचीवर पोहोचू शकली नसती. दोघांनी आपल्या आवडत्या कार्यक्षेत्राची निवड केली आणि जीवन त्यासाठी झोकून दिले. आपल्या “आतल्या” आवाजाला त्यांनी महत्व दिलं आणि स्वतःला घडविलं. आपण काय आहोत, आपण काय साध्य करू शकतो,आपण स्वतःला कसे सिद्ध करू शकतो याची ढोबळ कल्पना सर्वानांच असते. ही माहिती मिळणे,जाण असणे थोडे पुढेमागे नक्कीच होऊ शकते. सिद्धार्थ ला संसाराचे पाश बांधू शकले नाहीत कारण आपल्याला “बुद्ध” व्हायचं आहे हे त्याला खूप आधी कळलं होतं. डॉ श्रीराम लागू, डॉ काशिनाथ घाणेकर, सध्याचे डॉ सलील कुळकर्णी, डॉ निलेश साबळे त्यांच्या निवडलेल्या वाटेपासून आवडत्या मार्गाला लागलेत,कारण त्यांनाही आतला स्वर ऐकू येत असला पाहिजे. बऱ्याच जणांना “कोण होतास तू,काय झालास तू” असा प्रश्न सतावत असेल तर ते साहजिक,स्वाभाविक मानायला हवे कारण मार्गावरून भरकटणे केव्हातरी नक्कीच त्रासदायक ठरत असते.

आत्मस्वर स्पष्ट असो वा कुजबुजीच्या स्वरात तो केव्हाही पथदर्शकच ठरू शकतो विशेषतः त्याची गरज भासत असते तेव्हा! आत्मस्वर हा भावनांच्या, क्षणिक आवेगाच्या पार असतो आणि आपल्याला एखाद्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवू शकतो. हा आत्मस्वर कालातीत असतो- भूतकाळाचे अनुभव जोखून मार्ग अधिक निष्कंटक करीत असतो, वर्तमानाची काळजी तर घेत असतोच पण भविष्याचा रस्ता प्रकाशित करीत असतो. हा स्वर फक्त आणि फक्त सत्याचाच असतो. आत्मस्वर नैसर्गिक आणि जन्मजात असतो. आणि जेव्हा आपण तो ऐकतो तेव्हा आपण ” आत ” वळतो- आपल्या शरीराला,मनाला, आत्म्याला काय सुचवायचे आहे हे समजून घेतल्यावरच आपण बाह्यविश्वाकडे दिशा शोधतो.

अंतर्ज्ञान आणि आत्मस्वरातील फरक- आत्मस्वर सदैव उपलब्ध असतो,पण अंतर्ज्ञान सरावाने कधीकधी हाती लागू शकते. अंतर्ज्ञान प्राप्त करायचे चार मार्ग आहेत-

(१) अतींद्रिय श्रवणशक्ती – सौम्य, हळुवार पद्धतीने मनातील गलबला ऐकून त्याचा मार्गदर्शक फलक हाती घेणे!
(२) त्रिकालदर्शी – महाभारतामध्ये संजयला अशी दूरदृष्टी प्राप्त झाली होती असं मानलं जातं.
(३) जाणकार भाष्य – वाचिक/शाब्दिक विचारांना मेंदूने जाणून घेतल्यावर केलेले भाष्य!
(४) जाणिवांचे मानसिक ज्ञान -शारीरिक,भावनिक आणि ऊर्जांच्या जाणिवांमधून मिळणारे ज्ञान

आपल्यातील सुप्त अध्यात्मिक देणग्या वरील मार्गांनी हमखास गवसू शकतात.
इथे सकारात्मक “स्व “सापडू शकतो. हे अंतर्ज्ञान अनेक प्रकारे पृष्ठभागावर येऊ शकते. आकलन, गुणग्राहकत्व, विवेकी आचरण, सूक्ष्मदृष्टी आणि संवेदनांची अपेक्षित असलेली माहिती आगाऊ हाती असणे याला आत्मस्वराच्या पल्याड जाणे म्हणतात.
स्वतःचे सर्वोत्कृष्ट रूप दिसण्यासाठी, जाणण्यासाठी आत्मस्वराच्या मार्गदर्शनाची मदत होते. आपली बुद्धी,विद्वत्ता, आयुष्याची दिशा या साऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर स्वतःवरचा विश्वास वाढतो आणि स्वतःला गवसलेलं सत्य ठामपणे स्वीकारायची तयारी होते. आत्मस्वराच्या हाका ऐकल्या की चमत्कार घडतात- स्वप्नातील नोकरी मिळणे, प्रेम गवसणे, भौतिक इच्छा पूर्ण होणे असे अनुभव यायला सुरुवात होते. त्याकडे दुर्लक्ष केले तर होकायंत्राकडे दुर्लक्ष करणाऱ्या नावाड्यासारखी गत होऊ शकते.

आत्मस्वराची प्राप्ती –

(१) दिनक्रमात पैस निर्माण करणे- दिवसाच्या धावपळीत मनही धावाधाव करीत असते. जरा वेग मंदावयाला पैस निर्माण करायला शिकावे. विचारांमध्ये किंचित अंतर ठेवले तर आत्मस्वर व्यक्त होऊ शकतो.
(२) श्रवणभक्ती- निवाडा करण्याची वृत्ती सोडून दिली आणि प्रतिक्रियेचा आवेग आवरला तर चांगले श्रवण होऊ शकते. इतरांचे ऐकण्याची सवय विकसित केली तर स्वतःचेही ऐकण्याची सवय होते.
(३) स्वतःची काळजी – आतले आवाज आणि त्यामधून मिळणारी माहिती काळजीपूर्वक ऐकायची असेल तर स्वतःची काळजी घेणे अपरिहार्य ठरते.
(४) प्रातःकालीन लेखनाची सवय – सकाळी उठल्यावर काहीतरी लिहिण्याची सवय लावली तर त्यातून चेतनेचा प्रवाह सुरु व्हायला मदत होते.
(५) सीमारेषा आखणे- इतरांना कधीकधी नाही म्हणणे, होकार देण्यापूर्वी एकदा स्वतःला तपासणे आणि स्वतःवर डोळे झाकून विश्वास ठेवायला शिकणे यातून सीमारेषा स्पष्ट होतात. इतरेजनांच्या मागण्या, विचार, अपेक्षा,अधिकार बरेचदा आपल्यावर नकळत लादले जाऊ शकतात. तेथे डोळ्यात तेल घालून राखण करणाऱ्या सीमारेषा गरजेच्या ठरतात.
(६) सहाव्या इंद्रियाला प्रतिसाद देणे- सहाव्या इंद्रियाबाबत अनभिज्ञ असणे हे खूप नुकसानकारक ठरते. त्यामुळे आपल्या सुप्त शक्तींच्या वापरावर मर्यादा येते. अंतर्ज्ञानाने आत्मस्वर जागृत होऊन तो बलवान होऊ शकतो. माहिती धारण करण्याची आपली क्षमता वाढू शकते आणि स्वतःला मार्गदर्शन करण्याचे स्वतःचे असे मार्ग सापडू शकतात.
(७) मर्मदृष्टीच्या क्षणभंगुर क्षणांना जाणून घेणे- आत्मस्वर सूक्ष्म, शांत आणि नाजूक असतो. तो आपल्या पर्यायांवर, निर्णयांवर आरूढ होत नाही. त्या प्रवाही क्षणांची नोंद ठेवायला शिकले पाहिजे.
(८) शारीरिक आणि मानसिक आरोग्याची देखभाल- अवकाशात झेप घ्यायची असेल तर पायांखालची आधाररेषा तितकीच मजबूत असायला हवी. आवश्यक असलेला भावनिक आधार जेथून मिळेल (आप्तस्वकीय, व्यावसायिक) तेथून, आणि मिळेल तितका घ्यावा.पोषक आहार, पूरक खाद्यपदार्थ आणि समंजस व्यायाम यांच्या समन्वयातून शरीराला आवश्यक असलेला समतोल लाभतो. अशा मानसिक अवस्थेत निरभ्र विवेक आपोआप प्रतिक्रियांना बाजूला सारतो.
(९) तंत्रज्ञान विरहित वेळ घालविणे- लक्ष विचलित करणारी रेडिओ,टीव्ही, भ्रमणध्वनी, आंतरजाल अशी मायावी शस्त्रे दिवसातून किमान काही काळासाठी दूर ठेवून स्वतःजवळ नीरव शांततेत दिवसाचे काही क्षण घालविणे अगत्याचे असते. आतले ऐकू येईल इतपत शांततेची सवय करणे महत्वाचे असते. आत्मस्वर आपोआप व्यक्त होईल अशी व्यवस्था निर्माण करता यावी. सकाळी उठल्यापासून ही बाह्यविश्वाशी जोडणी अखंड,अव्याहत सुरु असते. अगदी झोपतानाही व्हाट्सअँपवरील ताजे संदेश बघूनच डोळे “मिटतात”. शांततेला किती हद्दपार केलंय आपण? जबरदस्ती असते का सतत कशा ना कशात व्यग्र राहण्याची आपणावर की ती आपणच नकळत स्वतःवर लादली आहे? वेळ जावा म्हणून, वेळ जात नाही म्हणून काही ना काही दिवसभर सुरूच! यातल्या बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण त्या नाही केल्या तरी चालेल. आमच्या अभियांत्रिकी भाषेत व्ही ए (व्हॅल्यू ऍडेड)आणि एन व्ही ए (नॉन व्हॅल्यू ऍडेड) अशा दोन ऍक्टिव्हिटीज असतात. दिवसाचा बराच हिस्सा (“फुकट “वेळ मिळालाय म्हणून) आपण “फुकट ” आणि एन व्ही ए मध्ये घालवत असतो कां ? सारखे डुईंग करत असू तर दिवसातील काहीवेळ तरी बिईंग साठी आपण राखून ठेवतो का?
याचं कारण असं की आपणांस आसपास आवाजाची, गोंधळाची इतकी सवय झाली असते की थोडावेळ जरी शांतता असली तर आपण दचकतो/भांबावतो. आजूबाजूला काही नसेल तर आपल्याला कसंनुसं होतं. कामातून बाहेर पडून या शांततेला कवटाळलं तर आपल्याला चैन पडत नाही. काही न करणे या कल्पनेनेच काहीजणांना चुकल्याचुकल्यासारखे वाटते. “बॅरिस्टर” मधील लाल अलवण नेसलेली मावशी (विजयाबाई) म्हणते – “मी रोज सकाळी विहिरीवरून घागरी भरून ठेवते आणि संध्याकाळी ओतून देते.” आपणही आपला दिवस असाच “भरून “ठेवत असतो का? शांततेशी, निःशब्दतेशी,निरवतेशी आपल्याला कसे जुळवून घेता येईल? ते कुठे शिकायला मिळेल?
(१०) सदैव प्रवाही राहा – एका ठिकाणी साचून राहणे क्वचित सुखद वाटते पण त्यासाठी आपण जन्माला आलेलो नसतो. प्रवाही असणे म्हणजे हातात घेतलेल्या छोट्या-मोठ्या प्रकल्पात बुडून जाणे इतके की वेळेचीही भान राहू नये. कामात मग्न असण्याची ही अवस्था विलोभनीय असते, एखाद्या समाधीसारखी असते. प्रवाह आपल्याला मोकळा करतो, आपल्यावर उपचार करतो आणि मानसिक अवकाश विस्तारतो.
आत्मस्वरापाशी नेऊन ठेवणारी सारी आयुधे जवळ बाळगलेली बरी! बाहेर उत्तरे शोधणे कदाचित सोपे वाटू शकते पण थोड्याशा संयमाने आपण आतल्या स्वरापाशी पोहोचू शकतो.

आत्मस्वराच्या वाटेवरील काटे-

बरेचदा पालक आणि शिक्षक लहानपणी त्यांची मते बालकांवर लादतात. “तुला काय कळतंय, लहान आहेस अजून” या दमदाटी खाली सगळे स्वर दाबले जातात. हे पूर्णतया चुकीचे नसतेही. पण “आमची आम्ही घडवू उद्या” एवढंच मागणाऱ्या चिमुरड्यांना थोडी मोकळीक दिली आणि त्यांना स्वतःचा श्वास घेण्यासाठी स्वतःची हवा उपलब्ध करून दिली तर त्यांत काय गैर? चुकतील तेथे वडीलधारी असतातच सावरायला पण प्रयत्न करून पाहण्याचा अधिकारही नाकारला जातो. मोठे झाल्यावर अशी मुले कुढी होऊ शकतात. मनाप्रमाणे त्यांना जीवनमार्ग शोधू दिला नाही. वडील डॉक्टर म्हणून तूही डॉक्टर व्हायला पाहिजे अशी अट वाढीला मारक ठरते, कारण नेमके अशा व्यक्तीला गायक किंवा वादक व्हायचे असते. निमूटपणे ते मूल मेडिकलला जाते आणि कदाचित कायम उसासे टाकीत राहते. लौकिक अर्थाने त्याची भरभराट होतेही पण आतला स्वर कायम दुखावलेला,जख्मी राहतो. बरं अशा चुकलेल्या वाटसरूला टीकेने झोडपणारे आसपास खूप असतात कारण एकच – अशा व्यक्ती जगाच्या व्याख्येत “अपयशी” असतात. पण या तथाकथित अपयशाला जबाबदार कोण असते? पूर्वी विवाहाच्या वेळीही असेच व्हायचे- घरच्यांनी पसंत केलेल्या वराच्या /वधूच्या गळ्यात माळ टाकायची जबरदस्ती असे. “आमचे नाही का संसार सुखाचे झाले? आम्हांला कोठे कोणी आमची पसंती विचारली होती “असे पुन्हा वरून मीठ चोळणे! मग अशा लादलेल्या जोडीदाराबरोबर उभे आयुष्य काढणे म्हणजे बेचव वाटचाल!

आयुष्याच्या उत्तरार्धात बरीच मंडळी खंतावल्या सुरात – ” काय व्हायचं होतं मला, काय झालो मी?” असं मित्रपरिवाराला सांगत असतात. काहींना ही संधी मिळत नाही,ती मंडळी पश्चात्ताप घेऊन हिंडतात किंवा अपराधीपणाची भावना जवळ बाळगतात. क्वचित चुकलेले मार्ग दुरुस्त करता येतातही पण तोपर्यंत हातातून बरंच निसटून गेलेलं असतं.

याउलट आत्मस्वर गवसलेली मंडळी,त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी होतात, ऐहिक दृष्ट्या सुखी-समाधानी होतात. सकारात्मक होतात. त्यांच्या दृष्टिकोनात पूर्वग्रह नसतात. त्यांची नजर आणि जीवनहेतू स्पष्ट असतात आणि पुढची पायवाट उजेडी असते. स्वच्छ, नितळ नजरेने पण आत्मविश्वासपूर्ण आवाजात ते ठामपणे व्यक्त होतात. मुख्य म्हणजे आनंदी, शांत असतात. यासाठीच असतो ना हा अट्टाहास?

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..